वयाच्या आठव्या वर्षी योशीयाह राजा झाला आणि त्याने यरुशलेममध्ये एकतीस वर्षे राज्य केले. याहवेहच्या दृष्टीने जे योग्य तेच त्याने केले आणि उजवीकडे किंवा डावीकडे न वळता त्याने त्याचे पूर्वज दावीदाच्या मार्गांचे पालन केले. त्याच्या राज्यकाळाच्या आठव्या वर्षी, तो लहान असतानाच त्याचे पूर्वज दावीदाच्या परमेश्वराचा त्याने शोध घेण्यास सुरुवात केली. त्याच्या कारकिर्दीच्या बाराव्या वर्षी त्याने यहूदीया आणि यरुशलेम येथील उच्च स्थाने, अशेराचे स्तंभ आणि तिथे असलेल्या मूर्ती काढून शुद्धीकरण करण्यास सुरुवात केली. त्याच्या मार्गदर्शनाखाली बआल दैवतांच्या वेद्या पाडण्यात आल्या; त्याने त्यावर ज्या धूपवेद्या होत्या, त्यांचे तुकडे केले आणि अशेराचे स्तंभ आणि मूर्ती जमिनीवर पाडून फोडल्या. त्याचे त्याने बारीक तुकडे केले आणि ज्यांनी त्यांना बलिदान केले होते, त्यांच्या कबरेवर ते विखरून टाकले. त्याने याजकांची हाडे त्यांच्या वेदींवर जाळली आणि अशाप्रकारे त्याने यहूदीया आणि यरुशलेम यांचे शुद्धीकरण केले. मनश्शेह, एफ्राईम आणि शिमओन या गोत्रांच्या नगरांमध्ये, नफतालीपर्यंत आणि त्यांच्या सभोवतालच्या भग्नावशेषांमध्ये, त्याने वेद्या आणि अशेराचे स्तंभ मोडून टाकले आणि मूर्तींचा चुरा करून पूड केली आणि संपूर्ण इस्राएलमधून सर्व धूपवेद्यांचे तुकडे केले. नंतर तो यरुशलेमकडे परत गेला. योशीयाहच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी, भूमी आणि मंदिर शुद्ध करण्यासाठी, त्याने अजल्याहचा पुत्र शाफान आणि त्या नगराचा अधिपती मासेयाह यांना, नोंद करणारा यहोआहाजचा पुत्र योवाहला त्याचे परमेश्वर याहवेहच्या मंदिराची दुरुस्ती करण्यासाठी पाठविले. ते मुख्य याजक हिल्कियाहकडे गेले व परमेश्वराच्या मंदिरात आलेले पैसे, जे लेव्यांनी व द्वारपालांनी मनश्शेह, एफ्राईम आणि इस्राएलच्या अवशिष्ट लोकांकडून आणि यहूदाह व बिन्यामीनच्या लोकांकडून, तसेच यरुशलेमच्या रहिवाशांकडून गोळा केले होते ते राजाला दिले. नंतर त्यांनी ते याहवेहच्या मंदिराच्या कामावर देखरेख करण्यासाठी नेमलेल्या माणसांच्या हाती सोपविले. या पुरुषांनी याहवेहच्या मंदिराची दुरुस्ती आणि पुनर्बांधणी करणाऱ्या कामगारांना ते पैसे दिले. ज्या इमारती नाश होण्यासाठी यहूदीयाच्या राजांनी पडू दिल्या होत्या, त्यांचा जीर्णोद्धार करण्यासाठी बांधकाम करणारे व सुतार यांना घडीव दगड आणि इमारतीचे वासे व तुळईची लाकडे खरेदी करण्यासाठीसुद्धा पैसे दिले. कामगारांनी विश्वासयोग्यतेने काम केले. यहथ आणि ओबद्याह, मरारी वंशजातून आलेले लेवी आणि कोहाथी वंशजातून आलेले जखर्याह आणि मशुल्लाम हे त्यांचे मार्गदर्शन करण्यासाठी तिथे नियुक्त केले होते. सर्व लेवीय लोकांना—कुशल वाद्य वादक— त्यांच्याकडे मजुरांची जबाबदारी आणि प्रत्येक कामावरील सर्व कामगारांवर मुकादम म्हणून देखरेख करण्याचे काम दिले होते. काही लेवी लोकांना सचिव, शास्त्री आणि द्वारपाल असे काम दिले. जेव्हा हिल्कियाह याजक याहवेहच्या मंदिरात नेण्यात आलेले पैसे बाहेर काढत होता तेव्हा त्याला मोशेच्याद्वारे देण्यात आलेला याहवेहच्या नियमशास्त्राचा ग्रंथ सापडला. हिल्कियाह शाफान या सचिवाला म्हणाला, “मला याहवेहच्या मंदिरात नियमशास्त्राचा ग्रंथ सापडला आहे.” तो त्याने शाफानकडे दिला. तेव्हा शाफान याने तो ग्रंथ राजाकडे नेला आणि त्याला अहवाल दिला: “तुमचे अधिकारी ज्याकाही गोष्टी करण्यास वचनबद्ध आहेत, त्या सर्व गोष्टी ते करीत आहेत. त्यांना जो पैसा याहवेहच्या मंदिरात मिळाला, त्यांनी तो मंदिराचे कामगार व कामाची देखरेख करणार्यांच्या हाती दिला आहे.” नंतर सचिव शाफान याने राजाला कळविले, “हिल्कियाह याजकाने मला एक पुस्तक दिले आहे.” आणि शाफानाने त्यामधून राजाच्या समोर वाचले.
2 इतिहास 34 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: 2 इतिहास 34:1-18
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