1 राजे 8
8
मंदिरात कोश आणला
1तेव्हा शलोमोन राजाने दावीदाचे नगर सीयोन येथून याहवेहच्या कराराचा कोश आणण्यासाठी इस्राएल लोकांच्या पुढाऱ्यांना, सर्व गोत्रप्रमुखांना आणि इस्राएली कुटुंबाच्या सर्व प्रमुखांना त्याच्यापुढे येण्यास यरुशलेमास बोलाविले. 2इस्राएलचे सर्व लोक एथानीम महिन्यात, म्हणजे सातव्या महिन्यातील सणाच्या काळात शलोमोन राजाकडे एकत्र आले.
3जेव्हा इस्राएलचे सर्व वडीलजन आले, तेव्हा याजकांनी कोश उचलून घेतला, 4आणि त्यांनी याहवेहचा कोश, सभामंडप व त्यातील सर्व पवित्र पात्रे आणली. याजक व लेवी यांनी ती वाहून आणली, 5राजा शलोमोन आणि जमलेली इस्राएलची संपूर्ण मंडळी कोशासमोर इतक्या मेंढरांचा आणि गुरांचा बळी दिले की, त्यांची नोंद किंवा मोजणी करता येत नव्हती.
6नंतर याजकांनी याहवेहच्या कराराचा कोश मंदिराच्या आतील पवित्रस्थानी; म्हणजेच परमपवित्रस्थानात आणून त्याच्या नियोजित ठिकाणी, अर्थात् करुबांच्या पंखाखाली ठेवला. 7करुबांचे पंख कोशावर असे पसरले होते की त्यांनी कोश आणि तो वाहून नेण्याचे दांडे आच्छादले जात होते. 8ते दांडे इतके लांब होते की, त्यांची टोके आतील खोलीसमोरील पवित्रस्थानातून दिसत असत, परंतु पवित्रस्थानाच्या बाहेरून ती दिसत नसे; आणि ते आजही तिथेच आहेत. 9इस्राएली लोक इजिप्त देशातून बाहेर आल्यानंतर याहवेहने त्यांच्याशी करार केला तेव्हा होरेबमध्ये मोशेने ठेवलेल्या दोन दगडी पाट्यांशिवाय त्या कोशात दुसरे काहीही नव्हते.
10जेव्हा याजक पवित्रस्थानातून बाहेर आले, तेव्हा याहवेहचे मंदिर मेघाने भरले. 11आणि त्या मेघांमुळे याजकांना सेवा करता येईना, कारण याहवेहच्या तेजाने याहवेहचे मंदिर भरले होते.
12तेव्हा शलोमोन म्हणाला, “याहवेहने म्हटले आहे की ते घनदाट मेघात राहतील; 13खचितच मी आपणासाठी एक भव्य मंदिर बांधले आहे, की आपण त्यात सर्वकाळ वस्ती करावी.”
14इस्राएलची सर्व मंडळी तिथे उभी असताना, राजाने मागे वळून त्यांना आशीर्वाद दिला. 15तेव्हा राजाने म्हटले:
“याहवेह, इस्राएलचे परमेश्वर धन्यवादित असोत, कारण त्यांनी माझे वडील दावीद, यांना स्वतःच्या मुखाने दिलेले वचन आज स्वहस्ते पूर्ण केले आहे. कारण याहवेहने म्हटले होते की, 16‘मी माझ्या इस्राएली लोकांना इजिप्तमधून बाहेर आणले, तेव्हापासून इस्राएलातील कोणत्याही गोत्राचे शहर माझ्या नावाने मंदिर तिथे बांधावे म्हणून मी निवडले नाही, परंतु माझ्या इस्राएली लोकांवर राज्य करावे म्हणून मी दावीदाची निवड केली.’
17“याहवेह इस्राएलच्या परमेश्वराच्या नावासाठी मंदिर बांधावे असे माझे वडील दावीद यांच्या मनात होते. 18पण याहवेहने माझे पिता दावीदाला म्हटले, ‘माझ्या नावासाठी मंदिर बांधावे अशी आपल्या हृदयात इच्छा बाळगून तू फार चांगले केले. 19तथापि, तू ते मंदिर बांधणार नाहीस, तर तुझा पुत्र, तुझ्या स्वतःच्या हाडामांसाचा; तोच माझ्या नावासाठी मंदिर बांधील.’
20“याहवेहने दिलेले वचन पूर्ण केले आहे: माझे वडील दावीदाचा मी वारस झालो आणि याहवेहने अभिवचन दिल्याप्रमाणे आता इस्राएलच्या राजासनावर मी बसतो आणि याहवेह इस्राएलचे परमेश्वर यांच्यासाठी मी हे मंदिर बांधले आहे. 21आमच्या पूर्वजांना जेव्हा याहवेहने इजिप्त देशातून बाहेर आणले तेव्हा त्यांच्याशी याहवेहने जो करार केला तो ज्यात आहे त्या कोशासाठी मी एक स्थान तयार केले आहे.”
