YouVersion लोगो
सर्च आयकॉन

अनुवाद 11

11
याहवेहवर प्रीती करा व त्यांच्या आज्ञा पाळा
1याहवेह तुमच्या परमेश्वरावर प्रीती करावी आणि नेहमी त्यांचे विधी, त्यांचे नियम आणि त्यांच्या आज्ञा पाळाव्यात. 2तुम्ही आज हे स्मरणात ठेवा, तुमच्या मुलांनी याहवेह तुमच्या परमेश्वराचे अनुशासन पाहिले नाही आणि त्याचा अनुभव केला नाही—त्यांचे गौरव, सामर्थ्यशाली हात व पसरलेल्या भुजांचा; 3इजिप्तचा राजा फारोह व त्याच्या सर्व देशाच्या समक्षतेत याहवेहने केलेली चिन्हे आणि केलेल्या गोष्टी; 4इजिप्तचे सैन्य, त्यांचे रथ आणि घोडे जेव्हा तुमचा पाठलाग करीत आले, तेव्हा याहवेहने त्या सैन्याला तांबड्या समुद्रामध्ये कसे बुडवून टाकले व त्यांची कशी दुर्दशा केली. 5तुम्ही या ठिकाणी येईपर्यंत त्यांनी तुमच्यासाठी रानात काय केले, 6रऊबेनाचा वंशज एलियाब, याचे पुत्र दाथान व अबीराम यांचे त्यांनी काय केले, जेव्हा पृथ्वीने सर्व इस्राएली छावणीच्या मध्यभागी आपले तोंड उघडले आणि तिने त्यांना, त्यांच्या घरादारांना, त्यांच्या डेर्‍यांना आणि त्यांच्या सर्व मालकीचे सर्व जिवंत प्राणी कसे गिळून टाकले हे तुमच्या मुलांनी पाहिले नाही. 7परंतु याहवेहने केलेले हे सर्व महान कार्य तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे.
8म्हणून मी तुम्हाला आज देत असलेल्या सर्व आज्ञा पाळाव्या, म्हणजे यार्देन ओलांडून ज्या देशात तुम्ही प्रवेश करणार आहात, तो हस्तगत करण्यास तुम्हाला सामर्थ्य मिळेल. 9म्हणजे जो देश त्यांना व त्यांच्या वंशजांना देण्याविषयी याहवेहने तुमच्या पूर्वजांना वचन दिले होते, त्या दुधामधाच्या सुंदर देशात तुम्ही चिरकाल राहाल. 10कारण ज्या देशात तुम्ही प्रवेश करणार आहात व तो ताब्यात घेणार आहात, तो देश तुम्ही सोडून आलेल्या इजिप्त देशातील भूमीसारखा नाही. तिथे तुम्ही पेरणी केली व भाज्यांचे मळे लावण्यासाठी जलसिंचन केले. 11परंतु यार्देन ओलांडून जो देश ताब्यात घेण्यासाठी तुम्ही जात आहात, तो देश डोंगराचा व दर्‍याखोर्‍यांचा आहे, जो आकाशातून पडणारा पाऊस पितो. 12याहवेह तुमचे परमेश्वर स्वतः त्या भूमीची काळजी घेतात; वर्षाच्या आरंभापासून अखेरपर्यंत याहवेह तुमच्या परमेश्वराची नजर सतत त्या देशावर असते.
13आज मी तुम्हाला देत असलेल्या या सर्व आज्ञा जर तुम्ही अगदी विश्वासूपणे पाळाल—तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वरावर पूर्ण अंतःकरणाने व पूर्ण जिवाने प्रीती कराल व त्यांची सेवा कराल— 14तर मी आगोठीचा आणि वळवाचा पाऊस योग्य समयी पाठवेन, म्हणजे तुम्हाला धान्य, नवीन द्राक्षे व तेलासाठी जैतुनाच्या तेलाचा साठा करता येईल. 15मी तुमच्या गुरांसाठी हिरवीगार कुरणे देईन आणि तुम्हीही खाल आणि तृप्त व्हाल.
