YouVersion लोगो
सर्च आयकॉन

2 शमुवेल 4

4
इश-बोशेथ याचा वध
1जेव्हा शौलाचा पुत्र इश-बोशेथ याने ऐकले की, अबनेर हेब्रोन येथे मरण पावला आहे, तेव्हा त्याचे धैर्य सुटले आणि सर्व इस्राएली सावध झाले. 2इकडे शौलाच्या पुत्राकडे दोन माणसे होती, ते छापा घालणाऱ्या तुकड्यांचे पुढारी होते. एकाचे नाव बाअनाह आणि दुसऱ्याचे रेखाब असे होते; ते बिन्यामीन गोत्रातील, बैरोथ वंशाच्या रिम्मोनचे पुत्र होते, बैरोथ हा बिन्यामीनचा भाग समजला जातो, 3कारण बैरोथ येथील लोक गित्ताइमला पळून गेले आणि आजपर्यंत परदेशी म्हणून तिथेच निवासी झाले आहेत.
4(शौलाचा पुत्र योनाथानचा एक पुत्र होता तो दोन्ही पायांनी अधू होता. येज्रील येथून शौल आणि योनाथान यांच्याविषयी वर्तमान आले, तेव्हा तो पाच वर्षाचा होता. त्याची दाई त्याला घेऊन पळाली, परंतु ती निघण्याच्या घाईत असताना तो पडला आणि अपंग झाला. त्याचे नाव मेफीबोशेथ असे होते.)
5आता बैरोथ येथील रिम्मोनचे पुत्र रेखाब आणि बाअनाह हे प्रवासाला निघाले आणि इश-बोशेथ मध्यानाच्या वेळी, दुपारची विश्रांती घेत होता, तेव्हा हे त्याच्या घरी आले. 6गहू घेत आहेत असे दाखवित ते घराच्या आतील भागात गेले आणि त्यांनी त्याच्या पोटावर वार केला. नंतर रेखाब आणि त्याचा भाऊ बाअनाह तिथून निसटून गेले.
7ते जेव्हा घरामध्ये गेले होते त्यावेळेस तो त्याच्या झोपण्याच्या खोलीत पलंगावर विश्रांती घेत होता. तेव्हा त्यांनी त्याच्यावर वार करून त्याला जिवे मारले, त्यांनी त्याचे डोके छेदले व ते घेऊन रात्रभर अराबाहच्या मार्गाने प्रवास करीत गेले. 8त्यांनी इश-बोशेथचे डोके हेब्रोनात दावीदाकडे आणले आणि राजाला म्हणाले, “हे पाहा, तुमचा शत्रू शौल ज्याने तुम्हाला जिवे मारावयास पाहिले, त्याचा पुत्र इश-बोशेथ याचे डोके. आज याहवेहने माझ्या धनीराजाच्या विरुद्ध शौल आणि त्याच्या संतानाचा सूड घेतला आहे.”
9दावीदाने रिम्मोन बैरोथ याचे पुत्र रेखाब आणि बाअनाह यांना उत्तर दिले, “ज्यांनी मला प्रत्येक संकटातून सोडविले आहे, त्या याहवेहची शपथ, 10आपण चांगले वर्तमान आणले आहे हे समजून मला एका व्यक्तीने सांगितले, ‘शौल मेला आहे’ तेव्हा मी त्याला सिकलाग येथे धरून मारून टाकले. त्याने आणलेल्या वर्तमानासाठी त्याला मी हे प्रतिफळ दिले! 11तर आता दुष्ट पुरुषांनी एका निर्दोष व्यक्तीला त्याच्या घरात, त्याच्याच पलंगावर जिवे मारले आहे; मी किती विशेषकरून तुमच्या हातून त्याच्या रक्ताचा जाब घ्यावा आणि तुम्हाला या पृथ्वीतून नष्ट करावे!”
12तेव्हा दावीदाने त्याच्या माणसांना आज्ञा दिली आणि त्यांनी त्यांना जिवे मारले. त्यांनी त्यांचे हात आणि पाय तोडून टाकले आणि त्यांची शरीरे हेब्रोन येथील तळ्याजवळ टांगली. परंतु त्यांनी इश-बोशेथचे डोके घेतले आणि ते हेब्रोन येथे अबनेरच्या कबरेत पुरले.

सध्या निवडलेले:

2 शमुवेल 4: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन