त्याकाळी वसंतॠतूमध्ये राजे लोक युद्धावर जात असत, तेव्हा दावीदाने राजाची माणसे आणि संपूर्ण इस्राएली सैन्याबरोबर योआबाला पाठवले. त्यांनी अम्मोनी सैन्याचा नाश केला आणि राब्बाह शहराला वेढा घातला. परंतु दावीद यरुशलेमात राहिला. एके संध्याकाळी दावीद त्याच्या बिछान्यावरून उठला आणि आपल्या राजवाड्याच्या गच्चीवर फिरू लागला. गच्चीवरून त्याने एका स्त्रीला स्नान करताना पाहिले. ती स्त्री फार सुंदर होती, दावीदाने तिच्याबद्दल चौकशी करण्यासाठी कोणा एकाला पाठवले. तो मनुष्य म्हणाला, “ती एलीयामची कन्या, हिथी उरीयाहची पत्नी, बथशेबा आहे.” तेव्हा दावीदाने दूत पाठवून तिला बोलावून घेतले. ती त्याच्याकडे आली आणि त्याने तिच्याशी संबंध केला. (यावेळी ती तिच्या मासिक अशुद्धतेपासून शुद्ध होत होती.) नंतर ती परत तिच्या घरी गेली. ती स्त्री गर्भवती झाली आणि तिने दावीदाकडे निरोप पाठवित म्हटले, “मी गर्भवती आहे.” मग दावीदाने योआबाला निरोप पाठवला: “उरीयाह हिथी याला माझ्याकडे पाठव.” आणि योआबाने त्याला दावीदाकडे पाठवले. जेव्हा उरीयाह त्याच्याकडे आला, तेव्हा दावीदाने त्याची विचारपूस करत विचारले योआब कसा आहे, शिपाई कसे आहेत आणि युद्ध कसे चालले आहे. नंतर दावीद उरीयाहला म्हणाला, “तुझ्या घरी जा आणि आपले पाय धू.” तेव्हा उरीयाह राजवाड्यातून निघाला आणि त्याच्यामागोमाग राजाकडून एक बक्षीस पाठवले गेले. परंतु उरीयाह राजवाड्याच्या प्रवेशद्वारातच त्याच्या धन्याच्या सेवकांबरोबर झोपला, तो त्याच्या घरी गेला नाही. दावीदाला कोणी सांगितले, “उरीयाह घरी गेला नाही.” तेव्हा त्याने उरीयाहाला विचारले, “तू आताच लष्कराच्या मोहिमेवरून आलास नाही काय? तू घरी का गेला नाहीस?” उरीयाह दावीदाला म्हणाला, “कोश आणि इस्राएल आणि यहूदीया हे तंबूत राहत आहेत आणि माझा सेनापती योआब आणि माझ्या धन्याची माणसे उघड्या मैदानात तळ देऊन आहेत. तर मी माझ्या घरी जाऊन खाणेपिणे आणि माझ्या पत्नीशी प्रेम कसे करू शकतो? तुमच्या जिवाची शपथ, मी अशी गोष्ट करणार नाही!” तेव्हा दावीद त्याला म्हणाला, “आणखी एक दिवस येथेच राहा, उद्या मी तुला परत पाठवेन.” त्याप्रमाणे उरीयाह तो दिवस आणि दुसरा दिवस यरुशलेममध्ये राहिला. दावीदाने त्याला आमंत्रण दिल्यावरून त्याने त्याच्याबरोबर खाणेपिणे केले आणि तो मस्त होईपर्यंत दावीदाने त्याला मद्य पाजले. परंतु संध्याकाळी उरीयाह त्याच्या धन्याच्या सेवकांमध्ये त्याच्या चटईवर झोपण्यासाठी गेला; तो घरी गेला नाही. सकाळी दावीदाने योआबाला एक पत्र लिहिले आणि ते उरीयाहच्या हाती पाठवले. त्यात त्याने असे लिहिले, “तुंबळ युद्धाच्या तोंडी उरीयाहला ठेवा; आणि त्याच्यापासून मागे या म्हणजे त्याच्यावर वार होईल व तो मरण पावेल.” म्हणून जिथे योआबने शहराला वेढा घातला होता, तेव्हा त्याला माहीत होते की, शूर योद्धे कुठे असतील तिथे त्याने उरीयाहला ठेवले. जेव्हा त्या शहराची माणसे बाहेर आली आणि त्यांनी योआबाविरुद्ध लढाई केली, तेव्हा दावीदाच्या सैन्यातील काही माणसे युद्धात पडली; व उरीयाह हिथी सुद्धा मारला गेला.
2 शमुवेल 11 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: 2 शमुवेल 11:1-17
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