कलस्सैकरांस 1
1
1परमेश्वराच्या इच्छेने ख्रिस्त येशूंचा प्रेषित झालेला पौल व बंधू तीमथ्य यांच्याकडून,
2कलस्सै शहरातील पवित्र लोक व ख्रिस्तामधील विश्वासू बंधू व भगिनीस,
आपले परमेश्वर पिता यांच्याकडून तुम्हाला कृपा व शांती असो.
उपकारस्तुती व प्रार्थना
3आम्ही तुम्हासाठी प्रार्थना करतो त्यावेळी परमेश्वराचे, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पित्याचे सतत आभार मानतो, 4कारण ख्रिस्त येशूंमध्ये असलेला तुमचा विश्वास, आणि परमेश्वराच्या सर्व लोकांवर असलेली तुमची प्रीती याबद्दल आम्ही ऐकले आहे. 5विश्वास व प्रीती यामुळे निर्माण होणारी आशा जी स्वर्गात तुम्हासाठी राखून ठेवली आहे व ज्याबद्दल तुम्ही शुभवार्तेच्या सत्याचा संदेश अगोदरच ऐकला आहे, 6ज्या दिवसापासून तुम्ही ती शुभवार्ता ऐकली व परमेश्वराची कृपा तुम्हाला त्याद्वारे समजून आली व तुमच्यामध्येही ती वाढत आहे, त्याचप्रमाणे ती आता जगभर वृद्धींगत होऊन फळ देत आहे. 7आमचा अतिप्रिय सहकारी एपफ्रास याच्याकडून तुम्ही शिकला, तो आमच्यावतीने ख्रिस्ताचा विश्वासू सेवक आहे. 8पवित्र आत्म्यामध्ये तुमची प्रीती याबद्दलही त्यानेच आम्हाला सांगितले.
9म्हणूनच आम्ही ज्या दिवशी तुमच्याविषयी ऐकले, तुमच्यासाठी प्रार्थना करण्याचे थांबविले नाही. आम्ही परमेश्वराजवळ सतत मागतो की त्यांनी तुम्हाला आत्म्याच्याद्वारे दिल्या जाणार्या सर्व बोधवचनांच्या आणि आकलनशक्तीच्या द्वारे त्यांच्या इच्छेच्या ज्ञानाने भरावे; 10त्यामुळे प्रभुला जे आवडेल असे योग्य जीवन तुम्हाला जगता येईल. ते प्रत्येक चांगल्या कृत्यांद्वारे फळ देणारे, परमेश्वराच्या ज्ञानात वाढणारे, 11धीर व सहनशक्ती ही अधिक रीतीने तुम्हाला प्राप्त व्हावी म्हणून त्यांच्या गौरवाच्या पराक्रमानुसार तुम्ही सर्वप्रकारच्या सामर्थ्याने समर्थ व्हावे, आणि आनंदाने 12त्या पित्याचे आभार मानणारे व्हा, ज्यांनी प्रकाशाच्या राज्यामध्ये असलेल्या पवित्र लोकांच्या वतनामध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला पात्र ठरविले आहे. 13कारण अंधकाराच्या सत्तेतून सोडवून त्यांनी आपल्याला त्यांच्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणले आहे, 14त्यांच्यामध्ये आपणास खंडणी, अर्थात् पापांची क्षमा मिळाली आहे.
