YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 शमुवेल 10

10
1नंतर शमुवेलने जैतून तेलाची एक कुपी घेतली आणि शौलाच्या डोक्यावर ओतली, त्याचे चुंबन घेत म्हणाला, “याहवेहने तुला त्यांच्या वतनावर#10:1 काही मूळ प्रतींनुसार इस्राएल लोकांवर अधिकारी म्हणून अभिषेक केला नाही काय? 2आज तू माझ्याकडून गेल्यावर, बिन्यामीन प्रदेशाच्या सीमेवर सेल्सेह येथे राहेलच्या कबरेजवळ तुला दोन माणसे भेटतील. ते तुला सांगतील, ‘ज्या गाढवांच्या शोधात तू बाहेर पडला होता ती सापडली आहेत आणि आता तुझ्या वडिलांनी त्यांच्याबद्दलचा विचार करण्याचे थांबविले आहे आणि तुझ्याबद्दल काळजी करीत आहेत. ते म्हणत आहेत मी, “माझ्या मुलाविषयी काय करावे?” ’
3“नंतर तिथून पुढे जात तू ताबोराच्या मोठ्या एलावृक्षाजवळ पोहोचशील. तिथे तुला बेथेलकडे परमेश्वराची आराधना करण्यासाठी निघालेली तीन माणसे भेटतील. एकजण तीन लहान करडे, दुसरा तीन भाकरी आणि तिसरा द्राक्षारसाची एक बुधली घेऊन जात असेल. 4ते तुला अभिवादन करतील आणि तुला दोन भाकरी देतील, त्या तू त्यांच्याकडून स्वीकारशील.
5“त्यानंतर तू परमेश्वराच्या गिबियाकडे, जिथे पलिष्ट्यांची चौकी आहे तिथे जाशील. त्या नगरात जाताच, संदेष्ट्यांची एक मिरवणूक सतार, डफ, सनई आणि वीणा ही वाद्ये वाजवित उच्च स्थानावरून खाली उतरत असताना आणि भविष्यवाणी करत असताना तुला आढळतील. 6याहवेहचा आत्मा सामर्थ्याने तुझ्यावर येईल आणि तू त्यांच्याबरोबर भविष्यवाणी करशील; आणि तुझ्यात बदल होऊन तू निराळा व्यक्ती होशील. 7ही चिन्हे पूर्ण होतील तेव्हा जे काही तुझ्या हाती येईल ते तू कर, कारण परमेश्वर तुझ्याबरोबर आहे.
8“माझ्यापुढे तू गिलगाल येथे जा. होमार्पणे आणि शांत्यर्पणे करण्यासाठी मी खचित खाली तुझ्याकडे येईल, परंतु मी तुझ्याकडे येऊन तू काय करावे ते मी तुला सांगेपर्यंत सात दिवस तू माझी वाट पाहा.”
शौलाला राजा केले जाते
9शमुवेलपासून निघून जाण्यासाठी शौल वळताच, परमेश्वराने शौलाचे हृदय बदलले आणि त्याच दिवशी ही सर्व चिन्हे पूर्ण झाली. 10जेव्हा शौल आणि त्याचा सेवक गिबियाहकडे आले तेव्हा संदेष्ट्यांची मिरवणूक त्याला भेटली; तेव्हा परमेश्वराचा आत्मा सामर्थ्याने त्याच्यावर उतरला आणि तो त्यांच्याबरोबर भविष्यवाणी करू लागला. 11सर्व लोक जे शौलाला पूर्वीपासून ओळखीत होते, जेव्हा त्यांनी त्याला संदेष्ट्यांबरोबर भविष्यवाणी करताना पाहिले, तेव्हा ते आपसात म्हणू लागले, “कीशच्या मुलाला हे काय झाले आहे? शौलसुद्धा संदेष्ट्यांपैकी एक आहे काय?”
12तिथे राहत असलेल्या एका मनुष्याने उत्तर दिले, “त्यांचा पिता#10:12 त्या काळात संदेष्ट्यांच्या प्रमुख शिक्षकाला पिता म्हटले जात असे. कोण आहे?” यावरून अशी म्हण पडली: “शौलसुद्धा संदेष्ट्यांपैकी आहे काय?” 13शौलाने भविष्यवाणी करण्याचे थांबविल्यानंतर तो उच्चस्थानी गेला.
