यानंतर पुष्कळ दिवस झाल्यावर, यहूद्यांनी त्याला जिवे मारण्याचा कट केला, परंतु शौलाला त्यांची योजना समजली. त्याला मारून टाकण्यासाठी रात्रंदिवस ते शहराच्या द्वारावर नजर ठेऊन होते. परंतु त्याच्या अनुयायांनी त्याला रात्रीच नेऊन टोपलीत बसविले आणि शहराच्या भिंतीतील झरोक्यातून खाली उतरविले. तो यरुशलेममध्ये आल्यावर, येशूंच्या शिष्यांबरोबर सामील होण्याचा त्याने प्रयत्न केला, परंतु त्या सर्वांना त्याचे भय वाटत होते, कारण तो खरोखर शिष्य आहे, या गोष्टीवर त्यांचा विश्वास नव्हता. परंतु बर्णबाने त्याला प्रेषितांपुढे आणले आणि कशाप्रकारे दिमिष्क रस्त्यावर शौलाला प्रभूचे दर्शन झाले आणि प्रभूने त्याला काय सांगितले आणि दिमिष्क येथे त्याने निर्भयपणाने येशूंच्या नावामध्ये शुभवार्ता कशी सांगितली, हे सर्व त्यांना कथन केले. शौल त्यांच्याबरोबर तिथे राहिला व यरुशलेममध्ये मोकळेपणाने फिरू लागला, प्रभूच्या नावामध्ये धैर्याने बोलू लागला. तो ग्रीक यहूद्यांशी बोलत असे व वादविवाद करीत असे, परंतु त्यांनी त्याचा घात करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा इतर विश्वासणार्यांनी यासंबंधी ऐकले, तेव्हा त्यांनी त्याला कैसरीयास नेले आणि नंतर तिथून तार्सस येथे त्याची रवानगी केली. नंतर यहूदीया, गालील आणि शोमरोन या प्रांतातील सर्व मंडळ्यांना शांतता लाभली आणि ते विश्वासात दृढ झाले. प्रभूचे भय धरून राहिल्यामुळे आणि पवित्र आत्म्याच्या प्रोत्साहनामुळे त्यांच्या संख्येत वाढ झाली. पेत्र त्या देशात प्रवास करीत असताना, प्रभूच्या लोकांना भेटण्यासाठी तो लोद गावात आला. तिथे त्याला एनियास नावाचा एक मनुष्य भेटला, तो पक्षघाती असून आठ वर्षे बिछान्याला खिळून होता. पेत्र त्याला म्हणाला, “एनियास, येशू ख्रिस्ताने तुला बरे केले आहे. ऊठ आणि आपले अंथरूण गुंडाळ.” तेव्हा एनियास तत्काळ उठला. लोद व शारोन या शहरात राहणार्या सर्व लोकांनी एनियासला पाहिले आणि ते प्रभूकडे वळले. आता योप्पामध्ये टबीथा या नावाची शिष्या राहत होती, ग्रीक भाषेमध्ये तिचे नाव दुर्कस असे होते; ती सदैव गरिबांची मदत व चांगली कृत्ये करीत असे. याच सुमारास ती आजारी पडून मरण पावली आणि तिचा देह धुऊन स्वच्छ केला आणि माडीवरील खोलीत ठेवला होता. लोद योप्पाच्या जवळ होते; जेव्हा शिष्यांनी ऐकले की पेत्र लोद गावी आला आहे, तेव्हा त्यांनी त्याच्याकडे दोन माणसे पाठवून, “ताबडतोब या” अशी त्याला विनवणी केली. पेत्र त्यांच्याबरोबर गेला. तो आल्यावर त्याला माडीवरील खोलीत नेण्यात आले. सर्व विधवा तिच्याभोवती उभ्या राहून शोक करीत होत्या आणि दुर्कस जिवंत असताना तिने त्यांच्यासाठी तयार केलेले अंगरखे आणि इतर वस्त्रे त्यांनी पेत्राला दाखविली. पेत्राने सर्वांना खोली बाहेर जाण्यास सांगितले; मग त्याने गुडघे टेकून प्रार्थना केली. मग मृत स्त्रीकडे वळून तो म्हणाला, “टबीथा, ऊठ.” तिने आपले डोळे उघडले आणि पेत्राला पाहून ती उठून बसली. त्याने आपला हात पुढे करून तिला पायांवर उभे राहण्यास मदत केली. नंतर त्याने विश्वासणार्यांना, विशेषकरून विधवांना आत बोलाविले आणि त्यांच्यापुढे तिला जिवंत सादर केले. ही घटना योप्पामध्ये समजली आणि अनेकांनी प्रभूवर विश्वास ठेवला. पेत्र योप्पा येथे शिमोन नावाच्या चांभाराच्या घरी बरेच दिवस राहिला.
प्रेषित 9 वाचा
ऐका प्रेषित 9
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: प्रेषित 9:23-43
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