1 शमुवेल 31
31
शौल आत्महत्या करतो
1पलिष्ट्यांनी इस्राएलविरुद्ध युद्ध केले; इस्राएली लोक त्यांच्यापुढून पळून गेले आणि गिलबोआ डोंगरावर पुष्कळजण मारले गेले. 2पलिष्ट्यांनी शौल आणि त्याच्या पुत्रांचा जोरात पाठलाग केला आणि त्यांनी त्याचे पुत्र योनाथान, अबीनादाब आणि मलकी-शुआ यांना ठार मारले. 3शौलाच्या सर्व बाजूंनी युद्ध भयंकर वाढत गेले आणि जेव्हा धनुर्धरांनी त्याला गाठले व गंभीररित्या जखमी केले.
4तेव्हा शौल त्याच्या शस्त्रवाहकाला म्हणाला, “तुझी तलवार उपस आणि मला आरपार भोसक, नाहीतर हे बेसुंती लोक येऊन मला भोसकतील व माझी विटंबना करतील.”
परंतु त्याचा शस्त्रवाहक घाबरून गेला होता आणि तो तसे करेना; तेव्हा शौलाने स्वतःची तलवार घेतली आणि तिच्यावर तो पडला. 5जेव्हा शस्त्रवाहकाने पाहिले की शौल मरण पावला आहे, तेव्हा तो सुद्धा आपल्या तलवारीवर पडला आणि त्याच्याबरोबर मरण पावला. 6अशाप्रकारे शौल आणि त्याचे तीन पुत्र आणि त्याचा शस्त्रवाहक आणि त्याची सर्व माणसे त्याच दिवशी एकत्र मरण पावले.
7जेव्हा खोर्याच्या बाजूने आणि यार्देनेच्या पलीकडे असलेल्या इस्राएली लोकांनी पाहिले की, इस्राएली सैन्याने पळ काढला आहे आणि शौल आणि त्याचे पुत्र मरण पावले आहेत, तेव्हा त्यांनी त्यांची नगरे सोडली आणि तिथून पळून गेले. आणि पलिष्ट्यांनी येऊन तिथे वस्ती केली.
8दुसर्या दिवशी जेव्हा पलिष्टी लोक मेलेल्या लोकांच्या वस्तू लुटण्यासाठी आले, तेव्हा त्यांना गिलबोआ डोंगरावर शौल आणि त्याचे तीन पुत्र पडलेले सापडले. 9त्यांनी शौलाचे शिर छेदले आणि त्याचे शस्त्र काढून घेतले आणि त्यांनी ही बातमी पलिष्ट्यांच्या संपूर्ण देशामध्ये आणि त्यांच्या मूर्तींच्या मंदिरात आणि त्यांच्या लोकांमध्ये जाहीर करण्यास संदेशवाहक पाठवले. 10त्यांनी त्याची शस्त्रे अष्टारोथच्या मंदिरात ठेवली आणि त्याचे शरीर बेथ-शान नगराच्या भिंतीवर टांगले.
11पलिष्टी लोकांनी शौलाचे काय केले हे जेव्हा याबेश-गिलआदच्या लोकांनी ऐकले, 12तेव्हा त्यांचे सर्व शूरवीर रात्रभर चालून बेथ-शान येथे गेले. त्यांनी शौल आणि त्याच्या पुत्रांचे मृतदेह बेथ-शानच्या भिंतीवरून खाली उतरविले आणि याबेश येथे आणले व तिथे त्यांनी ते जाळून टाकले. 13त्यानंतर त्यांनी त्यांच्या अस्थी याबेश येथे चिंचेच्या झाडाखाली पुरल्या आणि सात दिवस उपास केला.
सध्या निवडलेले:
1 शमुवेल 31: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.