14तेव्हा शौलाच्या काकाने त्याला आणि त्याच्या सेवकाला विचारले, “तुम्ही कुठे गेला होता?”
तो म्हणाला, “गाढवांना शोधण्यासाठी गेलो होतो, परंतु ती आम्हाला सापडत नाहीत असे पाहून, आम्ही शमुवेलकडे गेलो.”
15शौलाचे काका म्हणाले, “शमुवेल तुला काय म्हणाले ते मला सांग.”
16शौलाने उत्तर दिले, “गाढवे सापडली आहेत याची त्यांनी आम्हाला खात्री दिली.” परंतु राजपदाबद्दल शमुवेलने जे सांगितले होते ते त्याने त्याच्या काकांना सांगितले नाही.
17शमुवेलने इस्राएली लोकांना याहवेहकडे मिस्पाह येथे बोलाविले 18आणि त्यांना म्हटले, “याहवेह, इस्राएलचे परमेश्वर, असे म्हणतात: ‘मी इस्राएलास इजिप्तमधून बाहेर आणले आणि तुम्हाला इजिप्तच्या सत्तेपासून आणि ज्या सर्व राष्ट्रांनी तुम्हाला अन्यायाने वागवले, त्यांच्यापासून मी तुम्हाला सोडविले.’ 19परंतु तुम्ही आता तुमच्या परमेश्वराला नाकारले आहे, जे तुम्हाला तुमच्या सर्व अरिष्टांपासून आणि संकटांपासून वाचवितात. आणि तुम्ही म्हणाला, ‘नको, आता आमच्यावर एक राजा नेम.’ तर आता तुमच्या गोत्रानुसार व कुळांनुसार याहवेहसमोर हजर व्हा.”
20जेव्हा शमुवेलने सर्व इस्राएलला त्यांच्या गोत्राप्रमाणे पुढे आणले, बिन्यामीन गोत्राची चिठ्ठी निघाली. 21नंतर त्याने बिन्यामीन गोत्राला कुळानुसार पुढे आणले आणि मात्रीच्या कुळाची चिठ्ठी निघाली. शेवटी कीशाचा पुत्र शौल याची निवड झाली. परंतु जेव्हा त्यांनी त्याचा शोध केला, तेव्हा तो कुठेच सापडला नाही. 22तेव्हा त्यांनी याहवेहला विचारले, “तो मनुष्य येथे आला आहे काय?”
आणि याहवेह म्हणाले, “होय, त्याने स्वतःला सामानामध्ये लपविले आहे.”
23तेव्हा त्यांनी पळत जाऊन त्याला बाहेर आणले आणि तो लोकांमध्ये उभा राहिला, तेव्हा सर्व लोक त्याच्या खांद्यापर्यंतच होते. 24शमुवेल सर्व लोकांस म्हणाला, “याहवेहने निवडलेल्या या मनुष्याला तुम्ही पाहत आहात काय? सर्व लोकांमध्ये त्याच्यासारखा कोणीही नाही.”
तेव्हा लोकांनी मोठ्याने घोषणा दिली, “राजा चिरायू होवो!”
25शमुवेलने राजपदाचे हक्क आणि कर्तव्ये लोकांना समजावून सांगितली. त्याने ती एका चर्मपत्राच्या गुंडाळीवर लिहून ठेवली आणि ती याहवेहसमोर ठेवली. नंतर शमुवेलने लोकांना आपआपल्या घरी पाठवून दिले.
26शौलसुद्धा ज्यांच्या हृदयास परमेश्वराने स्पर्श केला होता अशा शूर पुरुषांबरोबर गिबियाह येथे आपल्या घरी गेला. 27परंतु काही अधर्मी लोक म्हणाले, “हा मनुष्य आमचा काय उद्धार करणार?” त्यांनी त्याला तुच्छ मानले आणि त्याच्यासाठी भेटी आणल्या नाहीत. परंतु शौल शांत राहिला.

सध्या निवडलेले:

1 शमुवेल 10: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन