जेव्हा राजाने नियमशास्त्राचे शब्द ऐकले तेव्हा त्याने त्याची वस्त्रे फाडली. त्याने हिल्कियाह, शाफानाचा पुत्र अहीकाम आणि मीखाहचा पुत्र अब्दोन आणि शाफान चिटणीस आणि राजाचा सेवक असायाह यांना हा आदेश दिला: “जा आणि माझ्यासाठी आणि इस्राएल आणि यहूदीयामध्ये जे लोक राहत आहेत, त्यांच्याबद्दल या पुस्तकात लिहिलेले जे काही सापडले आहे, त्याबद्दल याहवेहकडे चौकशी करा. याहवेहचा फार मोठा क्रोध आपल्यावर आला आहे, कारण आपल्या पूर्वजांनी याहवेहच्या वचनाचे पालन केले नाही; या पुस्तकात जे सर्वकाही लिहिलेले आहे त्याप्रमाणे ते वागले नाहीत.” हिल्कियाह आणि त्याच्याबरोबर राजाने ज्यांना पाठवले होते, ते संदेष्टी हुल्दाह हिच्याशी बोलण्यास गेले, ती पोशाख भांडाराचा अधिकारी हसराहचा पुत्र तोखाथ चा पुत्र शल्लूमची पत्नी होती. ती यरुशलेमच्या नव्या पेठेत राहत होती. ती त्यांना म्हणाली, “याहवेह इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: ज्या मनुष्याने तुम्हाला माझ्याकडे पाठवले आहे, त्याला सांगा, ‘याहवेह असे म्हणतात: मी या ठिकाणावर आणि येथील लोकांवर संकट आणेन आणि यहूदीयाच्या राजासमोर वाचलेल्या ग्रंथात लिहिलेले सर्व शाप आणेन. कारण त्यांनी माझा त्याग केला आहे आणि इतर दैवतांना धूप जाळले आहेत आणि त्यांच्या हस्तकृतींनी माझा राग पेटविला गेला आहे आणि माझा राग या जागेवर ओतला जाईल आणि तो शांत होणार नाही.’ यहूदीयाच्या राजाला हे जाऊन सांगा, ज्याने तुम्हाला याहवेहची चौकशी करण्यासाठी पाठविले होते, ‘जे वचन तू ऐकले होते त्याबद्दल याहवेह इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: कारण तुझे अंतःकरण प्रतिसाद देणारे होते आणि जेव्हा या ठिकाणाविषयी आणि येथील लोकांविरुद्ध तो जे काही बोलला ते तू ऐकले तेव्हा तू स्वतःला परमेश्वरासमोर नम्र केलेस आणि तू माझ्यासमोर नम्र झालास आणि तुझी वस्त्रे फाडली आणि माझ्यासमोर रडलास, म्हणून मी तुझे ऐकले आहे, असे याहवेह जाहीर करतात. आता मी तुला तुझ्या पूर्वजांबरोबर मिळवेन आणि तुला शांतीने पुरले जाईल. या ठिकाणावर आणि येथे राहणाऱ्यांवर मी जे संकट आणणार आहे, ते तुझ्या डोळ्यांना दिसणार नाही.’ ” तेव्हा त्यांनी तिचे उत्तर परत राजाला जाऊन सांगितले. नंतर राजाने यहूदीया आणि यरुशलेममधील सर्व वडीलजनांना एकत्र बोलाविले. यहूदीयाचे लोक, यरुशलेम येथील रहिवासी, याजक आणि लेवी, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व लोकांबरोबर राजा याहवेहच्या मंदिरात गेला. याहवेहच्या मंदिरात सापडलेल्या कराराच्या ग्रंथातील सर्व शब्द त्याने त्यांना ऐकू जातील असे वाचून दाखविले. राजा त्याच्या स्तंभाजवळ उभा राहिला आणि त्याने याहवेहसमोर याहवेहचे अनुसरण करणे आणि त्यांच्या आज्ञा, कायदा आणि हुकूमनाम्याचे पालन करणे आणि या ग्रंथात लिहिलेल्या शब्दांचे त्याच्या संपूर्ण अंतःकरणाने आणि संपूर्ण आत्म्याने पालन करण्याच्या कराराचे नवीनीकरण केले. नंतर त्याने यरुशलेममधील प्रत्येकाला आणि बिन्यामीन गोत्रांच्या लोकांना तसे वचन देण्यास लावले; यरुशलेमच्या लोकांनी त्यांच्या पूर्वजांच्या परमेश्वराबरोबर केलेल्या कराराप्रमाणे केले. योशीयाहने इस्राएली लोकांच्या सर्व प्रदेशामधून सर्व घृणास्पद मूर्ती काढून टाकल्या आणि इस्राएलमध्ये उपस्थित असलेल्या सर्वांना त्यांचे परमेश्वर याहवेहची सेवा करावयास लावले. जोपर्यंत तो जिवंत होता, तोपर्यंत त्यांच्या पूर्वजांचे परमेश्वर याहवेह यांचे अनुसरण करण्यास ते चुकले नाहीत.
2 इतिहास 34 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: 2 इतिहास 34:19-33
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