YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषित 21:15-40

प्रेषित 21:15-40 MRCV

यानंतर आम्ही यरुशलेमकडे जाण्यास निघालो. कैसरीयातील काही शिष्य आमच्याबरोबर आले आणि त्यांनी आम्हाला जिथे राहणार होतो त्या म्नासोनच्या घरी आणले. हा मनुष्य सायप्रसचा असून प्रारंभीच्या शिष्यांपैकी एक होता. आम्ही यरुशलेममध्ये आल्यावर विश्वासणार्‍यांनी आमचे प्रेमाने स्वागत केले. दुसर्‍या दिवशी पौल व आम्ही याकोबास भेटण्यास गेलो. तिथे सर्व वडीलजनही उपस्थिती होते. क्षेमकुशल विचारल्यानंतर पौलाने आपल्या सेवेद्वारे परमेश्वराने गैरयहूद्यांमध्ये जे कार्य केले होते त्याचा सविस्तर अहवाल दिला. त्यांनी हे ऐकले व परमेश्वराची स्तुती केली. नंतर ते पौलाला म्हणाले: “हे पाहा बंधू, हजारो यहूद्यांनी विश्वास ठेवला आहे आणि ते सर्वजण नियमशास्त्राच्या बाबतीत उत्साही आहेत. तुझ्याविषयी त्यांना असे कळविण्यात आले आहे की, तू गैरयहूदी लोकांमध्ये राहणार्‍या सर्व यहूदीयांस मोशेपासून फिरा आणि आपल्या मुलांची सुंता करू नका किंवा आपल्या रूढी व प्रथांप्रमाणे राहू नका असे शिकवितोस. तर आम्ही आता काय करावे? कारण तू येथे आला आहेस हे ते खात्रीने ऐकतील, तेव्हा आम्ही सांगतो ते कर. नवस केलेले असे आमच्यात चौघेजण आहेत. तर तू या माणसांना घेऊन शुद्धीकरणाचा विधी पूर्ण कर आणि त्यांच्या मुंडणाचा खर्च कर, म्हणजे ते त्यांच्या डोक्यांचे मुंडण करू शकतील व प्रत्येकाला समजेल की तू स्वतःसुद्धा नियमशास्त्र पाळतोस आणि तुझ्याबद्दलच्या अहवालात जे सांगितलेले आहे, त्यात काही तथ्य नाही. गैरयहूदी विश्वासणार्‍यांबद्दल म्हणशील तर आम्ही आमचा निर्णय त्यांना लिहून कळविला आहे की त्यांनी मूर्तींना अर्पिलेले अन्न खाण्यापासून, रक्त सेवन करण्यापासून, गळा दाबून मारलेल्या प्राण्यांचे मांस खाण्यापासून आणि वेश्यागमन यापासून स्वतःला दूर ठेवावे.” दुसर्‍या दिवशी पौलाने त्या माणसांना घेऊन त्यांच्याबरोबर स्वतःस शुद्ध करून घेतले. जेव्हा त्यांच्या शुद्धीकरणाच्या विधीचे दिवस समाप्त होतील आणि त्यांच्यातील प्रत्येकासाठी अर्पण करावे लागेल, त्या तारखेची सूचना देण्यासाठी तो मंदिरात गेला. ते सात दिवस अंदाजे संपत आलेले असताना, आशियातून आलेल्या काही यहूद्यांनी पौलाला मंदिरात पाहिले. तेव्हा त्यांनी सर्व जमावाला चिथविले व त्याला पकडले, ते मोठ्याने ओरडत म्हणाले, “अहो इस्राएल लोकहो, आमची मदत करा! हा मनुष्य प्रत्येकाला प्रत्येक ठिकाणी आपल्या लोकांविरुद्ध, आपल्या नियमांविरुद्ध व या स्थळाबद्दल शिकवण देतो आणि याशिवाय या मनुष्याने गैरयहूदी लोकांना येथे आणून हे पवित्र मंदिर भ्रष्ट केले आहे.” या आधी त्यांनी पौलाला इफिस येथील त्रोफिमबरोबर शहरात पाहिले होते आणि पौलाने त्याला मंदिरात आणले असावे असा त्यांचा समज झाला होता. तेव्हा सर्व शहर खळबळून गेले आणि सर्व बाजूंनी लोक धावत आले. पौलाला जबरदस्तीने पकडून मंदिरातून ओढून काढण्यात आले आणि तत्काळ दरवाजे बंद करण्यात आले. ते त्याला ठार करण्याच्या विचारात होते, एवढ्यात रोमी लष्करी ठाण्याच्या सेनापतीकडे बातमी गेली की सर्व यरुशलेममध्ये गोंधळ माजला आहे. तेव्हा तो त्वरित आपल्या सैनिकांना व अधिकार्‍यांना घेऊन धावत समुदायाकडे गेला. मारणार्‍यांनी सेनापतीला व फौजेला येताना पाहिल्याबरोबर पौलाला फटके मारण्याचे थांबविले. सेनापतीने येऊन त्याला अटक केली आणि दोन साखळ्यांनी त्याला बांधण्यात यावे अशी आज्ञा केली. नंतर त्याने तो कोण होता आणि त्याने काय केले होते याची चौकशी केली. तेव्हा समुदायातील काही लोक एक आणि इतर दुसरे काहीतरी म्हणत होते. या गलबल्यामुळे सेनापतीला खरे ते काही कळेना, म्हणून त्याने पौलाला बराकीत नेण्याचा हुकूम दिला. पौल पायर्‍यांपर्यंत पोहोचला, त्यावेळी लोकांची हिंसा एवढी वाढली की होती की सैनिकांना त्याला उचलून न्यावे लागले. त्याच्यामागे चालत येणारा लोकसमुदाय सारखा ओरडत होता, “याची विल्हेवाट लावा!” पौलाला सैनिक आता बराकीत नेणार, एवढ्यात तो सेनापतीला म्हणाला, “मी आपल्याबरोबर काही बोलू शकतो काय?” त्याने त्याला विचारले. “तुला ग्रीक भाषा येते काय? ज्या इजिप्तच्या मनुष्याने थोड्या दिवसांपूर्वी बंड उठवून चार हजार दहशतवाद्यांस रानात नेले होते, तो तूच आहेस नाही का?” पौलाने उत्तर दिले, “मी यहूदी आहे व किलिकियातील तार्सस शहराचा नागरिक असून, माझे शहर सर्वसामान्य नाही. कृपा करून या लोकांबरोबर मला बोलू द्यावे.” सेनापतीची परवानगी मिळाल्यावर, पौल पायर्‍यांवर उभा राहिला आणि लोकांनी शांत राहवे, असे त्याने हाताने खुणावले. ते सर्व शांत झाल्यावर, तो इब्री भाषेत म्हणाला

प्रेषित 21:15-40 साठी चलचित्र