YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषित 22:1-16

प्रेषित 22:1-16 MRCV

“बंधुंनो व वडीलजनांनो, माझ्या बचावाचे भाषण ऐकून घ्या.” तो इब्री भाषेत बोलत आहे, हे ऐकून स्तब्धता अधिकच वाढली. तेव्हा पौल बोलू लागला: “मी एक यहूदी आहे आणि माझा जन्म किलिकियामधील तार्सस शहरात झाला, परंतु मी या शहरात वाढलो. माझे शिक्षण गमालियेल याच्या मार्गदर्शनात झाले व आपल्या पूर्वजांच्या नियमशास्त्राचे सविस्तर प्रशिक्षण मला मिळाले. जसे तुम्ही आज परमेश्वराविषयी आवेशी आहात तसाच मीही होतो. ज्यांनी या मार्गाचे अनुसरण केले होते, त्यांना मरण येईपर्यंत मी त्यांचा छळ केला, स्त्री व पुरुष दोघांनाही बांधून तुरुंगात टाकीत होतो. प्रमुख याजक व येथे असलेले सर्व सभासद, ते स्वतः याबाबतीत साक्ष देऊ शकतात की, मी त्यांच्याकडून दमास्कस येथील सभेच्या सदस्यांना दाखविण्यासाठी तशी पत्रेसुद्धा मिळविली होती आणि या लोकांना बंदिवान करून यरुशलेम येथे आणून त्यांना शिक्षा केली जावी यासाठी तेथे गेलो. “दुपारच्या समयी मी दमास्कसच्या जवळ आलो असताना, अकस्मात आकाशातून माझ्याभोवती प्रकाश चकाकताना पाहिला. मी जमिनीवर पडलो, तेव्हा इब्री भाषेत बोलणारी वाणी मी ऐकली, ‘शौला! शौला! तू माझा छळ का करीत आहेस?’ “ ‘प्रभो, आपण कोण आहात?’ मी विचारले. “प्रभुने मला उत्तर दिले, ‘मी नासरेथकर येशू आहे, ज्याचा तू छळ करीत आहेस, तोच मी आहे,’ माझ्या सहकार्‍यांनी प्रकाश पाहिला, परंतु जे माझ्याशी बोलत होते त्यांची वाणी त्यांनी ओळखली नाही. “मी विचारले, ‘प्रभू मी काय करावे?’ “प्रभू म्हणाले, ‘आता उठून उभा राहा आणि दमास्कसमध्ये जा, जे काही तुला करावयाचे आहे, ते तुला तेथे सांगण्यात येईल.’ त्या प्रखर प्रकाशामुळे मी आंधळा झालो होतो म्हणून माझ्या सोबत्यांनी मला दमास्कस या ठिकाणी हाताशी धरून नेले. “हनन्या नावाचा माणूस मला भेटावयास आला. तो नियमशास्त्राचे अचूक पालन करणारा होता व सर्व यहूदी लोकांचे त्याच्याबद्दल फारच चांगले मत होते. तो माझ्याजवळ उभा राहून म्हणाला, ‘बंधू शौल, तुला दृष्टी प्राप्त होवो!’ आणि त्याच क्षणाला मी त्याला पाहू शकलो. “नंतर त्याने मला असे सांगितले: ‘आपल्या पूर्वजांच्या परमेश्वराने तुझी निवड यासाठी केली आहे की तू त्यांची इच्छा जाणून घ्यावीस आणि जे नीतिमान आहेत त्यांना पाहावेस व त्यांच्या तोंडचे शब्द ऐकावेस. तू जे पाहिले व ऐकले आहेस त्याविषयी तू सर्व मनुष्यांना साक्षी होशील. आणि आता विलंब कशासाठी? जा, आणि बाप्तिस्मा घे आणि त्याच्या नावाने धावा करून आपल्या पापांपासून शुद्ध हो.’

प्रेषित 22 वाचा

प्रेषित 22:1-16 साठी चलचित्र