YouVersion लोगो
सर्च आयकॉन

2 इतिहास 25

25
यहूदीयाचा राजा अमस्याह
1वयाच्या पंचवीसाव्या वर्षी अमस्याह राजा झाला, त्याने यरुशलेमात एकोणतीस वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव यहोअदान होते; ती यरुशलेमची होती. 2त्याने याहवेहच्या दृष्टीने जे योग्य होते ते केले, परंतु संपूर्ण अंतःकरणापासून नाही. 3राज्य त्याच्या पूर्णपणे नियंत्रणात आल्यानंतर त्याने त्याचा पिता राजाचा वध करणाऱ्या अधिकाऱ्यांना मृत्युदंड दिला. 4परंतु त्याने त्यांच्या मुलांना जिवे मारले नाही, तर नियमशास्त्रात, मोशेच्या पुस्तकात जे लिहिले आहे, त्यानुसार वागले, याहवेहने आज्ञा दिली होती: “आईवडिलांना त्यांच्या मुलांच्या कारणामुळे जिवे मारू नये, तसेच आईवडिलांच्या कारणामुळे त्यांच्या मुलांना जिवे मारू नये. प्रत्येकजण स्वतःच्या पापासाठी मरेल.”
5अमस्याहने यहूदीयाच्या लोकांना एकत्र बोलाविले आणि सर्व यहूदाह आणि बिन्यामीनसाठी त्यांच्या कुटुंबांप्रमाणे हजारोंचे सेनापती आणि शंभराचे सेनापती नियुक्त केले. त्यानंतर त्याने वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे लोक एकत्र केले आणि त्याला असे दिसून आले की लष्कराच्या सेवेसाठी योग्य असे तीन लाख पुरुष आहेत, भाला आणि ढाल हाताळण्यास ते सक्षम आहेत. 6त्याने शंभर तालांत चांदी#25:6 अंदाजे 3.4 मेट्रिक टन देऊन इस्राएलमधून एक लाख लढाऊ माणसेसुद्धा भाड्याने घेतली.
7परंतु परमेश्वराचा एक मनुष्य त्याच्याकडे आला आणि म्हणाला, “महाराज, इस्राएलकडून आलेल्या या सैन्याने तुमच्याबरोबर जाऊ नये, कारण याहवेह इस्राएलबरोबर नाहीत; एफ्राईमच्या कोणत्याही लोकांबरोबर नाहीत. 8जरी तुम्ही जाल आणि धाडसाने युद्ध कराल, तरी परमेश्वर तुम्हाला शत्रूसमोर उलथून पाडतील, कारण कोणाला मदत करावी किंवा कोणाला उलथून पाडावे यासाठी परमेश्वर सामर्थ्यशाली आहेत.”
9अमस्याहने परमेश्वराच्या मनुष्याला विचारले, “परंतु मी या इस्राएली सैन्यासाठी शंभर तालांत चांदी दिली आहेत त्याचे काय?”
परमेश्वराच्या मनुष्याने उत्तर दिले, “याहवेह, तुम्हाला त्याच्यापेक्षाही अधिक देऊ शकतात.”
10तेव्हा अमस्याहने एफ्राईमहून त्याच्याकडे जे सैन्य आले होते त्यांना काढून त्यांच्या घरी परत पाठविले. ते यहूदीयावर खूप रागावले आणि संतापाने घरी निघून गेले.
11अमस्याहने नंतर त्याचे सामर्थ्य वाढविले आणि त्याचे सैन्य क्षार खोर्‍यात नेले आणि तिथे त्याने सेईरच्या दहा हजार लोकांना ठार केले. 12यहूदीयाच्या सैन्याने दहा हजार माणसांनासुद्धा जिवंत पकडले, त्यांना एका कड्याच्या टोकावर नेले आणि तिथून खाली फेकले, त्या सर्वांचे तुकडे झाले.
13दरम्यान, अमस्याहने ज्या सैन्याला परत पाठवले होते आणि युद्धात भाग घेऊ दिला नव्हता, त्यांनी शोमरोनपासून बेथ-होरोनपर्यंत तेथील यहूदीयाच्या नगरांवर हल्ला केला. त्यांनी तीन हजार लोकांना ठार केले आणि मोठ्या प्रमाणात लूट घेऊन गेले.
14अमस्याह जेव्हा एदोमी लोकांचा वध करून परत आला, तेव्हा त्याने सेईरच्या लोकांची दैवते सोबत आणली, त्यांच्यापुढे लवून नमन केले आणि त्यांच्यासाठी होमार्पणे केली. 15याहवेहचा राग अमस्याहवर भडकला आणि त्यांनी त्याच्याकडे एका संदेष्ट्याला पाठविले, तो म्हणाला, “या लोकांच्या दैवतांचा तू सल्ला का घेतोस, जे स्वतःच्या लोकांना तुझ्या हातातून वाचवू शकले नाहीत?”
16तो बोलत असतानाच राजा त्याला म्हणाला, “आम्ही तुला राजाचा सल्लागार नेमला आहे का? थांब! का बरे तू मारला जावास?”
तेव्हा तो संदेष्टा थांबला व म्हणाला, “मला माहीत आहे की परमेश्वराने तुझा नाश करण्याचे ठरविले आहे, कारण तू असे केलेस आणि माझा सल्ला ऐकला नाहीस.”
17यहूदीयाचा राजा अमस्याहने त्याच्या सल्लागारांशी सल्लामसलत केली, त्याने हे आव्हान इस्राएलचा राजा, येहूचा पुत्र यहोआहाज याचा पुत्र यहोआश#25:17 किंवा योआश याच्याकडे पाठविले: “चल ये, युद्धात एकमेकांचा सामना करू.”
18परंतु इस्राएलचा राजा योआश याने यहूदीयाचा राजा अमस्याह याला उत्तर दिले: “लबानोनमधील एका काटेरी झुडूपाने लबानोनमधील एका गंधसरूला निरोप पाठवला की, ‘तुझ्या मुलीचा विवाह माझ्या मुलाशी करून दे.’ तेव्हा लबानोनमधून एका जंगली श्वापदाने येऊन त्या काटेरी झुडूपाला पायाखाली तुडविले. 19तू स्वतःला म्हणतोस की, तू एदोमाचा पराभव केला आहेस आणि आता तू उद्धट व गर्विष्ठ झाला आहेस. परंतु घरीच राहा! संकटांला आमंत्रण देऊन स्वतःचा आणि यहूदीयाचा नाश तू का करावा?”
20परंतु अमस्याहने ऐकले नाही, कारण परमेश्वराने तसेच केले की, ते त्याला यहोआशच्या हाती सोपवून देणार होते, कारण त्यांनी एदोमाच्या दैवतांचा सल्ला घेतला होता. 21तेव्हा इस्राएलाचा राजा यहोआशने हल्ला केला. तो आणि यहूदीयाचा राजा अमस्याहने यहूदीयातील बेथ-शेमेश येथे एकमेकांचा सामना केला. 22इस्राएलने यहूदीयाचा पराभव केला आणि प्रत्येकजण आपआपल्या घरी पळून गेले. 23इस्राएलाचा राजा यहोआशने यहोआहाजचा#25:23 यहोआहाजचा म्हणजे अहज्याहचा पुत्र, योआशाचा पुत्र यहूदीयाचा राजा अमस्याहला बेथ-शेमेश येथे कैद केले. नंतर योआशाने त्याला यरुशलेमास आणले आणि यरुशलेमची एफ्राईमच्या दरवाजापासून कोपर्‍याच्या दरवाजापर्यंत भिंत त्याने पाडून टाकली; जी चारशे हात लांब#25:23 अंदाजे 180 मीटर होती. 24परमेश्वराच्या मंदिरातील सर्व सोने, चांदी व सापडतील ती पात्रे त्याने घेतली, जी ओबेद-एदोमच्या देखरेखीखाली होते. आणि राजवाड्याच्या तिजोरीसह कैद्यांना घेऊन तो शोमरोनास परतला.
25इस्राएलचा राजा यहोआहाजचा पुत्र योआश याच्या मृत्यूनंतर यहूदीयाचा राजा अमस्याह पंधरा वर्षे जगला. 26अमस्याहच्या राज्यकाळातील इतर घटना, सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत, यहूदीयाच्या आणि इस्राएलच्या राजांच्या पुस्तकात लिहिलेल्या नाहीत काय? 27अमस्याह याहवेहचे अनुसरण करण्यापासून दूर गेला, तेव्हापासून त्यांनी यरुशलेममध्ये त्याच्याविरुद्ध कट रचला आणि तो लाखीशकडे पळून गेला, परंतु त्यांनी त्याच्यामागे लाखीशकडे माणसे पाठवून दिली आणि त्याला तिथे मारले. 28त्याला घोड्यावरून परत आणण्यात आले आणि यहूदीयाच्या शहरात त्याच्या पूर्वजांबरोबर पुरण्यात आले.

सध्या निवडलेले:

2 इतिहास 25: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन