1 शमुवेल 3
3
याहवेहचे शमुवेलाला पाचारण
1शमुवेल बाळ एलीच्या हाताखाली याहवेहची सेवा करीत होता. त्या दिवसात याहवेहचे वचन दुर्मिळ होते; दृष्टान्तही फारसे मिळत नसत.
2एका रात्री एलीची दृष्टी मंद झाल्यामुळे त्याला फारसे दिसत नव्हते, तो त्याच्या नेहमीच्या जागी पडून होता. 3परमेश्वराचा दीप अजूनही विझला नव्हता आणि शमुवेल याहवेहच्या घरात परमेश्वराचा कोश होता त्या ठिकाणी निजला होता. 4तेव्हा याहवेहने शमुवेलाला हाक मारली.
शमुवेलाने उत्तर दिले, “मी येथे आहे.” 5आणि तो धावत एलीकडे गेला आणि म्हणाला, “मी येथे आहे; तुम्ही मला बोलाविले.”
परंतु एली म्हणाला, “मी बोलाविले नाही; परत जा आणि झोप.” तेव्हा तो गेला आणि झोपला.
6याहवेहने पुन्हा, “शमुवेल!” अशी हाक मारली आणि शमुवेल उठला आणि एलीकडे गेला आणि म्हणाला, “मी येथे आहे; तुम्ही मला बोलाविले.”
एली म्हणाला, “माझ्या मुला, मी बोलाविले नाही; परत जा आणि झोप.”
7शमुवेलने तर अजूनही याहवेहला ओळखले नव्हते: याहवेहचे वचन आतापर्यंत त्याला प्रकट झाले नव्हते.
8याहवेहने तिसर्यांदा हाक मारली, “शमुवेल!” आणि शमुवेल उठला आणि एलीकडे गेला आणि म्हणाला, “मी येथे आहे; तुम्ही मला बोलाविले.”
तेव्हा एलीला समजले की, याहवेह त्या बालकाला बोलावित होते. 9म्हणून एलीने शमुवेलास सांगितले, “जा आणि झोप आणि जर त्यांनी पुन्हा तुला हाक मारली, तर म्हण, ‘याहवेह, बोला, कारण, तुमचा सेवक ऐकत आहे.’ ” तेव्हा शमुवेल गेला आणि त्याच्या जागेवर झोपला.
10याहवेह आले आणि तिथे उभे राहिले आणि इतर वेळेप्रमाणे हाक मारली, “शमुवेल! शमुवेल!”
तेव्हा शमुवेल म्हणाला, “बोला, तुमचा सेवक ऐकत आहे.”
11आणि याहवेह शमुवेलास म्हणाले: “पाहा, मी इस्राएलमध्ये असे काहीतरी करणार आहे, जे ऐकून प्रत्येकाचे कान भणभणतील. 12एलीच्या घराण्याविषयी मी जे काही बोललो होतो ते; सुरुवातीपासून शेवटपर्यंत मी करेन. 13कारण मी त्याला सांगितले की, जे पाप त्याला माहीत होते त्यासाठी मी सर्वकाळ त्याच्या कुटुंबाचा न्याय करेन; त्याच्या पुत्रांनी परमेश्वराची निंदा केली आणि एली त्यांना आवरू शकला नाही. 14म्हणून मी एलीच्या घराण्यासाठी अशी शपथ घेतली, ‘एलीच्या घराण्याच्या पापाचे प्रायश्चित यज्ञ किंवा अर्पणाने कधीही होणार नाही.’ ”
15सकाळ होईपर्यंत शमुवेल झोपला आणि नंतर याहवेहच्या मंदिराची दारे उघडली. एलीला दृष्टान्त सांगण्यासाठी त्याला भीती वाटत होती, 16परंतु एलीने त्याला बोलाविले आणि म्हटले, “शमुवेल, माझ्या मुला.”
शमुवेलाने उत्तर दिले, “मी येथे आहे.”
17“याहवेह तुला काय म्हणाले?” एलीने विचारले. “माझ्यापासून ते लपवू नकोस. ज्यागोष्टी त्यांनी तुला सांगितल्या त्या जर तू माझ्यापासून लपवून ठेवल्या तर परमेश्वर तुला फार कठीण शिक्षा देवो.” 18तेव्हा शमुवेलाने त्याला सर्वकाही सांगितले, त्याच्यापासून काहीही लपवून ठेवले नाही. तेव्हा एली म्हणाला, “ते याहवेह आहेत; त्यांच्या दृष्टीने जे बरे ते करो.”
19शमुवेल वाढत असता याहवेह त्याच्याबरोबर होते आणि त्यांनी शमुवेलाचे कोणतेही शब्द वाया जाऊ दिले नाही. 20आणि दानपासून बेअर-शेबापर्यंत सर्व इस्राएली लोकांनी ओळखले की शमुवेल याहवेहचा संदेष्टा होण्यास प्रमाणित केलेला आहे. 21याहवेहचे शिलोह येथे दर्शन होत राहिले आणि तिथे त्यांच्या वचनाद्वारे त्यांनी स्वतःला शमुवेलास प्रकट केले.
सध्या निवडलेले:
1 शमुवेल 3: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.