YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषित 21:1-14

प्रेषित 21:1-14 MRCV

शेवटी आम्ही अतिदुःखाने रडून त्यांचा निरोप घेतल्यावर, जहाजातून प्रवास करीत सरळ कोस येथे गेलो. दुसर्‍या दिवशी आम्ही रुदा येथे गेलो आणि तिथून पातराला गेलो. तिथे आम्हाला फेनिके प्रांताकडे जाणारे जहाज दिसल्यावर, आम्ही त्या जहाजात बसून पुढे प्रवासाला निघालो. जाताना आम्हाला सायप्रस बेट दिसले आणि त्याच्या दक्षिणेकडे जाऊन आम्ही पुढे सीरियातील सोर बंदरात उतरलो, कारण तिथे जहाजातील सामान खाली करावयाचे होते. तिथे आम्ही शिष्यांना शोधून काढले, मग तिथे त्यांच्याबरोबर आम्ही सात दिवस राहिलो. त्यांनी आत्म्याद्वारे पौलाला यरुशलेमकडे न जाण्याचा आग्रह केला. परंतु जेव्हा आम्हाला जाण्याची वेळ आली, तेव्हा तेथील सर्वजण पत्नी आणि लेकरांसोबत आमच्याबरोबर चालत शहराच्या सीमेपर्यंत आले आणि तिथे समुद्रकिनार्‍यावर आम्ही गुडघे टेकून प्रार्थना केली. एकमेकांचा निरोप घेतल्यानंतर आम्ही जहाजात चढलो आणि ते घरी परत गेले. सोरापासूनचा जलप्रवास आम्ही चालू ठेवला व त्यानंतर आम्ही प्टोलेमाईस येथे उतरलो. तेथील बंधू, भगिनींची आम्ही भेट घेतली आणि एक दिवस त्यांच्याबरोबर राहिलो. दुसर्‍या दिवशी आम्ही निघालो व कैसरीया येथे पोहोचलो आणि सुवार्तिक फिलिप्पाच्या घरी राहिलो, तो सात जणांपैकी एक होता. त्याला चार अविवाहित कन्या होत्या, त्या भविष्यवाणी करीत असत. आम्ही अनेक दिवस तिथे राहिल्यानंतर, एक अगब नावाचा संदेष्टा यहूदीया येथून तिथे आला. आम्हाकडे येऊन त्याने पौलाचा कमरबंद घेतला व स्वतःचे हातपाय बांधून तो म्हणाला, “पवित्र आत्मा म्हणतो, ‘हा कमरबंद ज्या मनुष्याचा आहे त्याला यरुशलेममधील यहूदी पुढारी असेच बांधून गैरयहूदीयांच्या हाती देतील.’ ” हे ऐकल्यानंतर आम्ही आणि लोकांनी पौलाला यरुशलेमला न जाण्याची विनंती केली. पौल म्हणाला, “तुम्ही रडून माझे हृदय का तोडता? यरुशलेममध्ये केवळ तुरुंगात पडण्याचीच माझी तयारी नाही, तर प्रभू येशूंच्या नावासाठी मरण्यास देखील मी तयार आहे.” त्याचे मन वळत नाही हे पाहून आम्ही म्हणालो, “प्रभूच्या इच्छेप्रमाणे होवो.”

प्रेषित 21:1-14 साठी चलचित्र