निर्गम 21
21
1“तू त्यांच्यासमोर मांडावयाचे नियम हे आहेत:
इब्री गुलाम
2“तुम्ही जर एखादा इब्री गुलाम विकत घेतला, तर त्याने तुमची सहा वर्षे सेवा करावी. परंतु सातव्या वर्षी तो काहीही भरपाई न घेता स्वतंत्र होईल. 3जर तो एकटाच आला, तर तो एकटाच स्वतंत्र जाईल; परंतु तो आपल्या पत्नीसोबत आला तर तीसुद्धा त्याच्याबरोबर जाईल. 4जर गुलाम असताना त्याच्या मालकाने त्याचे लग्न करून दिले आणि त्याला मुले व मुली झाले, तर ती स्त्री व तिची लेकरे त्या मालकाच्या हक्काची राहतील आणि तो मनुष्य एकटाच स्वतंत्र केला जाईल.
5“पण जर तो गुलाम जाहीर करतो की, मी माझ्या मालकावर, माझ्या पत्नीवर व माझ्या लेकरांवर प्रीती करतो आणि तुम्हाला सोडून जाण्याची माझी इच्छा नाही, 6तर त्याच्या मालकाने त्याला न्यायाधीशांसमोर#21:6 म्हणजे परमेश्वरासमोर आणावे. मग त्याने त्याला दरवाजाकडे किंवा दरवाजाच्या चौकटीजवळ आणावे व आरीने त्याचा कान टोचावा. यानंतर तो त्याचा जीवनभर गुलाम म्हणून राहील.
7“एखाद्या मनुष्याने आपली मुलगी गुलाम म्हणून विकली, तर पुरुष केले जातात त्याप्रमाणे ती स्वतंत्र केली जाणार नाही. 8ज्याने तिला आपल्यासाठी निवडून घेतले होते, त्या आपल्या मालकाला जर ती संतुष्ट करीत नाही, तर त्याने तिची खंडणी भरून तिला जाऊ द्यावे; तिला परक्याला विकण्याचा त्याला अधिकार नाही, कारण त्याने तिचा विश्वास तोडला आहे. 9पण आपल्या मुलासाठी जर तो तिची निवड करतो, तर त्याने आपल्या मुलीचे हक्क तिला द्यावे. 10जर तो दुसर्या स्त्रीशी विवाह करतो, तर त्याने पहिल्या पत्नीला अन्न, वस्त्र, आणि वैवाहिक हक्क यापासून वंचित ठेऊ नये. 11जर तो या तीन गोष्टी तिला पुरवित नाही तर ती पैसे न देताच मोकळी जाऊ शकते.
वैयक्तिक इजा
12“जर कोणी एखाद्यावर प्राणघातक हल्ला केला तर त्याला मृत्युदंड द्यावा. 13जरी ते मुद्दाम केलेले नाही, पण परमेश्वरानेच ते घडवून आणले, तर मी नेमलेल्या ठिकाणी त्यांनी पळून जावे. 14पण कोणी जर कपटाने एखाद्याचा वध केला, तर त्याला माझ्या वेदीकडे नेऊन मृत्युदंड द्यावा.
15“जे कोणी आपला पिता किंवा आईला जिवे मारतात#21:15 किंवा हल्ला करतात त्यांना जिवे मारावे.
16“जो कोणी एखाद्याचे अपहरण करतो त्याला जिवे मारावे, पीडित व्यक्ती त्याच्या ताब्यात असो किंवा कोणाला विकलेली असो.
17“जो कोणी आपल्या आई किंवा वडिलास शाप देईल त्यास जिवे मारावे.
18“जर लोक आपसात भांडत असताना एकाने दुसर्याला दगडाने किंवा बुक्कीने मारले आणि पीडित व्यक्ती मेली नाही, परंतु आपले अंथरूण धरून राहिली, 19आणि जर उठून काठीच्या आधाराने बाहेर चालू शकेल तर ज्याने मारले तो दंडास पात्र नसून निर्दोष असेल; मात्र दोषी व्यक्तीने इजा झालेल्या व्यक्तीला नुकसान भरपाई व तो व्यक्ती बरा होईपर्यंत सर्व खर्च द्यावा.
