अनुवाद 34
34
मोशेचा मृत्यू
1नंतर मोशे मोआबाच्या सपाट मैदानातून यरीहोच्या समोरील नबो पर्वताच्या पिसगा नामक शिखरावर चढून गेला. तिथून सभोवार—गिलआदापासून दानपर्यंतचा—सर्व प्रदेश याहवेहने त्याला दाखविला, 2नफतालीचा संपूर्ण प्रदेश, एफ्राईम आणि मनश्शेह यांचे प्रदेश, त्यांच्या पलीकडे भूमध्य समुद्रापर्यंत पसरलेला तो यहूदीयाचा सर्व प्रदेश, 3नेगेव प्रांत व यार्देनेचे खोरे! आणि खजुरीच्या झाडांचे यरीहो शहर, सोअर प्रांतापर्यंत. 4मग याहवेह त्याला म्हणाले, “हाच तो वचनदत्त देश होय, ज्याचे मी अब्राहाम, इसहाक व याकोब यांना शपथपूर्वक वचन देऊन मी म्हटले होते, ‘मी हा देश त्यांच्या वंशजांना देईन.’ आता त्याला तू स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहेस, परंतु तू त्यात प्रवेश करणार नाहीस.”
5आणि याहवेहने सांगितल्याप्रमाणे, याहवेहचा सेवक मोशे मोआब देशात मरण पावला. 6याहवेहने त्याला मोआब देशातील बेथ-पौरजवळील खोर्यात पुरले, पण आजपर्यंत त्याला पुरले ते ठिकाण नक्की कुठे आहे हे कोणालाही ठाऊक नाही. 7मृत्युसमयी मोशे एकशेवीस वर्षांचा होता तरीही त्याची दृष्टी कमी झाली नव्हती, की त्याची शक्ती कमी झाली नव्हती. 8इस्राएली लोकांनी मोआबाच्या मैदानात मोशेसाठी विलाप करण्याचे तीस दिवस पूर्ण होईपर्यंत शोक केला.
9नूनाचा पुत्र यहोशुआ हा ज्ञानाच्या आत्म्याने परिपूर्ण होता, कारण मोशेने त्याजवर आपले हात ठेवले होते. म्हणून इस्राएली लोकांनी त्याचे ऐकले आणि याहवेहने मोशेला दिलेल्या आज्ञा ते पाळीत असत.
10मोशेसारखा संदेष्टा इस्राएलात पूर्वी झाला नाही, कारण याहवेह त्याच्याशी समोरासमोर बोलत असत, 11याहवेहच्या आज्ञेवरून त्याने इजिप्तमध्ये फारोह—त्याच्या दरबारातील लोक व संपूर्ण देशात आश्चर्यकारक चमत्कार केले. 12मोशेने इस्राएलसमोर जे महान सामर्थ्यशाली किंवा भयावह चमत्कार केले ते चमत्कार इतर कोणीही केले नाही.
सध्या निवडलेले:
अनुवाद 34: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.