YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 शमुवेल 20

20
दावीद आणि योनाथान
1नंतर दावीद रामाहतील नायोथ येथून पळून गेला आणि योनाथानकडे जाऊन त्याने विचारले, “मी काय केले आहे? माझा अपराध काय आहे? तुझ्या पित्याशी मी काय चुकीचे वागलो आहे की, ते मला मारण्याचा प्रयत्न करीत आहेत?”
2“कधीच नाही!” योनाथानने उत्तर दिले. “तू मरणार नाहीस! माझा पिता कोणतेही काम; लहान किंवा मोठे, ते मला सांगितल्याशिवाय करीत नाही. तर ते माझ्यापासून ही गोष्ट का लपवून ठेवतील? हे खरे आहे ना!”
3परंतु दावीदाने शपथ घेतली आणि म्हणाला, “तुझ्या पित्याला चांगलेच माहीत आहे की, मी तुझ्या दृष्टीत कृपा पावलो आहे आणि ते स्वतःशी म्हणाले आहेत, ‘योनाथानला हे माहीत होऊ नये नाहीतर तो दुःखी होईल.’ तरीपण जिवंत याहवेहची व तुझ्या जिवाची शपथ की, माझ्यामध्ये व मृत्यूमध्ये फक्त एका पावलाचे अंतर आहे.”
4योनाथान दावीदाला म्हणाला, “तुला वाटेल, ते मी तुझ्यासाठी करेन.”
5तेव्हा दावीद म्हणाला, “पाहा उद्या चंद्रदर्शन आहे आणि मला राजाबरोबर चंद्रदर्शनाचे भोजन करावयाचे आहे; पण मला जाऊ दे म्हणजे मी परवाच्या संध्याकाळपर्यंत शेतात लपून राहीन. 6जर माझी अनुपस्थिती तुझ्या पित्याला जाणवली, तर त्यांना सांग, ‘दावीदाला त्याच्या गावाकडे, बेथलेहेमकडे तातडीने जायचे होते, कारण त्याच्या संपूर्ण कुळासाठी वार्षिक यज्ञ आहे.’ 7जर ते म्हणाले, ‘ठीक आहे,’ तर तुझा सेवक सुरक्षित आहे. परंतु जर त्यांचा संयम सुटला तर खात्री करून घे की, मला इजा करण्याचा त्यांचा हेतू आहे. 8तर, तुझ्या सेवकावर दया दाखव, कारण तू त्याला याहवेहसमोर तुझ्याशी करार करून घेतले आहेस. जर मी दोषी आहे, तर तू स्वतःच मला मार! तुझ्या पित्याच्या हाती मला का स्वाधीन करावे?”
9“कधीच नाही!” योनाथान म्हणाला. “जर मला थोडीतरी कल्पना असती की, माझ्या पित्याने तुला इजा करावयाचे योजले आहे, तर मी तुला सांगणार नाही काय?”
10दावीदाने योनाथानाला विचारले, “जर तुझ्या पित्याने तुला कठोर उत्तर दिले तर मला कोण सांगणार?”
11योनाथान दावीदाला म्हणाला, “चल, आपण बाहेर मैदानात जाऊ.” तेव्हा ते मिळून तिकडे गेले.
12नंतर योनाथान दावीदाला म्हणाला, “याहवेह इस्राएलचे परमेश्वर यांची मी शपथ घेतो की, परवा या सुमाराला मी खात्रीने माझ्या पित्याचे मनोगत समजून घेईन, जर तुझ्या हिताचे काही असले तर ते मी तुला कळविणार नाही काय? 13परंतु जर तुला इजा करावी असा माझ्या पित्याचा हेतू असला आणि जर त्याविषयी मी तुला कळवले नाही आणि तुला शांतीने पाठवले नाही, तर याहवेह योनाथानशी असेच किंवा त्याहून अधिक कठोरपणे वागो. याहवेह जसे माझ्या पित्याबरोबर आहेत तसेच तुझ्याबरोबरही असोत. 14आणि जशी याहवेहची अटळ दया तशी मी जिवंत असेपर्यंत माझ्यावर असू दे, म्हणजे मी मरणार नाही, 15एवढेच नाही तर, याहवेहने दावीदाच्या प्रत्येक शत्रूंना पृथ्वीच्या पाठीवरून काढून टाकले तरीसुद्धा माझ्या कुटुंबावरील तुझी दया कधीही काढू नकोस.”
16तेव्हा योनाथानने दावीदाच्या घराण्याबरोबर एक करार केला, तो म्हणाला, “आता याहवेह दावीदाच्या शत्रूंची झडती घेवो.” 17आणि योनाथानने दावीदाकडून त्याच्या आपल्या प्रीतिकरिता त्याच्या शपथेची पुष्टी केली, कारण आपल्या जिवासारखीच त्याने त्याच्यावर प्रीती केली.
18नंतर योनाथान दावीदाला म्हणाला, “उद्या चंद्रदर्शन आहे. तुझी अनुपस्थिती जाणवेल, कारण तुझे आसन रिकामे असणार. 19परवाच्या दिवशी संध्याकाळपर्यंत तू त्या ठिकाणी जाऊन लप, जिथे आधी हा त्रास सुरू झाला तेव्हा लपला होता आणि एझेल दगडाकडे वाट पाहा. 20मी निशाणा साधित आहे असे दाखवित त्या दगडाच्या दिशेने तीन बाण मारेन. 21नंतर मी एका मुलाला पाठवेन आणि सांगेन, ‘जा, बाणांचा शोध कर.’ जर मी त्याला म्हटले, ‘पाहा, बाण तुझ्या अलीकडच्या बाजूला आहेत; ते इकडे घेऊन ये,’ तेव्हा तू ये, कारण खचितच जिवंत याहवेहची शपथ, तू सुरक्षित आहेस; तुला धोका नाही.” 22पण जर मी त्या मुलाला म्हटले, “पाहा, बाण तुझ्या पलीकडे आहेत, तेव्हा तू निघून जा, कारण याहवेह तुला दूर पाठवित आहेत. 23आणि ज्या विषयाबद्दल तू आणि मी चर्चा केली आहे, ते लक्षात ठेव, तुझ्या आणि माझ्यामध्ये याहवेह सर्वकाळ साक्षी आहे.”
