2 शमुवेल 21
21
गिबियोनी लोकांचा सूड
1दावीदाच्या कारकिर्दीत लागोपाठ तीन वर्षे दुष्काळ पडला होता; म्हणून दावीद याहवेहसमोर गेला. याहवेह म्हणाले, “हे शौल आणि त्याच्या रक्तदोषी घराण्यामुळे आहे; कारण त्याने गिबोनी लोकांना मारले होते.”
2तेव्हा राजाने गिबोनी लोकांस बोलावून घेतले आणि त्यांना म्हटले. (गिबोनी लोक इस्राएलचा भाग नव्हते, परंतु अमोरी लोकांतून उरलेले लोक होते; त्यांना जिवंत ठेवावे अशी इस्राएली लोकांनी शपथ घेतली होती, परंतु इस्राएल आणि यहूदाह यांच्याबद्दल असलेल्या त्याच्या आवेशामुळे शौलाने त्यांना नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता.) 3दावीदाने गिबोनी लोकांना विचारले, “मी तुमच्यासाठी काय करावे? कशाप्रकारे मी प्रायश्चित करावे की तुम्ही याहवेहच्या वतनाला आशीर्वाद द्याल?”
4गिबोनी लोकांनी राजाला उत्तर दिले, “शौल आणि त्याच्या घराण्याकडून आम्ही चांदी किंवा सोन्याची मागणी करावी असा अधिकार आम्हाला नाही, किंवा इस्राएलातील कोणालाही जिवे मारण्याचा अधिकार आम्हाला नाही.”
दावीदाने विचारले, “मग तुमच्यासाठी मी काय करावे अशी तुमची इच्छा आहे?”
5त्यांनी राजाला उत्तर दिले, “ज्या मनुष्याने आमचा नाश केला आणि आमची संख्या कमी व्हावी आणि इस्राएलमध्ये कुठेही आम्हाला स्थान नसावे म्हणून आमच्याविरुद्ध योजना केली, 6तर आता त्याच्या वंशातील सात पुरुषांना आमच्याकडे द्यावे म्हणजे शौल जो याहवेहद्वारे निवडला गेला होता, त्याच्या गिबियाहमध्ये आम्ही त्यांना मारून टाकून त्यांची शरीर तिथे उघडे टाकू.”
तेव्हा राजा म्हणाला, “मी त्यांना तुमच्या हाती देईन.”
7शौलाचा पुत्र योनाथान व दावीदामध्ये याहवेहसमोर झालेल्या शपथेमुळे राजाने शौलाचा पुत्र योनाथान याचा पुत्र मेफीबोशेथ याची गय केली. 8परंतु अय्याहची कन्या रिजपाह हिचे दोन पुत्र अरमोनी आणि मेफीबोशेथ जे तिला शौलापासून झाले होते, त्याबरोबर शौलाची कन्या मीखल#21:8 काही मूळ प्रतींनुसार मेरब हिचे पाच पुत्र जे तिला महोलाथी बारजिल्लई याचा पुत्र अद्रीएल याच्यापासून झाले होते यांना राजाने घेतले. 9त्याने त्यांना गिबोनी लोकांच्या हाती सोपवून दिले, ज्यांनी त्यांना मारून टाकले आणि त्यांची शरीरे डोंगरावर याहवेहसमोर प्रदर्शित केली. ते सातही जण एकत्र मरण पावले; हंगामाच्या सुरवातीच्या दिवसांमध्ये त्यांना मारण्यात आले होते, जेव्हा जवाच्या हंगामाची सुरुवात झाली होती.