शलोमोनची समर्पण प्रार्थना
22नंतर शलोमोनने इस्राएलच्या सर्व मंडळीदेखत याहवेहच्या वेदीसमोर उभे राहून वर स्वर्गाकडे आपले हात पसरले 23आणि म्हटले:
“हे याहवेह, इस्राएलच्या परमेश्वरा, वर स्वर्गात किंवा खाली पृथ्वीवर तुमच्यासारखा परमेश्वर नाही; जे आपले सेवक सर्व हृदयाने आपल्या मार्गात चालतात त्यांच्याशी आपण आपल्या प्रीतीच्या कराराची पूर्तता करतात. 24आपला सेवक, माझे पिता दावीदाला दिलेले अभिवचन आपण पाळले आहे; आपण आपल्या मुखाने अभिवचन दिले आणि स्वहस्ते ते आज पूर्ण केले आहे.
25“आता हे याहवेह, इस्राएलच्या परमेश्वरा, आपला सेवक माझे पिता दावीद यांना आपण जे वचन दिले होते ते आपण पाळावे, आपण म्हटले होते, ‘जसा तू होतास तसेच तुझे वंशज माझ्यासमोर विश्वासूपणे चालण्यास सावधान राहतील, तर इस्राएलच्या राजासनावर बसण्यास तुझे वारस कधीही खुंटणार नाही.’ 26तर आता, हे इस्राएलच्या परमेश्वरा, आपला सेवक, माझे पिता दावीद यांना जे अभिवचन आपण दिले होते ते प्रतितीस येऊ द्यावे.
27“पण परमेश्वर खचितच पृथ्वीवर राहतील काय? स्वर्ग, अगदी सर्वोच्च स्वर्गात सुद्धा आपण मावणार नाहीत! मग हे जे मंदिर मी बांधले आहे त्यात आपण कसे मावाल? 28तरीही हे याहवेह, माझ्या परमेश्वरा, आपल्या सेवकाच्या प्रार्थनेकडे व त्याच्या दयेच्या याचनेकडे लक्ष द्यावे. आपला सेवक आपल्याकडे प्रार्थना व धावा करीत आहे त्याकडे कान द्या. 29‘माझे नाव या ठिकाणी राहेल’ असे ज्या स्थळाविषयी आपण म्हटले होते, त्या या मंदिराकडे दिवस व रात्र आपली दृष्टी असो; यासाठी की या ठिकाणातून करत असलेली तुमच्या सेवकाची प्रार्थना आपण ऐकावी. 30आपला सेवक व आपले इस्राएली लोक जेव्हा या ठिकाणातून विनंती करतील, तेव्हा त्यांच्या प्रार्थना ऐका. स्वर्गातून, आपल्या निवासस्थानातून कान द्या, व ती ऐकून त्यांना क्षमा करा.
31“जेव्हा कोणी आपल्या शेजार्याचा अपराध करेल व त्यांना शपथ घ्यावी लागली, तर ते आपल्या वेदीसमोर या मंदिरात शपथ घेतील, 32तेव्हा स्वर्गातून ऐकून त्याप्रमाणे घडू द्या. आपल्या सेवकांचा न्याय करून दोषी व्यक्तीने केलेल्या कृत्यांनुसार त्यांचे शिर खाली झुकवा व निर्दोष्यास त्यांच्या निर्दोषतेनुसार वागणूक देऊन त्यांना न्याय द्यावा.
33“आपल्याविरुद्ध पाप केल्यामुळे जेव्हा आपले इस्राएली लोक त्यांच्या शत्रूद्वारे पराभूत केले जातात आणि जेव्हा ते आपल्याकडे पुन्हा वळतात व आपल्या नावाची थोरवी गाऊन, या मंदिरात आपल्याकडे प्रार्थना व विनंती करतात, 34तेव्हा स्वर्गातून ऐकून आपल्या इस्राएली लोकांच्या पापांची क्षमा करा व जो देश आपण त्यांच्या पूर्वजांना दिला त्यात त्यांना परत आणावे.
35“आपल्या लोकांनी आपल्याविरुद्ध केलेल्या पापामुळे जेव्हा आकाश बंद होऊन पाऊस पडणार नाही आणि जेव्हा ते या ठिकाणातून प्रार्थना करतील आणि आपल्या नावाची थोरवी गातील आणि आपण त्यांच्यावर आणलेल्या क्लेशामुळे ते आपल्या पापापासून वळतील, 36तेव्हा त्यांची विनंती ऐकून आपले सेवक, इस्राएली लोकांच्या पापांची क्षमा करा. जीवनाचा योग्य मार्ग त्यांना शिकवा व जो देश आपण आपल्या लोकांना वतन म्हणून दिला त्यावर पाऊस पाठवावा.
37“जेव्हा देशावर दुष्काळ किंवा पीडा येते किंवा पिके करपवून टाकणारा वारा किंवा भेरड, टोळ किंवा नाकतोडे आले किंवा शत्रूने त्यांच्या एखाद्या शहराला वेढा घातला, असे कोणतेही अरिष्ट किंवा रोग आला, 38आणि आपल्या इस्राएली लोकांपैकी कोणी त्यांच्या हृदयाला होत असलेले क्लेश जाणून प्रार्थना किंवा विनंती केली आणि त्यांचे हात मंदिराकडे पसरतील; 39तेव्हा स्वर्ग जे आपले निवासस्थान आहे तिथून ऐकून त्यांना क्षमा करा व त्यानुसार त्यांना करा; प्रत्येकाच्या सर्व कृत्यांनुसार त्यांच्याशी वागा, कारण आपणास त्यांच्या हृदयाची पारख आहे (कारण केवळ आपणच प्रत्येक मानवाचे हृदय जाणणारे आहात), 40यासाठी की जो देश आपण आमच्या पूर्वजांना दिला, त्यात जितका काळ ते राहतील त्यांनी तुमचे भय बाळगावे.
41“असा कोणी परदेशी जो आपल्या इस्राएली लोकांमधील नाही परंतु आपल्या नावास्तव लांबच्या देशातून आला; 42कारण त्यांनी आपले महान नाव आणि आपला पराक्रमी हात व आपला लांबविलेला बाहू याबद्दल ऐकले; व जेव्हा ते येऊन या मंदिराकडे वळून प्रार्थना करतील, 43तेव्हा स्वर्ग जे आपले निवासस्थान तिथून आपण त्यांची प्रार्थना ऐकावी. त्या परदेशीयाने जे काही आपल्याकडे मागितले ते आपण त्यांना द्यावे, अशासाठी की पृथ्वीवरील लोकांनी आपले नाव ओळखावे व आपल्या इस्राएली लोकांप्रमाणे आपले भय धरावे व जाणावे की मी बांधलेल्या या घरावर आपले नाव आहे.
44“जेव्हा आपले लोक आपण जिथे पाठवाल तिथे त्यांच्या शत्रूविरुद्ध युद्धास जातात आणि जेव्हा ते तुम्ही निवडलेल्या नगराकडे आणि तुमच्या नावासाठी मी बांधलेल्या मंदिराकडे याहवेहची प्रार्थना करतील, 45तेव्हा स्वर्गातून त्यांची प्रार्थना व विनंती ऐकून त्यांच्यावतीने न्याय करावा.
46“जेव्हा ते आपणाविरुद्ध पाप करतील; कारण पाप करीत नाही असा कोणी मनुष्य नाही आणि त्यामुळे रागावून आपण त्यांना त्यांच्या शत्रूंच्या हाती दिले आणि त्यांनी त्यांना गुलाम म्हणून त्यांच्या जवळच्या किंवा दूरच्या देशात कैद करून नेले; 47आणि ते कैदेत असता त्यांच्या हृदयाचा पालट झाला व पश्चात्ताप करीत कैद करून नेलेल्यांच्या देशात आपल्याकडे असे म्हणत विनंती केली, ‘आम्ही पाप केले आहे, आम्ही विपरीत वागलो आहोत, आम्ही दुष्टतेने वागलो आहोत’; 48आणि त्यांना कैद करून नेलेल्या त्यांच्या शत्रूंच्या देशात ते जर त्यांच्या संपूर्ण हृदयाने व जिवाने आपणाकडे वळले, आणि त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या देशाकडे, जे शहर आपण निवडले आणि मी आपल्या नावासाठी बांधलेल्या या मंदिराकडे वळून प्रार्थना करतील, 49तेव्हा स्वर्ग जे आपले निवासस्थान आहे तिथून त्यांची प्रार्थना व विनंती ऐकून त्यांच्यावतीने न्याय करावा. 50आणि ज्या आपल्या लोकांनी आपणाविरुद्ध पाप केले आहे त्यांना क्षमा करावी. त्यांनी आपणाविरुद्ध केलेल्या सर्व अपराधांची त्यांना क्षमा करा व त्यांना कैद करून नेणार्यांनी त्यांच्यावर दया दाखवावी असे आपण करावे; 51कारण ते तुमचे लोक आणि तुमचे वतन आहेत, ज्यांना तुम्ही इजिप्त देशातून, त्या लोखंडाच्या भट्टीतून बाहेर काढले आहे.