24तेव्हा दावीद शेतात जाऊन लपला आणि चंद्रदर्शनाच्या दिवशी राजा भोजनास बसले. 25राजा नेहमीप्रमाणे आसनावर योनाथानच्या समोरच्या भिंतीजवळ बसले होते आणि अबनेर शौलाच्या बाजूला बसला, परंतु दावीदाचे आसन रिकामेच होते. 26शौल त्या दिवशी काही बोलले नाही, कारण त्यांना वाटले, “दावीदाला काहीतरी झाल्यामुळे तो विधीनुसार अशुद्ध झाला असेल; खात्रीनेच तो अशुद्ध आहे.” 27परंतु दुसर्‍या दिवशी, त्या महिन्याच्या दुसर्‍या दिवशी दावीदाचे स्थान पुन्हा रिकामे होते. तेव्हा शौलाने त्यांचा पुत्र योनाथान याला विचारले, “इशायाचा पुत्र काल आणि आजही भोजनास का आला नाही?”
28योनाथानने शौलास उत्तर दिले, “दावीदाने बेथलेहेमला जाण्यासाठी मला आग्रहाने परवानगी मागितली. 29तो म्हणाला, ‘मला जाऊ दे, कारण माझे घराणे नगरामध्ये यज्ञ करीत आहेत आणि मी तिथे असावे असा माझ्या भावाने हुकूम केला आहे. जर तुझी माझ्यावर कृपादृष्टी असली, तर मला माझ्या भावांना भेटण्यासाठी जाऊ दे.’ त्यामुळे तो राजाच्या मेजवानीस आला नाही.”
30शौलाचा राग योनाथानवर भडकला आणि तो त्याला म्हणाला, “भ्रष्ट आणि फितुरी स्त्रीच्या मुला! तू तुझ्या स्वतःची व जिने तुला जन्म दिला त्या तुझ्या आईची बेअब्रू करून त्या इशायच्या पुत्राच्या बाजूने आहेस हे मला माहीत नाही काय? 31जोपर्यंत इशायाचा पुत्र या पृथ्वीवर जिवंत आहे, तोपर्यंत तू किंवा तुझे राज्य स्थापित होणार नाही. आताच कोणाला तरी त्याच्याकडे पाठवून त्याला माझ्याकडे घेऊन ये, कारण त्याने अवश्य मरावे!”
32योनाथानने आपला पिता शौल याला विचारले, “त्याला मारून टाकावे असे त्याने काय केले आहे?” 33परंतु शौलाने योनाथानला मारण्यासाठी त्याच्यावर भाला फेकला. तेव्हा योनाथानला समजले की दावीदाला मारावे असा संकल्प त्याच्या पित्याने केला आहे.
34योनाथान रागाने संतप्त होऊन मेजावरून उठला; चंद्रदर्शन सणाच्या दुसर्‍या दिवशी त्याने भोजन केले नाही; कारण दावीदाप्रित्यर्थ आपल्या पित्याची लज्जास्पद वागणूक पाहून त्याला फार वाईट वाटले.
35सकाळी योनाथान एका लहान मुलाला घेऊन दावीदाची भेट घेण्यासाठी शेतात गेला. 36आणि तो त्या मुलाला म्हणाला, “मी बाण मारतो, तू पळत जाऊन ते बाण शोध.” तो मुलगा पळू लागला, तेव्हा योनाथानने त्याच्या पलीकडे बाण मारला. 37जेव्हा तो मुलगा योनाथानचा बाण ज्या ठिकाणी पडला होता तिथे आला, तेव्हा योनाथान त्याला ओरडून म्हणाला, “बाण तुझ्या पलीकडे नाही काय?” 38तेव्हा योनाथान ओरडला, “घाई कर. लवकर जा! थांबू नकोस!” त्या मुलाने बाण उचलला आणि त्याच्या धन्याकडे परतला. 39(त्या मुलाला या सर्व गोष्टीबद्दल काही माहीत नव्हते; फक्त योनाथान आणि दावीद यांनाच ते माहीत होते.) 40नंतर योनाथानने आपली शस्त्रे त्या मुलाकडे देत म्हटले, “जा, हे घेऊन परत नगराकडे जा.”
41तो मुलगा निघून गेल्यानंतर, दावीद त्या दगडाच्या दक्षिण बाजूने उठला आणि योनाथानसमोर भूमीवर उपडे पडून तीन वेळेस नमन केले. नंतर त्या दोघांनी एकमेकांचे चुंबन घेतले आणि एकत्र रडले—परंतु दावीद अधिक रडला.
42योनाथान दावीदाला म्हणाला, “शांतीने जा, कारण याहवेहच्या नावाने आपण एकमेकांशी मैत्रीची शपथ घेतली आहे, आपण असे म्हटले आहे, ‘तुझ्या आणि माझ्यामध्ये आणि तुझे वंशज आणि माझे वंशज यामध्ये याहवेह साक्षी आहेत.’ ” तेव्हा दावीद तिथून निघाला आणि योनाथान नगराकडे परत गेला.

सध्या निवडलेले:

1 शमुवेल 20: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन