2 इतिहास 35
35
योशीयाह वल्हांडण सण साजरा करतो
1योशीयाहने यरुशलेममध्ये याहवेहसाठी वल्हांडण सण साजरा केला आणि वल्हांडणाचे कोकरू पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी कापले गेले. 2त्याने याजकांना त्यांना दिलेल्या कामासाठी नियुक्त केले आणि याहवेहच्या मंदिराच्या सेवेसाठी त्यांना प्रोत्साहित केले. 3ज्यांनी सर्व इस्राएली लोकांना आज्ञा केली होती आणि ज्यांना याहवेहसाठी पवित्र केले गेले होते, त्या लेवी लोकांना म्हणाला: “इस्राएलचा राजा दावीदाचा पुत्र शलोमोनाने बांधलेल्या मंदिरात पवित्र कोश ठेवा. ते तुमच्या खांद्यावर वाहून नेण्यासारखे नाही. आता तुमचे परमेश्वर याहवेह आणि त्यांचे इस्राएली लोक यांची सेवा करा. 4इस्राएलचा राजा दावीद आणि त्याचा पुत्र शलोमोनने लिहिलेल्या सूचनेप्रमाणे तुमच्या विभागातील कुटुंबानुसार तुम्ही स्वतःची तयारी करा.
5“तुमच्या बरोबरील प्रत्येक उपविभागासाठी लेव्यांच्या गटासह सामान्य इस्राएली लोकांच्या कुटुंबाबरोबर पवित्र ठिकाणी उभे राहा. 6वल्हांडणाच्या कोकऱ्यांचा वध करा, स्वतःला पवित्र करा आणि तुमच्या सहइस्राएली लोकांसाठी, मोशेद्वारे याहवेहने आज्ञा दिल्याप्रमाणे कोकऱ्यांची तयारी करा.”
7योशीयाहने तिथे असलेल्या सर्वसामान्य लोकांसाठी वल्हांडणाचे अर्पण म्हणून तीस हजार कोकरे आणि बोकडे आणि तीन हजार गुरे ही सुद्धा पुरविली, राजाच्या व्यक्तिगत मालमत्तेतून हे सर्व दिले गेले.
8त्याच्या अधिकार्यांनीसुद्धा स्वेच्छेने लोकांना आणि याजकांना आणि लेवीय यांना मदत केली. हिल्कियाह, जखर्याह आणि यहीएल हे परमेश्वराच्या मंदिराच्या कारभाराचे अधिकारी होते, त्यांनी याजकांना वल्हांडणाची दोन हजार सहाशे अर्पणे आणि तीनशे गुरे दिली. 9तसेच कनन्याह बरोबर शमायाह आणि नथानेल, त्याचे भाऊ आणि हशब्याह, ईयेल आणि योजाबाद हे लेवी लोकांचे पुढारी, यांनी लेवीय लोकांसाठी पाच हजार वल्हांडणाची अर्पणे आणि पाचशे गुरे दिली.
10सेवेची व्यवस्था करण्यात आली आणि राजाच्या आदेशानुसार याजकांनी लेवीय लोकांबरोबर आपले स्थान ग्रहण केले. 11वल्हांडणाची कोकरे कापली गेली आणि याजकांनी त्यांच्या हाती दिलेले रक्त वेदीवर शिंपडले, त्यावेळेस लेवीय लोकांनी प्राण्यांची कातडी काढली. 12मोशेच्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे याहवेहना अर्पण देण्यासाठी लोकांच्या कुटुंबातील पोटविभागांनी याहवेहना अर्पण द्यावे यासाठी त्यांनी होमार्पण बाजूला ठेवले. त्यांनी गुरांच्या बाबतीतही तसेच केले. 13त्यांनी नेमून दिल्याप्रमाणे वल्हांडण सणाच्या प्राण्यांना अग्नीवर भाजून घेतले आणि पवित्र अर्पणे मडके, कढई आणि तव्यांत उकळले आणि ते सर्व लोकांना लगेच वाढले. 14यानंतर, त्यांनी स्वतःसाठी आणि याजकांसाठी तयारी केली, कारण याजक, अहरोनाचे वंशज हे रात्र होईपर्यंत होमार्पण आणि चरबीचे भाग अर्पण करत होते. म्हणून लेवींनी स्वतःसाठी आणि अहरोन वंशज याजकांसाठी तयारी केली.
