2 इतिहास 11
11
1जेव्हा रेहोबोअम यरुशलेमास आला, तेव्हा त्याने यहूदाह व बिन्यामीनच्या गोत्रातील लोकांना जमा केले; इस्राएलशी युद्ध करणारे आणि रेहोबोअमला राज्य पुन्हा मिळवून देतील असे एक लाख ऐंशी हजार सक्षम तरुण पुरुष होते.
2परंतु परमेश्वराचा मनुष्य शमायाह याच्याकडे याहवेहचे वचन आले: 3“शलोमोनचा पुत्र यहूदीयाचा राजा रेहोबोअमला व यहूदीयातील सर्व इस्राएली व बिन्यामीनच्या लोकांना सांग, 4‘याहवेह असे म्हणतात: इस्राएली जे तुमचे बांधव आहेत, त्यांच्याविरुद्ध युद्ध करू नका. तुम्ही प्रत्येकजण आपआपल्या घरी जा, कारण हे मी सांगत आहे.’ ” म्हणून त्यांनी याहवेहचा शब्द मानला आणि आणि यरोबोअमच्या विरुद्ध युद्ध करण्यापासून माघार घेतली.
रेहोबोअमची यहूदीयाला तटबंदी
5रेहोबोअम यरुशलेममध्ये राहिला आणि यहूदीयामध्ये त्याने संरक्षणासाठी या नगरांची बांधणी केली: 6बेथलेहेम, एटाम, तकोवा, 7बेथ-सूर, सोकोह, अदुल्लाम, 8गथ, मारेशाह, जीफ, 9अदोराईम, लाखीश, अजेकाह, 10सोराह, अय्यालोन आणि हेब्रोन. ही तटबंदीची शहरे यहूदीया आणि बिन्यामीनमध्ये होती. 11त्याने त्या नगरांची संरक्षणव्यवस्था मजबूत केली आणि त्यांच्यामध्ये सेनापती ठेवले आणि त्यांना अन्न, जैतुनाचे तेल आणि द्राक्षारसाचा पुरवठा केला. 12त्याने तेथील प्रत्येक नगरात ढाली आणि भाले ठेवले आणि त्यांना फारच सामर्थ्यवान केले. म्हणून यहूदीया आणि बिन्यामीन त्याच्याकडेच राहिले.
13संपूर्ण इस्राएलमधील सर्व जिल्ह्यातील याजक आणि लेवींनी त्याची बाजू घेतली. 14लेवीय लोकांनी त्यांची कुरणे आणि मालमत्तासुद्धा सोडली आणि ते यहूदीया आणि यरुशलेमेत आले, कारण यरोबोअम आणि त्याच्या मुलांनी त्यांना याहवेहचे याजक म्हणून नाकारले होते, 15जेव्हा त्याने उच्चस्थानांसाठी आणि वासराच्या आणि बोकडाच्या मूर्ती तयार करून त्यासाठी स्वतःचे याजक नेमले. 16इस्रायलच्या प्रत्येक वंशातील ज्या लोकांनी इस्राएलचे परमेश्वर याहवेहच्या शोधात त्यांचे अंतःकरण लावले होते, ते लेवीय लोकांच्या मागे यरुशलेमकडे त्यांच्या पूर्वजांचे परमेश्वर याहवेहसाठी यांच्या बलिदानांचे अर्पण करण्यासाठी गेले. 17त्यांनी यहूदीयाचे राष्ट्र बळकट केले आणि शलोमोनचे पुत्र रेहोबोअमला तीन वर्षे पाठिंबा दिला, याकाळात त्यांनी दावीद आणि शलोमोनच्या मार्गाचे अनुसरण केले.
रेहोबोअमचे कुटुंब
18रेहोबोअमने महालाथ बरोबर विवाह केला, जी दावीदाचा पुत्र यरिमोथ आणि अबीहाईल, इशायाचा पुत्र एलियाबची कन्या होती. 19तिने त्याच्या या मुलांना जन्म दिला: यऊश, शमरियाह आणि जाहम. 20नंतर त्याने अबशालोमची कन्या माकाह हिच्याशी विवाह केला, जिने अबीयाह, अत्तय, जीजा आणि शेलोमीथ यांना जन्म दिला. 21रेहोबोअमने त्याच्या इतर पत्नी आणि उपपत्नींपेक्षा अबशालोमची कन्या माकाहवर जास्त प्रीती केली. त्याला एकूण अठरा पत्नी आणि साठ उपपत्नी, अठ्ठावीस मुले आणि साठ मुली होत्या.
22रेहोबोअमने माकाहचा मुलगा अबीयाह याला राजा करण्यासाठी त्याच्या सर्व भावांमध्ये राजपुत्र म्हणून त्याची नेमणूक केली. 23तो फार हुशारीने वागला आणि त्याच्या काही मुलांना यहूदीया आणि बिन्यामीन प्रांतात आणि सर्व तटबंदीच्या शहरांमध्ये पांगविले. त्याने त्यांना विपुल पुरवठा दिला आणि त्यांच्यासाठी अनेक पत्नी केल्या.
सध्या निवडलेले:
2 इतिहास 11: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.