तेव्हा एलीयाह सर्व लोकांना म्हणाला, “माझ्याजवळ या.” ते त्याच्याकडे आले आणि त्याने याहवेहची जी वेदी मोडून गेली होती ती दुरुस्त केली. “तुझे नाव इस्राएल असणार” असे याहवेहने ज्या याकोबाला म्हटले होते त्याच्या वंशजांच्या बारा गोत्रांइतके एलीयाहने बारा धोंडे घेतले. त्या धोंड्यांनी त्याने याहवेहच्या नावाने वेदी बांधली आणि वेदीभोवती दोन सिआह बीज मावेल इतकी मोठी खळगी खणली. त्याने लाकडे रचली, बैल कापून त्याचे तुकडे केले आणि त्या लाकडांवर रचले. मग तो त्यांना म्हणाला, “चार मोठ्या घागरी पाण्याने भरा आणि ते यज्ञावर व लाकडांवर ओता.”
तो म्हणाला, “पुन्हा असेच करा.” आणि त्यांनी पुन्हा केले.
त्याने आदेश दिला, “तिसर्यांदा असेच करा,” आणि त्यांनी तिसर्यांदाही होमार्पणावर पाणी टाकले. पाणी वेदीवरून खाली वाहू लागले आणि खळगी सुद्धा पाण्याने भरली.
यज्ञाच्या वेळी, एलीयाह संदेष्टा पुढे आला आणि त्याने प्रार्थना केली: “हे याहवेह, अब्राहाम, इसहाक आणि इस्राएलच्या परमेश्वरा, आज हे जाहीर होवो की इस्राएलमध्ये केवळ तुम्हीच परमेश्वर आहात आणि मी तुमचा सेवक असून या सर्व गोष्टी मी आपल्या आज्ञेनुसार केल्या आहेत. मला उत्तर द्या, हे याहवेह, मला उत्तर द्या, म्हणजे या लोकांना समजेल, याहवेह, तुम्हीच परमेश्वर आहे आणि आपणच त्यांची मने परत वळवित आहात.”
तेव्हा याहवेहचा अग्नी आला आणि होमार्पण, लाकडे, धोंडे आणि माती भस्म करून टाकली आणि खळग्यातील पाणी चाटून टाकले.
जेव्हा सर्व लोकांनी हे पाहिले, तेव्हा ते पालथे पडून रडू लागले, “याहवेह हेच परमेश्वर आहे! याहवेह हेच परमेश्वर आहे!”
मग एलीयाहने त्यांना आज्ञा दिली, “बआलच्या संदेष्ट्यांना पकडा, कोणालाही जाऊ देऊ नका!” तेव्हा त्यांनी पकडले आणि एलीयाहने त्यांना खाली किशोन ओहळाकडे नेऊन त्यांचा वध केला.
आणि एलीयाहने अहाबास म्हटले, “जा, खा व पी, कारण मला मुसळधार पावसाचा आवाज येत आहे.” म्हणून अहाब खाण्यापिण्यास गेला, परंतु एलीयाह कर्मेल डोंगराच्या माथ्यावर गेला आणि त्याने जमिनीपर्यंत लवून आपले तोंड आपल्या गुडघ्यांमध्ये घातले.
तो आपल्या सेवकास म्हणाला, “जा आणि समुद्राकडे दृष्टी लाव.” तेव्हा तो गेला आणि त्याने पाहिले.
तो म्हणाला, “काही दिसत नाही.”
सात वेळा एलीयाह म्हणाला, “परत जा.”
सातव्या वेळेस सेवकाने सांगितले, “मनुष्याच्या हाताएवढा लहानसा ढग समुद्रातून वर येत आहे.”
एलीयाह म्हणाला, “जा आणि अहाबाला सांग, ‘पावसाने तुला थांबविण्याआधी, रथ जुंपून खाली जा.’ ”
थोड्याच वेळात, आकाश काळ्या ढगांनी भरले, वारा वाहू लागला आणि मुसळधार पाऊस सुरू झाला आणि अहाब रथात बसून येज्रील येथे निघाला. याहवेहचे सामर्थ्य एलीयाहवर आले आणि तो आपली कंबर बांधून अहाबापुढे येज्रीलपर्यंत धावत गेला.