2 करिंथकरांस 5
5
नवे शरीर मिळण्याची खात्री
1आम्हास ठाऊक आहे की ज्या जगीक तंबू—आमचे शरीर—मध्ये आम्ही राहतो त्याचा जर नाश झाला, तर परमेश्वराने आमच्यासाठी इमारत, सार्वकालिक स्वर्गीय घर जे मानवी हाताने बांधलेले नाही असे तयार केले आहे. 2या गृहामध्ये असताना स्वर्गीय गृहाचे पांघरूण घालण्याची इच्छा धरून आपण एवढे कण्हत आहोत. 3कारण आम्ही वस्त्रे धारण केली तर नग्न असे सापडणार नाही. 4या तंबूमध्ये आम्ही आहोत तोपर्यंत आम्ही कण्हतो व थकलेले आहोत, वस्त्रे परिधान करू नये असे आम्हास वाटत नाही, परंतु स्वर्गीय निवासस्थान धारण करावे, यासाठी की जे मर्त्य ते जीवनाने गिळंकृत करावे. 5ज्याने आम्हाला या उद्देशासाठीच सिद्ध केले आहे तो परमेश्वर आहे आणि अमानत म्हणून आम्हाला पवित्र आत्मा विसार म्हणून दिला आहे.
6यास्तव आता खात्रीपूर्वक आपण जाणून घ्यावे की जोपर्यंत आपण शारीरिक घरामध्ये आहोत, तोपर्यंत आपण प्रभुपासून दूर असतो. 7आम्ही विश्वासाने जगतो, प्रत्यक्ष पाहण्याने नव्हे. 8आमचा भरवसा आहे आणि हे आम्हास बरे वाटते की या शरीरापासून वेगळे होऊन प्रभुसोबत आपण आनंदाने वास करावा. 9तेव्हा, आम्ही येथे या शरीरामध्ये असू अथवा या शरीरापासून दूर असू, आम्ही करतो त्या सर्व गोष्टींत प्रभुंना संतोष देणे, हेच आमचे ध्येय आहे. 10कारण आपल्या सर्वांनाच ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर उभे राहावे लागणार आहे. या शरीरामध्ये असताना प्रत्येकाने ज्या चांगल्या अथवा वाईट गोष्टी केल्या असतील, त्यांचे आपल्यापैकी प्रत्येकाला योग्य ते प्रतिफळ मिळेल.
समेटाची सेवा
11प्रभुची भीती बाळगणे हे काय आहे हे आपणास माहीत आहे, त्यामुळेच इतरांना वळवून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो! आम्ही कोण आहोत हे परमेश्वरापुढे स्पष्ट आहे आणि मी आशा धरतो की, तुमच्या विवेकबुद्धीनेही तुम्ही हे निश्चित जाणता. 12पुन्हा स्वतःचीच प्रशंसा करण्याचा आम्ही प्रयत्न करत नाही. तर तुम्हाला आमच्यासाठी अभिमान बाळगण्याची संधी देत आहोत, यासाठी की जे हृदयातील गोष्टींचा नव्हे तर बाह्य गोष्टींचा अभिमान बाळगतात त्यांना तुम्हाला उत्तर देता यावे. 13जर “आम्ही वेडे असलो,” जसे काही लोक म्हणतात तर ते परमेश्वरासाठी आहोत. जर आम्ही भानावर असलो, तर ते तुमच्यासाठी आहोत. 14ख्रिस्ताची प्रीती आम्हाला गळ घालते कारण आम्हास खात्री आहे की, ज्याअर्थी एक आपल्या सर्वांसाठी मरण पावला तर आपण सर्वजण मेलो आहोत. 15ते सर्वांसाठी मरण पावले, म्हणून आता जे जिवंत आहेत त्यांनी यापुढे स्वतःसाठी जगू नये, तर जे त्यांच्यासाठी मरण पावले आणि पुन्हा उठले, त्यांच्यासाठी जगावे.
16येथून पुढे जगीक दृष्टीने आम्ही कोणाकडे पाहत नाही. आम्ही ख्रिस्ताकडे त्यादृष्टीने पाहत होतो पण आता तसे पाहत नाही. 17जर कोणी ख्रिस्तामध्ये आहे, तर तो नवी सृष्टी झाला आहे; जुने संपले आहे व सर्व नवीन झाले आहे. 18हे सर्व परमेश्वरापासून आहे, ज्यांनी आमचा त्यांच्याशी ख्रिस्ताद्वारे समेट केला आणि समेटाची सेवा आम्हाला दिली आहे. 19परमेश्वर ख्रिस्ताद्वारे जगाशी समेट घडवून आणत होते आणि लोकांची पातके त्यांच्याविरुद्ध मोजत नव्हते. हाच समेटाचा संदेश त्यांनी आम्हाकडे सोपवून दिला आहे. 20आम्ही ख्रिस्ताचे राजदूत आहोत, जणू काही परमेश्वर आमच्याद्वारे तुम्हाला विनंती करीत आहे. आम्ही ख्रिस्ताच्या वतीने तुम्हाला विनवतो की, परमेश्वराबरोबर तुमचा समेट होऊ द्या. 21ज्यांच्या ठायी पाप नव्हते, त्यांना आपल्यासाठी पापार्पण असे केले, म्हणजे त्यांच्याशी आपण संयुक्त होऊन, परमेश्वराचे नीतिमत्व व्हावे.
सध्या निवडलेले:
2 करिंथकरांस 5: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
मराठी समकालीन आवृत्ती™, नवीन करार
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे. सर्व अधिकार जगभरात राखीव.
Marathi Contemporary Version™, New Testament
Copyright © 1978, 1982, 2008, 2022 by Biblica, Inc.
Used with permission. All rights reserved worldwide.