YouVersion लोगो
सर्च आयकॉन

2 इतिहास 35:1-15

2 इतिहास 35:1-15 MRCV

योशीयाहने यरुशलेममध्ये याहवेहसाठी वल्हांडण सण साजरा केला आणि वल्हांडणाचे कोकरू पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी कापले गेले. त्याने याजकांना त्यांना दिलेल्या कामासाठी नियुक्त केले आणि याहवेहच्या मंदिराच्या सेवेसाठी त्यांना प्रोत्साहित केले. ज्यांनी सर्व इस्राएली लोकांना आज्ञा केली होती आणि ज्यांना याहवेहसाठी पवित्र केले गेले होते, त्या लेवी लोकांना म्हणाला: “इस्राएलचा राजा दावीदाचा पुत्र शलोमोनाने बांधलेल्या मंदिरात पवित्र कोश ठेवा. ते तुमच्या खांद्यावर वाहून नेण्यासारखे नाही. आता तुमचे परमेश्वर याहवेह आणि त्यांचे इस्राएली लोक यांची सेवा करा. इस्राएलचा राजा दावीद आणि त्याचा पुत्र शलोमोनने लिहिलेल्या सूचनेप्रमाणे तुमच्या विभागातील कुटुंबानुसार तुम्ही स्वतःची तयारी करा. “तुमच्या बरोबरील प्रत्येक उपविभागासाठी लेव्यांच्या गटासह सामान्य इस्राएली लोकांच्या कुटुंबाबरोबर पवित्र ठिकाणी उभे राहा. वल्हांडणाच्या कोकऱ्यांचा वध करा, स्वतःला पवित्र करा आणि तुमच्या सहइस्राएली लोकांसाठी, मोशेद्वारे याहवेहने आज्ञा दिल्याप्रमाणे कोकऱ्यांची तयारी करा.” योशीयाहने तिथे असलेल्या सर्वसामान्य लोकांसाठी वल्हांडणाचे अर्पण म्हणून तीस हजार कोकरे आणि बोकडे आणि तीन हजार गुरे ही सुद्धा पुरविली, राजाच्या व्यक्तिगत मालमत्तेतून हे सर्व दिले गेले. त्याच्या अधिकार्‍यांनीसुद्धा स्वेच्छेने लोकांना आणि याजकांना आणि लेवीय यांना मदत केली. हिल्कियाह, जखर्‍याह आणि यहीएल हे परमेश्वराच्या मंदिराच्या कारभाराचे अधिकारी होते, त्यांनी याजकांना वल्हांडणाची दोन हजार सहाशे अर्पणे आणि तीनशे गुरे दिली. तसेच कनन्याह बरोबर शमायाह आणि नथानेल, त्याचे भाऊ आणि हशब्याह, ईयेल आणि योजाबाद हे लेवी लोकांचे पुढारी, यांनी लेवीय लोकांसाठी पाच हजार वल्हांडणाची अर्पणे आणि पाचशे गुरे दिली. सेवेची व्यवस्था करण्यात आली आणि राजाच्या आदेशानुसार याजकांनी लेवीय लोकांबरोबर आपले स्थान ग्रहण केले. वल्हांडणाची कोकरे कापली गेली आणि याजकांनी त्यांच्या हाती दिलेले रक्त वेदीवर शिंपडले, त्यावेळेस लेवीय लोकांनी प्राण्यांची कातडी काढली. मोशेच्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे याहवेहना अर्पण देण्यासाठी लोकांच्या कुटुंबातील पोटविभागांनी याहवेहना अर्पण द्यावे यासाठी त्यांनी होमार्पण बाजूला ठेवले. त्यांनी गुरांच्या बाबतीतही तसेच केले. त्यांनी नेमून दिल्याप्रमाणे वल्हांडण सणाच्या प्राण्यांना अग्नीवर भाजून घेतले आणि पवित्र अर्पणे मडके, कढई आणि तव्यांत उकळले आणि ते सर्व लोकांना लगेच वाढले. यानंतर, त्यांनी स्वतःसाठी आणि याजकांसाठी तयारी केली, कारण याजक, अहरोनाचे वंशज हे रात्र होईपर्यंत होमार्पण आणि चरबीचे भाग अर्पण करत होते. म्हणून लेवींनी स्वतःसाठी आणि अहरोन वंशज याजकांसाठी तयारी केली. दावीद, आसाफ, हेमान आणि राजाचा संदेष्टा यदूथून त्यांनी नेमून दिल्याप्रमाणे आसाफाचे वंशज जे संगीतकार होते त्यांनी आपआपले स्थान ग्रहण केले. प्रत्येक फाटकावरच्या द्वारपालांना त्यांचे काम सोडण्याची गरज नव्हती, कारण त्यांचे सहकारी लेव्यांनी त्यांच्यासाठी तयारी केली होती.

2 इतिहास 35 वाचा