52“तुमचे कान आपल्या सेवकाच्या व आपल्या इस्राएली लोकांच्या विनंतीकडे असावे आणि जेव्हा ते आपल्याकडे आरोळी करतील तेव्हा त्यांचे ऐकावे. 53कारण हे सार्वभौम याहवेह, आपण जेव्हा आमच्या पूर्वजांना इजिप्त देशातून बाहेर काढले त्यावेळी तुमचा सेवक मोशेद्वारे तुम्ही जसे जाहीर केले, त्यानुसार त्यांना आपले वतन व्हावे म्हणून पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांतून तुम्ही त्यांना वेगळे केले आहे.”
54शलोमोनने वेदीसमोर गुडघे टेकून व स्वर्गाकडे हात पसरून याहवेहची प्रार्थना करून संपविल्यावर तो याहवेहच्या वेदीपुढून उठला. 55त्याने उभे राहून सर्व इस्राएली मंडळीला उंच आवाजात असे म्हणत आशीर्वाद दिला:
56“याहवेह धन्यवादित असोत, त्यांनी आपल्या अभिवचनानुसार त्यांच्या इस्राएली लोकांना विसावा दिला आहे. त्यांचा सेवक मोशेद्वारे जी चांगली अभिवचने याहवेहने दिली त्यातील एकही निष्फळ झाले नाही. 57याहवेह आमचे परमेश्वर जसे आमच्या पूर्वजांसह होते तसेच ते आम्हासोबतही असो; त्यांनी कधीही आमचा त्याग करू नये. 58आम्ही त्यांच्या मार्गात चालावे आणि आमच्या पूर्वजांना दिलेल्या आज्ञा व विधी आम्ही पाळावे म्हणून त्यांनी आमची मने आपल्याकडे वळवावी. 59आणि ज्या या शब्दांनी मी याहवेहसमोर प्रार्थना केली आहे त्या याहवेह आमच्या परमेश्वरापुढे रात्रंदिवस असो, यासाठी की रोजच्या गरजेनुसार ते आपल्या सेवकाला व आपल्या इस्राएली लोकांना साहाय्य करो. 60म्हणजे पृथ्वीवरील सर्व लोकांनी ओळखावे की याहवेह हेच परमेश्वर आहेत आणि दुसरा कोणीही नाही. 61आणि आज आहे त्याप्रमाणे तुम्ही याहवेहच्या विधीनुसार राहावे व त्यांच्या आज्ञा पाळाव्या म्हणून तुमची मने याहवेह आमच्या परमेश्वराशी पूर्णपणे समर्पित असावी.”
मंदिराची प्रतिष्ठापना
62नंतर राजा आणि त्याच्याबरोबर असलेल्या सर्व इस्राएली लोकांनी याहवेहसमोर यज्ञे अर्पण केली. 63शलोमोनने शांत्यर्पणासाठी जी अर्पणे केली ती: बावीस हजार गुरे, एक लाख वीस हजार मेंढरे व बोकडे होती. याप्रकारे राजाने व सर्व इस्राएली लोकांनी याहवेहच्या मंदिराची प्रतिष्ठापना केली.
64त्याच दिवशी राजाने याहवेहच्या मंदिरापुढच्या द्वारमंडपाचा मधला भाग पवित्र केला आणि तिथे त्याने होमार्पणे, धान्यार्पणे व शांत्यर्पणाची मांदे ही अर्पण केली, कारण याहवेहपुढे जी कास्याची वेदी होती ती होमार्पणे, धान्यार्पणे व शांत्यर्पणाची मांदे यासाठी फार लहान होती.
65तेव्हा शलोमोन आणि सर्व इस्राएली लोकांनी त्याच्याबरोबर त्यावेळी सण साजरा केला—एक मोठी मंडळी, म्हणजे लेबो हमाथपासून इजिप्तच्या खाडीपर्यंतचे रहिवासी आले होते. त्यांनी याहवेह आमच्या परमेश्वरापुढे सात दिवस व आणखी सात दिवस असे मिळून चौदा दिवस उत्सव साजरा केला. 66आठव्या दिवशी त्याने लोकांना रवाना केले. तेव्हा त्यांनी राजाला आशीर्वाद दिला आणि याहवेहने आपला सेवक दावीद व इस्राएलच्या लोकांसाठी जी सर्व चांगली कृत्ये केली त्यासाठी त्यांच्या अंतःकरणात हर्ष आणि आनंद होता.
सध्या निवडलेले:
1 राजे 8: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.