10तेव्हा अय्याहची मुलगी रिजपाह हिने गोणपाट घेतले, आणि ते स्वतःसाठी खडकावर पसरविले. हंगामाच्या सुरुवातीपासून त्या शरीरावर आकाशातून पाऊस पडेपर्यंत, तिने दिवसा पक्ष्यांना आणि रात्री जंगली प्राण्यांना त्या शवांना स्पर्श करू दिला नाही. 11अय्याहची कन्या रिजपाह, जी शौलाची उपपत्नी होती तिने जे केले ते दावीदाला कळले, 12दावीद गेला आणि याबेश-गिलआद येथील नागरिकांकडून शौल आणि त्याचा पुत्र योनाथान यांच्या अस्थी घेतल्या. (त्यांनी त्यांची शरीरे बेथ-शान नगराच्या चौकातून चोरली होती, जिथे पलिष्ट्यांनी शौलाला गिलबोआत मारून टाकल्यानंतर त्यांना तिथे टांगले होते.) 13तेव्हा दावीदाने शौल आणि त्याचा पुत्र योनाथान यांच्या अस्थी तिथून आणल्या आणि ज्यांना मारून टाकून डोंगरावर प्रदर्शित केले होते त्यांच्या अस्थी सुद्धा गोळा केल्या.
14त्यांनी बिन्यामीन प्रांतातील सेला येथे शौल व त्याचा पुत्र योनाथान यांच्या अस्थी, शौलाचा पिता कीश याच्या कबरेत पुरल्या आणि राजाने आज्ञापिल्याप्रमाणे सर्वकाही केले, त्यानंतर देशाच्या वतीने केलेल्या प्रार्थनेचे परमेश्वराने उत्तर दिले.
पलिष्ट्यांविरुद्ध युद्ध
15पुन्हा एकदा पलिष्टी आणि इस्राएल यांच्यामध्ये युद्ध झाले. दावीद आपल्या सैन्याला घेऊन पलिष्ट्यांशी लढण्यास गेला आणि तो थकून गेला. 16इशबी-बेनोब नावाचा राफाह वंशातील एक पुरुष, ज्याचा कास्याचा भाला तीनशे शेकेल#21:16 अंदाजे 3.5 कि.ग्रॅ. वजनाचा होता आणि तो नवीन तलवार घेऊन सज्ज होत म्हणाला, की तो दावीदाला जिवे मारेल. 17परंतु जेरुइयाहचा पुत्र अबीशाई दावीदाचा बचाव करण्यासाठी आला; त्याने त्या पलिष्ट्यावर हल्ला केला आणि त्याला ठार मारले. तेव्हा दावीदाच्या लोकांनी दावीदाला शपथ घेत सांगितले, “येथून पुढे पुन्हा आपण आमच्याबरोबर युद्धासाठी येणार नाही, म्हणजे इस्राएलचा दिवा विझणार नाही.”
18कालांतराने पलिष्ट्यांबरोबर गोब येथे पुन्हा दुसरे युद्ध झाले. त्यावेळेस हुशाथी सिब्बखय याने राफाह वंशातील साफ याला ठार मारले.
19गोब येथे पलिष्ट्यांबरोबर झालेल्या आणखी एका युद्धामध्ये बेथलेहेम येथील याईरचा#21:19 इब्री यारे-ओरेगीम पुत्र एलहानान याने गित्ती गल्याथाच्या भावाला ठार मारले ज्याच्या भाल्याची काठी विणकर्याच्या काठीसारखी होती.
20आणखी दुसर्या एका युद्धात, जे गथ येथे झाले, त्यामध्ये प्रत्येक हाताला सहा बोटे आणि पायाला सहा बोटे; असे एकंदर चोवीस बोटे असलेला एक धिप्पाड मनुष्य होता. तो सुद्धा राफाहच्या वंशातील होता. 21जेव्हा त्याने इस्राएलची अवहेलना केली तेव्हा दावीदाचा भाऊ शिमिआहचा पुत्र योनाथानने त्याला मारून टाकले.
22हे चार पुरुष गथ येथील राफाहच्या वंशातील होते आणि ते दावीदाच्या आणि त्याच्या सैनिकांच्या हातून मारले गेले.
सध्या निवडलेले:
2 शमुवेल 21: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.