1 राजे 5
5
मंदिर बांधण्याची तयारी
1त्याचे पिता दावीदाचा अभिषिक्त वारस म्हणून शलोमोनचा राज्याभिषेक झाला आहे असे जेव्हा सोरचा राजा हीरामाने ऐकले, तेव्हा त्याने शलोमोनकडे आपले राजदूत पाठवले, कारण दावीदाशी त्याचे नेहमीच मैत्रीचे संबंध होते. 2शलोमोनने हीरामास परत निरोप पाठवला:
3“आपणास तर माहीतच आहे की माझे पिता दावीदाला सर्व बाजूंनी युद्धाने घेरले होते आणि त्याच्या शत्रूंना याहवेहने त्याच्या पायाखाली देईपर्यंत याहवेह त्यांच्या परमेश्वराच्या नावासाठी त्यांना मंदिर बांधता आले नाही. 4परंतु आता माझ्या याहवेह परमेश्वराने सर्व बाजूंनी मला स्वस्थता दिली आहे. कोणी शत्रू किंवा अरिष्ट नाही. 5जसे याहवेहने माझे पिता दावीदाला सांगितले होते, ‘तुझा पुत्र, ज्याला मी तुझ्या जागी तुझ्या राजासनावर बसवेन तो माझ्या नावासाठी मंदिर बांधेल.’ म्हणून याहवेह माझ्या परमेश्वराच्या नावासाठी मी मंदिर बांधावे अशी मी इच्छा बाळगतो.
6“तर आता लबानोनचे गंधसरू माझ्यासाठी कापले जावे अशी आज्ञा करा. माझी माणसे तुमच्या माणसांबरोबर काम करतील आणि तुमच्या माणसांसाठी तुम्ही जी मजुरी ठरवाल ती मी तुम्हाला देईन. तुम्हाला माहीतच आहे की लाकडाचे काम करण्यात जी निपुणता सीदोनी लोकांमध्ये आहे ती आमच्यात कोणामध्ये नाही.”
7शलोमोनचा निरोप ऐकून हीरामाला अतिशय आनंद झाला व म्हणाला, “आज याहवेहची स्तुती असो, कारण या महान देशावर राज्य करण्यासाठी याहवेहने दावीदाला ज्ञानी पुत्र दिला आहे.”
8तेव्हा हीरामाने शलोमोनला निरोप पाठवला:
“आपण पाठविलेला निरोप मला मिळाला. देवदारू व गंधसरूच्या लाकडाचा पुरवठा आपल्या मागणीनुसार पुरविला जाईल. 9माझी माणसे ती लबानोनपासून भूमध्य समुद्रापर्यंत ओढून नेतील, मी त्यांचे ताफे बनवून जे ठिकाण आपण मला सांगाल तिथपर्यंत पोचते करेन. तिथे मी ते वेगळे करेन आणि मग आपण ते घेऊन जाऊ शकता. आणि माझ्या राजकीय घराण्याला आपण अन्न पुरवावे ही माझी इच्छा आपण पूर्ण करावी.”
10याप्रकारे हीरामाने शलोमोनला हवे तेवढ्या गंधसरू आणि देवदारू लाकडांचा पुरवठा केला. 11आणि शलोमोनने हीरामाला त्याच्या घराण्यासाठी अन्न म्हणून वीस हजार कोर#5:11 म्हणजे 3,250 मेट्रिक टन गहू, त्याचबरोबर वीस हजार कोर#5:11 म्हणजेच 440,000 लीटर दाबून काढलेले जैतुनाचे तेल दिले. याप्रकारे शलोमोन वर्षानुवर्षे ते पाठवित राहिला. 12अभिवचन दिल्याप्रमाणे याहवेहने शलोमोनला ज्ञान दिले. हीराम आणि शलोमोन यांच्यात शांतीचे संबंध होते आणि त्या दोघांनी शांतीचा करार केला.
13शलोमोन राजाने सर्व इस्राएलातून तीस हजार पुरुष मजूर घेतले, 14शलोमोन लबानोनला प्रत्येक महिन्याला दहा हजार पुरुष आळीपाळीने पाठवित असे, म्हणजे ते लबानोनमध्ये एक महिना व दोन महिने आपल्या घरी राहत असत. अदोनिराम बिगारी कामकर्यांवर अधिकारी होता. 15डोंगराळ प्रदेशात शलोमोनचे सत्तर हजार ओझी वाहणारे आणि ऐंशी हजार दगड घडविणारे होते, 16त्याचप्रमाणे शलोमोनचे तीन हजार तीनशे#5:16 काही मूळ प्रतींनुसार 3,600 मुकादम होते, जे प्रकल्पाची देखरेख करून कामगारांचे मार्गदर्शन करीत असत. 17राजाच्या आज्ञेनुसार त्यांनी मंदिराच्या पायासाठी खाणीतून उच्च दर्जाचे मोठे दगडे काढले. 18शलोमोनचे आणि हीरामाचे कारागीर व गिबली येथील कामकर्यांनी मंदिर बांधण्यासाठी लाकूड व दगडे कापून तयार केली.
सध्या निवडलेले:
1 राजे 5: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.