15दावीद, आसाफ, हेमान आणि राजाचा संदेष्टा यदूथून त्यांनी नेमून दिल्याप्रमाणे आसाफाचे वंशज जे संगीतकार होते त्यांनी आपआपले स्थान ग्रहण केले. प्रत्येक फाटकावरच्या द्वारपालांना त्यांचे काम सोडण्याची गरज नव्हती, कारण त्यांचे सहकारी लेव्यांनी त्यांच्यासाठी तयारी केली होती.
16त्यावेळेस योशीयाह राजाच्या आदेशाप्रमाणे वल्हांडण सण साजरा करण्यासाठी आणि याहवेहच्या वेदीवर होमबलींचे अर्पण करण्यासाठी याहवेहची संपूर्ण सेवा पार पडली. 17त्यावेळी जे इस्राएली लोक तिथे उपस्थित होते त्यांनी वल्हांडण सण साजरा केला आणि बेखमीर भाकरीचा सण सात दिवस पाळला. 18शमुवेल संदेष्ट्याच्या काळापासून इस्राएलमध्ये अशा प्रकारे वल्हांडण सण साजरा करण्यात आला नव्हता; आणि योशीयाहने ज्याप्रकारे याजक, लेवी आणि सर्व यहूदीया आणि इस्राएली लोक जे यरुशलेममध्ये होते, त्यांच्याबरोबर सण साजरा केला होता तसा वल्हांडण इस्राएलच्या कोणत्याही राजांनी कधीही केला नव्हता. 19हा वल्हांडण सण योशीयाह राजाच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी साजरा करण्यात आला.
योशीयाहचा मृत्यू
20या सर्व गोष्टीनंतर, जेव्हा योशीयाहने मंदिराची सेवा व्यवस्थित केल्यानंतर तेव्हा इजिप्तचा राजा नखो फरात#35:20 फरात किंवा ज्याला आजच्या काळात युफ्रेटिस या नावाने ओळखले जाते नदीवर असलेल्या कर्कमीश येथे त्याच्याशी लढण्यास गेला आणि योशीयाह त्याचा सामना करण्यासाठी युद्धास गेला. 21परंतु नखोने त्याच्याकडे दूत पाठवून सांगितले, “यहूदीयाच्या राजा, तुझ्या आणि माझ्यामध्ये काय भांडण आहे? यावेळेस मी तुमच्यावर नव्हे तर या घराण्याबरोबर मी युद्ध करीत आहे, त्याच्यावर हल्ला करीत आहे. परमेश्वराने मला घाई करण्यास सांगितले आहे; म्हणून परमेश्वराला विरोध करणे थांबव, ते माझ्याबरोबर आहेत, नाहीतर ते तुझा नाश करतील.”
22तरीसुद्धा, योशीयाह त्याच्यापासून मागे फिरला नाही, परंतु त्याला युद्धात गुंतवून ठेवण्यासाठी त्याने स्वतःचे वेषांतर केले. परमेश्वराच्या आज्ञेनुसार नखोने जे सांगितले, ते त्याने ऐकले नाही, परंतु तो मगिद्दोच्या मैदानावर त्याच्याबरोबर लढण्यासाठी गेला.
23तेव्हा धनुर्धऱ्यांनी योशीयाह राजाला बाण मारला, त्याने त्याच्या अधिकाऱ्यांना सांगितले, “मला घेऊन जा; मी अत्यंत जखमी झालो आहे.” 24तेव्हा त्यांनी योशीयाहला त्याच्या रथातून बाहेर काढले, त्याला त्याच्या दुसऱ्या रथात ठेवले आणि यरुशलेमास आणले, तिथेच त्याचा मृत्यू झाला. त्याला त्याच्या पूर्वजांच्या कबरांमध्ये पुरण्यात आले आणि सर्व यहूदीया आणि यरुशलेम येथील लोकांनी त्याच्यासाठी शोक केला.
25यिर्मयाहने योशीयासाठी विलापगीत लिहिले आणि आजपर्यंत सर्व स्त्री-पुरुष गायक विलापामध्ये योशीयाहचे स्मरणोत्सव करतात. इस्राएलमध्ये ही एक परंपरा झाली आहे आणि विलाप गीतांमध्ये त्या लिहिलेल्या आहेत.
26याहवेहच्या नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे योशीयाहने केलेली भक्तीची कृत्ये आणि त्याच्या राजवटीतील इतर घटना 27सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत हे सर्व इस्राएलचे आणि यहूदीयाचे राजे या पुस्तकामध्ये लिहिलेल्या आहेत.
सध्या निवडलेले:
2 इतिहास 35: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.