YouVersion लोगो
सर्च आयकॉन

निर्गम 19

19
सीनाय पर्वतावर मोशे
1इस्राएली लोक इजिप्त देशातून बाहेर आल्यावर तिसर्‍या महिन्याच्या पहिल्या दिवशी; याच दिवशी ते सीनायच्या रानात आले. 2रफीदीम येथून निघाल्यावर, त्यांनी सीनायच्या रानात प्रवेश केला आणि इस्राएल त्या ठिकाणी रानात पर्वतापुढे तळ देऊन राहिले.
3नंतर मोशे परमेश्वराकडे गेला आणि याहवेहने पर्वतावरून त्याला आवाज देऊन म्हटले, “याकोबाच्या वंशजांना, म्हणजेच इस्राएली लोकांना तू हे सांगावे: 4‘मी इजिप्तच्या लोकांचे काय केले आणि तुम्हाला गरुडाच्या पंखावर माझ्याकडे कसे वाहून आणले, ते तुम्ही स्वतःच पाहिले आहे. 5आता जर तुम्ही पूर्णपणे माझे आज्ञापालन केले आणि माझा करार पाळला, तर सर्व राष्ट्रात तुम्ही माझे मोलवान धन व्हाल. जरी सर्व पृथ्वी माझी आहे, 6तरी तुम्हीच मला याजकीय राज्य; पवित्र राष्ट्र असे व्हाल.’ तू इस्राएली लोकांना सांगावयाच्या याच गोष्टी आहेत.”
7तेव्हा मोशेने इस्राएली पुढार्‍यांना बोलावून ज्यागोष्टी याहवेहने सांगाव्या म्हणून आज्ञापिल्या होत्या, त्या त्यांना सांगितल्या. 8तेव्हा सर्व लोक एकत्र प्रतिसाद देत म्हणाले, “जे काही याहवेहने सांगितले, ते सर्व आम्ही करू.” मग मोशेने जाऊन लोकांचे म्हणणे याहवेहला कळविले.
9मग याहवेहने मोशेला म्हटले, “मी घनदाट मेघातून तुझ्याकडे येईन, अशासाठी की मी तुझ्याशी बोलत असताना लोक ऐकतील आणि तुझ्यावर विश्वास ठेवतील.” मग मोशेने लोक काय म्हणाले ते याहवेहला सांगितले.
10आणि याहवेह मोशेला म्हणाले, “लोकांकडे जा आणि त्यांना आज व उद्या पवित्र कर. त्यांनी आपले कपडे स्वच्छ धुवावे, 11आणि तिसर्‍या दिवशी तयार असावे, कारण त्या दिवशी याहवेह सर्व लोकांसमक्ष सीनाय पर्वतावर उतरून येतील. 12लोकांसाठी पर्वताच्या सभोवती सीमारेषा आख आणि त्यांना सांग, ‘कोणीही पर्वताकडे जाऊ नये किंवा त्याच्या पायथ्यालाही कोणी स्पर्श करणार नाही, याची काळजी घ्यावी. जे कोणी पर्वताला हात लावतील त्यांना मारून टाकावे.’ 13त्यांना मरेपर्यंत धोंडमार करावी किंवा धनुष्यबाणाने मारावे; कोणीही त्यांना स्पर्श करू नये. ते मनुष्य असो वा प्राणी, त्यांना जिवंत राहू देऊ नये. जेव्हा एडक्याच्या शिंगाचा दीर्घ नाद कानी पडेल तेव्हाच त्यांनी पर्वताजवळ यावे.”
14मग मोशे पर्वतावरून खाली उतरून लोकांकडे गेला, त्याने त्यांना शुद्ध केले व लोकांनी आपले कपडे धुतले. 15मग तो लोकांना म्हणाला, “तिसर्‍या दिवसासाठी आपली तयारी करा, लैंगिक संभोगापासून दूर राहा.”
16तिसर्‍या दिवसाच्या सकाळी ढगांचा गडगडाट होऊन विजा चमकू लागल्या व पर्वतावर दाट ढग जमा झाले आणि तुतारीचा फार मोठा नाद झाला. छावणीतील सर्वजण भीतीने कापू लागले. 17मग मोशेने लोकांना परमेश्वराला भेटण्यासाठी छावणीच्या बाहेर आणले आणि ते पर्वताच्या पायथ्याशी उभे राहिले. 18सीनाय पर्वत धुराने झाकून गेला होता, कारण याहवेह अग्निरुपात पर्वतावर उतरले होते. भट्टीतून निघावा तसा धूर उठला होता आणि सगळा पर्वत जोरात थरथरत होता. 19कर्ण्याचा आवाज जसा मोठा होत गेला, तसा मोशे बोलत होता आणि परमेश्वर त्याला उत्तर देत होते.
20याहवेह सीनाय पर्वतावर उतरले व मोशेला पर्वतावर बोलाविले. मग मोशे वर गेला, 21आणि याहवेह मोशेला म्हणाले. “खाली जा व लोकांना सांग की याहवेहला पाहण्यासाठी त्यांनी सीमा ओलांडू नये आणि पुष्कळांचा नाश होऊ नये. 22याहवेहची सेवा करावयास जे याजक जवळ येतात त्यांनी सुद्धा स्वतःला पवित्र करावे, नाहीतर याहवेह त्यांच्याविरुद्ध भडकतील.”
23तेव्हा मोशे याहवेहला म्हणाला, “लोक सीनाय पर्वताजवळ येऊ शकत नाहीत, कारण तुम्ही स्वतःच आम्हाला ताकीद दिली आहे, ‘पर्वताभोवती सीमा आखून आम्ही त्याला पवित्र ठेवावे.’ ”
24याहवेहने उत्तर दिले, “खाली जा आणि अहरोनाला तुझ्याबरोबर घेऊन ये. परंतु याजकांनी व लोकांनी याहवेहकडे सीमा ओलांडून येऊ नये, नाहीतर याहवेह त्यांच्याविरुद्ध भडकतील.”
25मग मोशे खाली लोकांकडे गेला व त्यांना हे सर्व सांगितले.

सध्या निवडलेले:

निर्गम 19: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन