2 शमुवेल 6
6
कोश यरुशलेम आणला जातो
1दावीदाने पुन्हा इस्राएलातील सर्व सक्षम तरुण माणसांना एकत्र आणले, ते तीस हजार होते. 2दावीद व त्याची सर्व माणसे, यहूदीयातील बालाह#6:2 म्हणजेच किर्याथ-यआरीम येथून परमेश्वराचा कोश जो सर्वसमर्थ याहवेह, जे करुबांमध्ये आरूढ आहेत त्यांच्या नावाने ओळखला जात असे, तो कोश आणण्यासाठी निघाले. 3त्यांनी परमेश्वराचा कोश एका नवीन गाडीत ठेवला व तो डोंगरावर असलेल्या अबीनादाबाच्या घरातून बाहेर आणला. अबीनादाबाचे पुत्र उज्जा आणि अहियो नवीन गाडी चालवित होते 4अबीनादाबाच्या डोंगरावरील घरातून परमेश्वराचा कोश त्या गाडीवर ठेवून, अहियो त्यापुढे चालत होता. 5दावीद आणि इस्राएलचे सर्व लोक त्यांच्या सर्व शक्तीने याहवेहसमोर चिपळ्या,#6:5 काही मूळ प्रतींनुसार गाणे गात सनोवर लाकडापासून बनविलेले वीणा, सारंगी, डफ, डमरू, झांजा वाजवित आनंद करीत होते.
6जेव्हा ते नाकोनच्या खळ्याजवळ आले तेव्हा बैल अडखळले आणि परमेश्वराचा कोश धरण्यासाठी उज्जाहने आपला हात पुढे केला. 7त्याच्या या आदरहीन कृत्यामुळे याहवेहचा कोप उज्जाहविरुद्ध पेटला; म्हणून परमेश्वराने त्याला मारून टाकले आणि तो तिथे परमेश्वराच्या कोशाच्या बाजूला मरण पावला.
8तेव्हा दावीदाला राग आला कारण याहवेहचा क्रोध उज्जाहवर भडकला होता आणि आजपर्यंत त्या ठिकाणाला पेरेस-उज्जाह#6:8 पेरेस-उज्जाह अर्थात् उज्जाहविरुद्ध उद्रेक असे म्हणतात.
9त्या दिवशी दावीदाला याहवेहचे भय वाटले आणि तो म्हणाला, “आता याहवेहचा कोश माझ्याकडे कसा येणार?” 10याहवेहचा कोश त्याच्याबरोबर दावीदाच्या नगरात घेऊन जाण्यास त्याची इच्छा नव्हती. त्याऐवजी, त्याने तो गित्ती ओबेद-एदोम याच्या घरी नेला. 11याहवेहचा कोश गित्ती ओबेद-एदोम याच्या घरात तीन महिने राहिला आणि याहवेहने त्याला आणि त्याच्या संपूर्ण घराण्यास आशीर्वाद दिला.
12दावीद राजाला असे सांगण्यात आले की, “याहवेहने ओबेद-एदोमच्या घराण्यास व त्याचे जे काही आहे त्यास, परमेश्वराच्या कोशामुळे आशीर्वादित केले आहे,” तेव्हा परमेश्वराचा कोश ओबेद-एदोमच्या घरापासून दावीदाच्या नगरात आणावा म्हणून दावीद आनंद करीत गेला. 13याहवेहचा कोश वाहून नेणारे जेव्हा सहा पावले पुढे गेले, तेव्हा त्याने एक बैल आणि एक पुष्ट वासरू यांचा यज्ञ केला. 14तागाचे एफोद परिधान करून दावीद त्याच्या सर्व शक्तीने याहवेहसमोर नाचत होता, 15दावीद आणि सर्व इस्राएली लोक आनंदाचा जयघोष करीत आणि रणशिंगांचा नाद करीत याहवेहचा कोश आणत होते.
16याहवेहचा कोश दावीदाच्या नगरात प्रवेश करीत असताना, शौलाची कन्या मीखल हिने खिडकीतून पाहिले. आणि जेव्हा तिने दावीद राजाला याहवेहसमोर उड्या मारत आणि नाचत असता पाहिले, तेव्हा तिने तिच्या अंतःकरणात त्याचा तिरस्कार केला.
17त्यांनी याहवेहचा कोश आणला आणि दावीदाने त्यासाठी जो तंबू तयार केला होता त्या ठिकाणी तो ठेवला, आणि दावीदाने याहवेहसमोर होमार्पणे व शांत्यर्पणे सादर केली. 18होमार्पणे व शांत्यर्पणे सादर केल्यानंतर, दावीदाने लोकांना सर्वसमर्थ याहवेहच्या नावाने आशीर्वाद दिला. 19नंतर त्याने तिथे जमलेल्या इस्राएली लोकांच्या समुदायातील प्रत्येक स्त्री व पुरुषास एक भाकर, खजुराची एक ढेप, मनुक्याची एक वडी दिली, मग सर्व लोक आपआपल्या घरी गेले.
20दावीद जेव्हा आपल्या घराण्याला आशीर्वाद देण्यासाठी घरी परतला, तेव्हा शौलाची मुलगी मीखल त्याला भेटण्यास बाहेर आली आणि म्हणाली, “आज इस्राएलाच्या राजाने एखाद्या असभ्य माणसाप्रमाणे आपल्या चाकरांच्या कन्यांसमोर अर्धनग्न अवस्थेत फिरून स्वतःस किती प्रतिष्ठित केले आहे!”
21दावीद मीखलला म्हणाला, “ते याहवेहच्या समोर झाले, ज्यांनी तुझ्या पित्याच्या किंवा त्याच्या घराण्यातील इतर कोणाच्या ऐवजी माझी निवड करून याहवेहच्या इस्राएली लोकांवर मला राज्यकर्ता म्हणून नेमले; तर मी याहवेहसमोर आनंद साजरा करेन. 22मी यापेक्षाही अधिक अप्रतिष्ठित होईन आणि मी माझ्या स्वतःच्या दृष्टीने अपमानित होईन. परंतु या गुलाम मुलींद्वारे ज्यांच्याबद्दल तू बोललीस, त्या माझा सन्मान करतील.”
23आणि शौलाची मुलगी मीखल हिला तिच्या मृत्यूच्या दिवसापर्यंत संतती झाली नाही.
सध्या निवडलेले:
2 शमुवेल 6: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.