20“जो कोणी आपल्या गुलाम स्त्री किंवा पुरुषाला काठीने मारेल व त्यामुळे गुलाम मरण पावला, तर त्या धन्याला शिक्षा व्हावी. 21पण जर गुलाम एक किंवा दोन दिवसात बरा झाला तर त्यांना पैशाची शिक्षा होणार नाही, कारण गुलाम त्यांच्या मालकीचा आहे.
22“कोणी मारामारी करीत असताना एखाद्या गरोदर स्त्रीला धक्का लागला व त्यामुळे तिचा गर्भपात झाला, पण तिला गंभीर इजा झाली नाही, तर तिचा पती मागेल व न्यायाधीश मान्य करेल तितकी रक्कम अपराध्याने द्यावी. 23परंतु इजा जर गंभीर आहे, तर तुम्ही जिवाबद्दल जीव, 24डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात, हाताबद्दल हात, पायाबद्दल पाय, 25चटक्याबद्दल चटका, जखमेबद्दल जखम किंवा इजेबद्दल इजा द्यावी.
26“एखाद्या धन्याने आपल्या गुलाम स्त्री किंवा पुरुषाच्या डोळ्यांवर मारून तो फोडला तर डोळ्याची भरपाई म्हणून त्याने त्यांना स्वतंत्र करावे. 27एखादा धनी जो आपल्या गुलाम पुरुष किंवा स्त्रीचा दात पाडतो, तर दाताची भरपाई म्हणून त्याने त्यांना स्वतंत्र करावे.
28“एखाद्या बैलाने एखाद्या पुरुष किंवा स्त्रीस हुंदडून जिवे मारले, तर त्या बैलास धोंडमार करून ठार मारावे व त्याचे मांस खाऊ नये. परंतु बैलाचा मालक निर्दोष असून जबाबदार असणार नाही. 29पण बैल मारका आहे याबद्दल त्याच्या मालकाला सूचना देऊनही त्याने त्या बैलाला बांधून ठेवले नाही व तो एखाद्या पुरुषाला किंवा स्त्रीला मारून टाकतो, तर त्या बैलाला धोंडमार करावी व त्याच्या मालकास सुद्धा जिवे मारावे. 30परंतु जर त्याच्याकडून खंडणी मागितली असेल, तर जेवढी रक्कम मागितली ती देऊन तो मालक आपला जीव वाचवू शकतो. 31एखाद्याच्या पुत्राला किंवा कन्येला बैलाने हुंदडून मारले, तरी हाच नियम लागू व्हावा. 32पण बैलाने जर एखाद्या स्त्री किंवा पुरुष गुलामाला हुंदडून मारले, तर त्या गुलामाच्या मालकाला बैलाच्या मालकाने तीस चांदीची नाणी द्यावीत व बैलाला धोंडमार करावी.
33“जर कोणी एखादा खड्डा उघडला किंवा खणला व तो झाकला नाही आणि त्यात बैल किंवा गाढव पडले, 34तर ज्याने तो खड्डा उघडला त्याने जनावराच्या मालकाला त्याची किंमत मोजून द्यावी व त्याबदल्यात ते मेलेले जनावर घ्यावे.
35“जर कोणाच्या बैलाने दुसर्याच्या बैलाला हुंदडून मारले, तर त्या दोघांनी जिवंत असलेला बैल विकून आलेली रक्कम व मेलेला बैल यांचा सारखा वाटा करून घ्यावा. 36पण आपला बैल मारका आहे हे त्या बैलाच्या मालकाला माहिती असूनही, त्याने त्या बैलाला बांधले नाही, तर त्याच्या धन्याने जनावराबद्दल भरपाई करावी व मेलेले जनावर घ्यावे.
सध्या निवडलेले:
निर्गम 21: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.