16पण सावध असावे, तुम्ही इतर दैवतांची उपासना व त्यांना नमन करण्याकडे बहकून जाऊ नये. 17तसे केल्यास याहवेहचा क्रोध तुम्हावर भडकेल आणि ते आकाशकपाटे बंद करतील, मग पाऊस पडणार नाही, भूमी आपला हंगामही देणार नाही आणि याहवेहने तुम्हाला दिलेल्या या उत्तम देशातून तुम्ही त्वरित नाश पावाल. 18यास्तव माझ्या या आज्ञा काळजीपूर्वक आपल्या मनात आणि अंतःकरणात साठवून ठेवा; त्या तुम्ही आपल्या हातावर चिन्ह म्हणून बांधून ठेवा आणि आपल्या कपाळपट्टीवर बांधा. 19त्या आपल्या मुलांना शिकवा. घरी बसलेले असताना, वाटेवर चालत असताना, झोपण्याच्या वेळी व झोपेतून उठल्यानंतर त्याबद्दल बोलत राहा. 20त्या तुमच्या घरातील दाराच्या चौकटीवर व तुमच्या फाटकांवर लिहाव्या, 21म्हणजे जितके दिवस पृथ्वीवर आकाश स्थित आहे, तितके तुमच्या पूर्वजांना याहवेहने देऊ केलेल्या वचनदत्त देशात तुमचे आणि तुमच्या मुलाबाळांचे दिवस असतील.
22मी तुम्हाला देत असलेल्या या सर्व आज्ञा तुम्ही काळजीपूर्वक पाळाल—याहवेह तुमच्या परमेश्वरावर प्रीती कराल, आज्ञाधारकपणे त्यांच्या मार्गावर चालत राहाल आणि त्यांना बिलगून राहाल— 23तर याहवेह या सर्व राष्ट्रांना तुमच्यापुढून घालवून देतील आणि तुमच्यापेक्षा कितीही मोठी आणि बलवान राष्ट्र असोत, तुम्ही त्यांना आपल्या ताब्यात घ्याल. 24तुम्ही जिथे पाऊल ठेवाल, ती प्रत्येक भूमी तुमची होईल: तुमच्या देशाची सीमा दक्षिणेकडील नेगेव प्रांतापासून लबानोन देशापर्यंत व फरात नदीपासून भूमध्य समुद्रापर्यंत पसरेल. 25तुमच्याविरुद्ध कोणीही उभे राहू शकणार नाही. कारण याहवेह तुमच्या परमेश्वराने वचन दिल्याप्रमाणे, तुम्ही जाल त्या ठिकाणी तुम्हाविषयी तेथील लोकात ते भय आणि दहशत निर्माण करतील.
26पाहा, मी आज तुमच्यापुढे आशीर्वाद व शाप ठेवीत आहे— 27याहवेह तुमच्या परमेश्वराच्या ज्या आज्ञा आज मी तुम्हाला देणार आहे, त्या जर तुम्ही पाळल्या, तर तुम्हाला आशीर्वाद मिळेल; 28आणि याहवेह तुमच्या परमेश्वराच्या आज्ञा न मानल्यास, आज मी तुम्हाला ज्या मार्गाने जाण्याची आज्ञा देत आहे त्यापासून भटकून जाल आणि जी दैवते तुम्हाला माहीत नाहीत अशांचे अनुसरण करण्यास सुरुवात कराल, तर तुम्हाला शाप मिळेल. 29याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला जेव्हा या देशाचा ताबा घेण्यासाठी आणतील, तेव्हा तुम्ही गरिज्जीम डोंगरावरून आशीर्वाद आणि एबाल डोंगरावरून शाप उच्चारावा. 30तुम्ही जाणता, हे डोंगर यार्देन नदीच्या पश्चिमेला असलेल्या कनानी लोकांच्या देशात आहेत. कनानी लोक जे अराबात गिलगाल या शहराजवळ असलेल्या ओसाड भागात राहतात. हे ठिकाण मोरेहच्या जवळील एला वृक्षांच्या राईपासून दूर नाही. 31तुम्ही यार्देन नदी ओलांडून याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला देत असलेला देश काबीज करण्यास जात आहात. तुम्ही तो ताब्यात घ्याल आणि तिथे वस्ती कराल, 32पण मी आज तुमच्यासमोर ठेवत असलेल्या सर्व विधी व नियम पाळण्याची खबरदारी तुम्ही घेतली पाहिजे.

सध्या निवडलेले:

अनुवाद 11: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन