अनुवाद 9
9
इस्राएलाच्या नीतिमत्वामुळे नव्हे
1हे इस्राएला, ऐक: तुम्ही आता यार्देन पार करून पलीकडे आत जाणार आहात आणि ज्यांच्या शहरांची तटबंदी आकाशापर्यंत आहेत, अशा तुमच्यापेक्षा महान आणि अधिक बलवान लोकांना हाकलून देणार आहात. 2तेथील लोक धिप्पाड व उंच आहेत—अनाकी वंशज! तुम्हाला त्यांच्याबद्दल माहीत आहे आणि तुम्ही हे ऐकले आहे: “अनाकी लोकांविरुद्ध कोण उभे राहू शकेल?” 3पण तुमची खात्री असू द्या की, याहवेह तुमचे परमेश्वर भस्म करणार्या अग्निरुपाने तुमच्यापुढे जातील. ते त्यांचा नाश करतील; त्यांना तुमच्यापुढे नमवतील आणि तुमच्यासमोर त्यांचा नायनाट करतील, मग याहवेहने दिलेल्या अभिवचनानुसार तुम्ही त्यांना लगेच संपूर्ण नष्ट कराल आणि त्यांना तिथून घालवून द्याल.
4याहवेह तुमच्या परमेश्वराने त्यांना तुमच्यापुढून घालवून दिल्यानंतर स्वतःशी म्हणू नका, “मी नीतिमान आहे, म्हणूनच याहवेहने हा देश वतन म्हणून घेण्यास मला मदत केली.” नाही! तसे मुळीच नाही, तर या राष्ट्रांच्या दुष्टपणामुळेच याहवेह त्यांना तुमच्यापुढून घालवून देत आहेत. 5तुम्ही नीतिमान आणि सरळ मनाचे लोक आहात म्हणून याहवेह तुम्हाला त्यांचा देश ताब्यात देतील असे मुळीच नाही; मी पुन्हा सांगतो की याहवेह तुमचे परमेश्वर हे केवळ त्या राष्ट्रांच्या दुष्टपणामुळेच व त्यांनी तुमचे पूर्वज अब्राहाम, इसहाक व याकोब यांना जी शपथ दिली होती, ती पूर्ण करण्यासाठीच ते त्या राष्ट्रांना तुमच्यापुढून घालवून देतील. 6आणि हे जाणून घ्या, याहवेह तुमचे परमेश्वर, तुम्ही नीतिमान आहात म्हणून हा उत्तम देश तुम्हाला वतन म्हणून देत नाहीत, खरेतर तुम्ही ताठ मानेचे लोक आहात.
वासराची सुवर्ण मूर्ती
7तुम्ही त्या रानात याहवेह तुमच्या परमेश्वराला राग येईल असे वागलात, हे तुम्ही विसरू नका आणि याची नेहमी आठवण ठेवा. ज्या दिवशी तुम्ही इजिप्त देश सोडला त्या दिवसापासून या ठिकाणी येईपर्यंत, तुम्ही याहवेहविरुद्ध सतत बंड केले. 8होरेब पर्वतावर तुम्ही त्यांना इतके संतप्त केले की याहवेह तुमचा नाश करणारच होते. 9याहवेहने तुमच्याशी केलेल्या कराराच्या दगडी पाट्या स्वीकारण्यासाठी मी त्या पर्वतावर चढून गेलो होतो. तिथे मी चाळीस दिवस व चाळीस रात्री होतो; त्या काळात मी भाकर खाल्ली नाही आणि पाणीदेखील प्यालो नाही. 10याहवेहने दोन दगडी पाट्या मला दिल्या, ज्यावर परमेश्वराच्या बोटाने लिहिलेले होते. तुम्ही पर्वताच्या पायथ्याशी गोळा झालेले होता, त्यावेळी याहवेहने तुमच्याशी बोलताना पर्वतावर अग्नीतून सांगितलेल्या सर्व आज्ञा त्यावर होत्या.
11चाळीस दिवस व चाळीस रात्री लोटल्यानंतर, याहवेहने कराराच्या दोन दगडी पाट्या मला दिल्या. 12मग याहवेह मला म्हणाले, “ताबडतोब येथून उतरून खाली जा, कारण तुझे लोक, ज्यांना तू इजिप्त देशातून बाहेर काढून आणले, ते भ्रष्ट झाले आहेत. मी त्यांना जे करण्याची आज्ञा दिलेली होती, त्यापासून बहकून त्यांनी स्वतःसाठी ओतीव मूर्ती तयार केली आहे.”
13याहवेह मला म्हणाले, “मी या लोकांना ओळखतो, हे ताठ मानेचे लोक आहेत. 14तू माझ्या आड येऊ नकोस, मी या लोकांचा नाश करेन आणि त्यांचे नाव पृथ्वीवरून पुसून टाकेन आणि त्यांच्याहीपेक्षा अधिक बलवान व बहुगुणित असे राष्ट्र मी तुझ्यापासून बनवीन.”
15नंतर मी मागे वळलो आणि पर्वतावरून खाली उतरत असताना पर्वत अग्नीने जळत होता आणि त्या कराराच्या दोन पाट्या माझ्या हातात होत्या. 16जेव्हा मी पाहिले की, याहवेह तुमच्या परमेश्वराविरुद्ध तुम्ही पाप केले आहे; तुम्ही तुमच्यासाठी वासराची ओतीव मूर्ती घडविली, असे माझ्या दृष्टीस पडले. याहवेहनी दिलेल्या आज्ञा पाळण्याचे सोडून तुम्ही किती लवकर पथभ्रष्ट झालात. 17तेव्हा मी त्या दोन दगडी पाट्या घेतल्या आणि माझ्या हातांतून फेकून, तुमच्या डोळ्यादेखत त्यांचा चुराडा केला.
18नंतर आणखी चाळीस दिवस व चाळीस रात्री मी याहवेहपुढे पालथा पडून राहिलो; मी भाकर खाल्ली नाही आणि पाणीदेखील प्यालो नाही, कारण याहवेहच्या दृष्टीने वाईट आहे, तेच पाप तुम्ही करून त्यांचा क्रोध भडकाविला होता. 19मला याहवेहच्या रागाची आणि क्रोधाची भीती वाटली, कारण ते तुमचा नाश करण्याइतके रागावले होते. परंतु त्यावेळी सुद्धा याहवेहने माझे ऐकले. 20आणि याहवेह अहरोनवर अत्यंत संतप्त झाले व त्याचा नाश करणार होते, परंतु मी त्याच्यासाठी देखील प्रार्थना केली. 21मी तुमचे पापकृत्य, म्हणजे जे वासरू तुम्ही बनविले होते ते घेतले आणि अग्नीत जाळून त्याची कुटून धुळीसारखी बारीक पूड केली आणि ती धूळ डोंगरातून वाहणार्या ओहोळात फेकून दिली.
22पुन्हा तबेरा येथे, मस्सा येथे आणि किब्रोथ-हत्ताव्वा येथेही तुम्ही याहवेहला संतप्त केले.
23आणि जेव्हा याहवेहने तुम्हाला कादेश-बरनेआ येथून पाठविले, तेव्हा ते म्हणाले, “वर जा आणि जो देश मी तुम्हाला दिला आहे त्याचा ताबा घ्या.” पण तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराच्या आज्ञेविरुद्ध बंड केले. त्यांच्यावर भरवसा ठेवला नाही व त्यांची आज्ञा पाळली नाही. 24मी तुम्हाला ओळखतो, त्या दिवसापासून तुम्ही याहवेहविरुद्ध बंड करीत आहात.
25म्हणूनच मी याहवेहपुढे चाळीस दिवस व चाळीस रात्र पालथा पडून राहिलो, कारण याहवेह म्हणाले होते की, ते तुमचा नाश करतील. 26मी याहवेहला प्रार्थना केली आणि म्हणालो, “हे सार्वभौम याहवेह, तुमच्या प्रचंड शक्तीने व तुमच्या बलाढ्य हाताने इजिप्त देशातून वाचविलेल्या तुमच्या लोकांचा, तुमच्या वारसांचा संहार करू नका. 27तुमचे सेवक अब्राहाम, इसहाक व याकोब यांची आठवण करा. या लोकांचा हट्टीपणा, त्यांच्या दुष्टपणाकडे व त्यांच्या पापाकडे लक्ष देऊ नका. 28कारण जर तुम्ही यांचा नाश केला, तर ज्या देशामधून तुम्ही आम्हाला बाहेर आणले ते लोक म्हणतील, ‘वचनदत्त देशात त्यांना नेण्यास त्यांचा याहवेह असमर्थ होता आणि तो त्यांचा द्वेष करीत होता म्हणून त्याने त्यांचा नाश केला व त्यांना ठार मारण्यासाठीच त्याने त्यांना रानात नेले.’ 29पण हे तुमचे लोक, तुमचे वारसदार आहेत. तुम्हीच त्यांना तुमच्या महान सामर्थ्याने आणि पसरलेल्या बाहूने इजिप्तमधून बाहेर आणले.”
सध्या निवडलेले:
अनुवाद 9: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.