परमेश्वराच्या पुत्राची सर्वश्रेष्ठता
15त्यांचा पुत्र हे अदृश्य परमेश्वराची प्रतिमा आहे, सर्व सृष्टीत प्रथम जन्मलेले आहे. 16त्यांच्यामध्ये सर्वगोष्टी निर्माण झाल्या: स्वर्गातील गोष्टी आणि पृथ्वीवरील, दृश्य आणि अदृश्य, मग ती सिंहासने किंवा अधिपत्य किंवा शासक किंवा अधिकारी असोत, प्रत्येक गोष्ट त्यांच्याद्वारे व त्यांच्यासाठी निर्माण करण्यात आली आहे. 17ते सर्व गोष्टींच्या पूर्वी आहे आणि त्यांच्यामध्ये सर्वगोष्टी स्थिर राहतात, 18आणि ते शरीराचे म्हणजे मंडळीचे मस्तक आहेत, तेच प्रारंभ आहेत; आणि तेच मेलेल्यामधून प्रथम जन्मलेले आहेत, यासाठी की ते प्रत्येक गोष्टींमध्ये सर्वश्रेष्ठ असावे. 19कारण परमेश्वराची प्रसन्नता यामध्येच होती की, त्यांची सर्व परिपूर्णता येशूंच्या ठायी वसावी, 20आणि त्यांच्या क्रूसावरील सांडलेल्या रक्ताद्वारे शांती प्रस्थापित करून स्वर्गात व पृथ्वीवरील सर्व गोष्टींचा त्यांच्याद्वारे समेट व्हावा.
21एकेकाळी तुम्ही परमेश्वराला परके असे होता आणि वाईट कृत्यामुळे मनाने त्यांचे वैरी झाला होता. 22परंतु आता त्यांनी ख्रिस्ताच्या भौतिक शरीराच्या मरणाद्वारे, तुमचा त्यांच्याशी समेट केला आहे, यासाठी की तुम्हाला त्यांच्या दृष्टीसमोर पवित्र निष्कलंक दोषरहित असे सादर करावे; 23जर तुम्ही तुमच्या विश्वासात दृढ व त्या शुभवार्तेमधील आशेपासून तुम्ही ढळला नाही तर स्थिर राहाल. जी शुभवार्ता तुम्ही ऐकली होती आणि जिची घोषणा जाहीरपणे आकाशाखाली प्रत्येक व्यक्तीला करण्यात आली होती, त्या शुभवार्तेचा मी पौल, सेवक झालो आहे.
पौलाचे मंडळीसाठी श्रम
24आता तुमच्यासाठी दुःख सहन करण्यात मला आनंद आहे; कारण ख्रिस्ताने, त्यांचे शरीर म्हणजे मंडळी हिच्याकरिता सोसलेल्या दुःखातले जे अद्यापि अपूर्ण राहिलेले आहे, ते मी माझ्या शरीरामध्ये भरून काढत आहे. 25तुम्हाला परमेश्वराचे वचन परिपूर्ण रीतीने कळावे व ते सादर करता यावे म्हणून मी तिचा सेवक झालो असून माझी नेमणूक करण्यात आली आहे. 26त्यांनी जे रहस्य युगानुयुग व पिढ्यानपिढ्या गुप्त ठेवले होते, परंतु आता ते प्रभुच्या लोकांना प्रकट केले आहे. 27त्यांना परमेश्वराने यासाठी निवडले की, त्यांच्या गौरवाच्या संपत्तीचे रहस्य, म्हणजे तुमच्या गौरवाची आशा, जे ख्रिस्त तुम्हामध्ये आहेत, त्यांना गैरयहूद्यांमध्ये प्रकट करावे.
28ते हेच आहे ज्याची आम्ही घोषणा करतो व बोध करून ज्ञानाने प्रत्येकास शिकवितो, यासाठी की प्रत्येकाला ख्रिस्तामध्ये परिपक्व असे सादर करावे. 29त्यांचे जे सामर्थ्य मजमध्ये अतिशय प्रबळरीत्या कार्य करते, त्यानुसार मी झटून परिश्रम करीत आहे.
सध्या निवडलेले:
कलस्सैकरांस 1: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
मराठी समकालीन आवृत्ती™, नवीन करार
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे. सर्व अधिकार जगभरात राखीव.
Marathi Contemporary Version™, New Testament
Copyright © 1978, 1982, 2008, 2022 by Biblica, Inc.
Used with permission. All rights reserved worldwide.