पाहा, मी तुम्हाला याहवेह माझ्या परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे दिलेले विधी व नियम यासाठी शिकविले की जो देश तुम्ही ताब्यात घेणार आहात, त्या देशात तुमचा प्रवेश होईल, त्यावेळी ते तुम्ही पाळावे. तुम्ही जर ते पाळले तर तुम्ही सुज्ञ व समंजस आहात अशी तुमची किर्ती होईल. जेव्हा सभोवतालची राष्ट्रे या नियमांविषयी ऐकतील तेव्हा ती म्हणतील, “इस्राएली राष्ट्रातील लोक निश्चितच बुद्धिमान व समंजस आहेत.” याहवेह आपले परमेश्वर जसे आपण त्यांना प्रार्थना करतो तेव्हा ते आपल्या समीप असतात त्याप्रमाणे दुसरे कोणते महान राष्ट्र आहे ज्याचे देव त्यांच्या समीप असतात? आणि एवढे महान राष्ट्र कोणते आहे, ज्याचे विधी आणि नियम या नियमशास्त्रासारखे न्याय्य आहेत, जे मी आज तुमच्यासमोर मांडणार आहे? तुम्ही स्वतःबद्दल जागरूक असणे आणि स्वतःची काळजी घेणे खूप आवश्यक आहे, जेणेकरून तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेल्या गोष्टी विसरून जाऊ नये आणि आयुष्यभर त्या तुमच्या स्मरणातून निघून जाऊ नये. तुम्ही ते तुमच्या पुत्रांना आणि त्यांच्यानंतर त्यांच्या पुत्रांना शिकवा. ज्या दिवशी तुम्ही होरेब पर्वताजवळ याहवेह तुमच्या परमेश्वरासमोर उभे होता, त्या दिवसाविषयी त्यांना सांगा. त्या दिवशी याहवेहनी मला म्हणाले होते, “माझ्यासमोर सर्व लोकांना माझे शब्द ऐकण्यासाठी एकत्र कर, म्हणजे ते पृथ्वीवर जिवंत असेपर्यंत माझा आदर करतील आणि आपल्या मुलाबाळांना माझे शब्द शिकवतील.” मग तुम्ही जवळ येऊन त्या पर्वताच्या पायथ्याशी जाऊन उभे राहिलात आणि पर्वत अग्नीने पेटला होता, त्याची ज्वाला आकाशापर्यंत पोहोचली होती, सर्वत्र अंधार, ढग आणि घनदाट अंधकार पसरला होता. मग याहवेह तुमच्याशी अग्नीतून बोलले, तुम्ही त्यांचे शब्द ऐकले, परंतु त्यांची आकृती तुम्हाला दिसली नाही; फक्त वाणी ऐकली. त्यांनी आपला करार तुम्हाला घोषित केला, दहा आज्ञा, ज्या पालन करण्याची त्यांनी आज्ञा दिली आणि त्यांनी त्या दोन दगडी पाट्यांवर लिहिल्या. आणि त्यावेळी याहवेहने मला आज्ञा केली की तुम्ही यार्देन ओलांडून जो देश ताब्यात घेणार आहात तिथे तुम्हाला जे विधी व नियम पाळायचे आहेत ते शिकवावे.
अनुवाद 4 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: अनुवाद 4:5-14
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