YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 तीमथ्य 3

3
मंडळीचे अध्यक्ष आणि सेवक याची गुणवैशिष्टे
1हे वचन विश्वासयोग्य आहे की जर कोणी अध्यक्ष होण्याची इच्छा धरतो, तर तो उत्तम कामाची इच्छा बाळगतो. 2तर अध्यक्ष निर्दोष, एका पत्नीचा पती असावा, सौम्य, सावधान, आदरणीय, अतिथीप्रिय आणि शिकविण्यास निपुण असावा. 3तो मद्यपी अथवा भांडखोर नसावा, तर तो सौम्य व दयाळू असावा, तो पैशावर प्रीती करणारा नसावा. 4तो आपल्या घरावर उत्तम अधिकार चालविणारा, पूर्ण गंभीरपणे लेकरांना स्वाधीन राखणारा असावा. 5(ज्याला आपल्या कुटुंबाची व्यवस्था चांगली ठेवता येत नाही, तर तो परमेश्वराच्या मंडळीचा सांभाळ कसा करील?) 6अध्यक्ष नव्याने ख्रिस्ती झालेला नसावा, नाही तर तो गर्वाने फुगून जाऊन सैतानाच्या दंडाचा भागीदार होईल. 7तसेच मंडळीच्या बाहेरील लोकांचेही त्याच्याविषयी चांगले मत असावे, जेणेकरून त्याची निंदा होऊ नये आणि सैतानाच्या फासात तो पडू नये.
8मंडळीतील सेवकही आदरयोग्य व निष्कपट असावेत. ते मद्यपान करणारे नसावे व अप्रामाणिकपणे पैसा मिळविणारे नसावे. 9ते विश्वासाचे गुप्त सत्य शुद्ध विवेकबुद्धीने राखणारे असावेत. 10आणि त्यांची प्रथम चाचणी करणे आवश्यक आहे; नंतर निर्दोष ठरल्यास त्यांनी सेवक म्हणून काम करावे.
11त्याचप्रमाणे, त्यांच्या पत्नीदेखील आदरणीय असाव्यात. त्या निंदानालस्ती करणार्‍या असू नयेत, तर त्या नेमस्त व सर्व गोष्टींविषयी विश्वासू असाव्यात.
12सेवक एका पत्नीचा पती असावा आणि तो आपल्या मुलांची व कुटुंबाची व्यवस्था उत्तम प्रकारे घेणारा असावा. 13ज्यांनी सेवकपणाची सेवा चांगली केली, त्यांना मान मिळतो आणि ख्रिस्त येशूंवरील त्यांची विश्वासात दृढता वाढते.
पौलाकडून तीमथ्याला सूचना
14तुझ्याकडे लवकरच येण्याची आशा असूनही, या सर्वगोष्टी मी आताच तुला लिहित आहे, 15जर माझे येणे थोडेसे लांबले, परमेश्वराचे घर म्हणजे जिवंत परमेश्वराची मंडळी जी सत्याचा खांब व आधारस्तंभ आहे, त्या परमेश्वराच्या घरात कसे वागले पाहिजे, हे तुला समजावे. 16सुभक्तीचे रहस्य निर्विवाद गंभीर आहे:
परमेश्वर मानव शरीरात प्रकट झाले,
आत्म्यात नीतिमान ठरले;
देवदूतांच्या पाहण्यात आले,
राष्ट्रांमध्ये गाजविले गेले,
जगात त्यांच्यावर विश्वास ठेवण्यात आला
आणि गौरवात पुन्हा वर घेतले गेले.

सध्या निवडलेले:

1 तीमथ्य 3: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन