YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 शमुवेल 28:1-19

1 शमुवेल 28:1-19 MRCV

त्या दिवसांमध्ये इस्राएलविरुद्ध युद्ध करावे म्हणून पलिष्ट्यांनी त्यांचे सैन्य एकत्र केले. आखीश दावीदाला म्हणाला, “तू हे खचित समज की, तू आणि तुझी माणसे माझ्याबरोबर सैन्यात येतील.” दावीद म्हणाला, “तर आपला दास काय करू शकतो, हे आपण पाहाल.” आखीशने उत्तर दिले, “फार चांगले, मी तुला आयुष्यभर माझा अंगरक्षक करेन.” शमुवेल तर मरण पावले होते आणि सर्व इस्राएली लोकांनी त्यांच्यासाठी शोक केला होता आणि त्यांना त्यांच्याच रामाह नगरात पुरले होते. शौलाने मृतात्म्यांशी संपर्क साधणारे आणि तंत्रमंत्र करणारे यांना देशातून घालवून दिले होते. पलिष्टी एकत्र आले आणि त्यांनी शूनेम येथे छावणी दिली, तर शौलाने सर्व इस्राएली सैन्याला एकत्र करून गिलबोआ येथे छावणी दिली. जेव्हा शौलाने पलिष्ट्यांचे सैन्य पाहिले, तेव्हा तो घाबरला; त्याचे हृदय भीतीने भरून गेले. शौलाने याहवेहला विचारले, परंतु याहवेहने त्याला स्वप्ने किंवा उरीम किंवा संदेष्टे या कोणत्याही द्वारे उत्तर दिले नाही. तेव्हा शौल त्याच्या सेवकांना म्हणाला, “माझ्यासाठी एक स्वामिनी शोधा की, जी मृतात्म्यांशी संपर्क करते, म्हणजे मी जाईन आणि तिला विचारेन.” ते म्हणाले, “एक स्त्री एनदोर येथे आहे.” तेव्हा शौलाने आपला वेश बदलून वेगळे कपडे घातले आणि दोन माणसे घेऊन रात्रीच्या वेळेस त्या स्त्रीकडे गेला. आणि म्हणाला, “माझ्यासाठी एक आत्म्याला विचार आणि मी ज्याचे नाव सांगतो त्याला माझ्यासाठी वर आण.” परंतु ती स्त्री त्याला म्हणाली, “तुला नक्कीच माहीत आहे की, शौलाने काय केले आहे. चेटकीण आणि तंत्रमंत्र करणाऱ्यांना त्याने या देशातून घालवून टाकले आहे. मी मरावे म्हणून माझ्या जिवासाठी तू सापळा का टाकतोस?” शौलाने तिला याहवेहची शपथ घातली, “जिवंत याहवेहची शपथ, यासाठी तुला शिक्षा होणार नाही.” तेव्हा त्या स्त्रीने विचारले, “मी तुझ्यासाठी कोणाला वर आणू?” तो म्हणाला, “शमुवेलला वर आण.” जेव्हा त्या स्त्रीने शमुवेलला पाहिले, तेव्हा ती मोठ्याने ओरडली आणि शौलाला म्हणाली, “तुम्ही मला का फसविले आहे? तुम्ही शौल आहात!” शौल राजाने तिला म्हटले, “भिऊ नकोस, तुला काय दिसते?” ती स्त्री म्हणाली, “जमिनीतून एक भुतासारखी आकृती वर येताना दिसत आहे.” “तो कसा दिसतो?” त्याने विचारले. “झगा घातलेला एक वृद्ध पुरुष वर येत आहे,” ती म्हणाली. तेव्हा शौलाने ओळखले की तो शमुवेल होता आणि त्याने स्वतः त्याचे तोंड खाली जमिनीकडे करून दंडवत घातले. शमुवेल शौलास म्हणाला, “मला वर आणून तू मला का त्रास दिला आहेस?” शौलाने उत्तर दिले, “मी फार मोठ्या संकटात आहे, पलिष्टी माझ्याविरुद्ध लढाई करत आहेत आणि परमेश्वराने मला सोडून दिले आहे. परमेश्वर मला संदेष्ट्यांच्या अथवा स्वप्नां द्वारे उत्तर देत नाही. यामुळेच मी काय करावे हे तुम्ही मला सांगावे म्हणून मी तुम्हाला बोलाविले आहे.” शमुवेल म्हणाला, “याहवेहने तुला सोडले आहे आणि ते तुझा शत्रू झाले आहे, तर तू माझा सल्ला का घ्यावा? याहवेहने माझ्याद्वारे जे भविष्य सांगितले होते, ते त्यांनी केले आहे. याहवेहने तुझ्या हातून राज्य फाडून टाकले आहे आणि ते तुझ्या शेजार्‍यांपैकी एकाला म्हणजेच दावीदाला दिले आहे. कारण तू याहवेहची आज्ञा पाळली नाही किंवा अमालेकी लोकांविरुद्ध याहवेहचा क्रोध उगारला नाही, म्हणून याहवेहने आज हे तुझ्यासाठी केले आहे. याहवेह इस्राएली लोकांना आणि तुला पलिष्ट्यांच्या हाती देणार आहे आणि उद्या तू आणि तुझी मुले माझ्याबरोबर असतील. आणि याहवेह इस्राएलच्या सैन्याला पलिष्ट्यांच्या देईल.”

1 शमुवेल 28 वाचा