1 राजे 1
1
अदोनियाह स्वतःला राजा करतो
1जेव्हा दावीद राजा फार वृद्ध झाला, तेव्हा त्याच्यावर कितीही पांघरुणे घातली तरी त्याला ऊब येत नसे. 2म्हणून त्याचे सेवक त्याला म्हणाले, “राजाची सेवा करण्यासाठी आणि त्यांची काळजी घेण्यासाठी आपण एक तरुण कुमारी शोधू या. तिने त्यांच्याजवळ झोपावे म्हणजे आमच्या स्वामींना ऊब येईल.”
3नंतर त्यांनी सर्व इस्राएल देशात एका सुंदर तरुण कुमारीचा शोध केला आणि त्यांना शूनेमकरीण अबीशग आढळली, त्यांनी तिला राजाकडे आणले. 4ती स्त्री खूप सुंदर होती; तिने राजाची काळजी घेतली आणि त्यांची सेवा केली, पण राजाने तिच्याशी लैंगिक संबंध ठेवले नाहीत.
5त्यावेळी अदोनियाह, ज्याच्या आईचे नाव हग्गीथ होते, त्याने स्वतःला पुढे करीत म्हटले, “मी राजा होणार.” म्हणून त्याने रथ आणि घोडे#1:5 किंवा रथस्वार तयार केले आणि त्याच्यापुढे धावण्यासाठी पन्नास माणसे घेतली. 6(“तू जे काही करतोस ते का करतोस?” असे त्याच्या वडिलांनी त्याला कधीही खडसावून विचारले नाही. तो सुद्धा फार रूपवान होता आणि अबशालोमच्या नंतर तो जन्मला होता.)
7जेरुइयाहचा पुत्र योआब आणि अबीयाथार याजक यांच्याशी अदोनियाहने चर्चा केली आणि त्यांनी त्याला पाठिंबा दिला. 8परंतु सादोक याजक, यहोयादाचा पुत्र बेनाइयाह, नाथान संदेष्टा, शिमी आणि रेई आणि दावीदाचा खास रक्षक हे अदोनियाहला मिळाले नाही.
9अदोनियाहने एन-रोगेलजवळ जोहेलेथच्या दगडावर मेंढरे, गुरे आणि पुष्ट वासरे यांचा यज्ञ केला. त्याने आपले सर्व भाऊ, राजपुत्र आणि यहूदीयाच्या सर्व राजकीय अधिकार्यांना आमंत्रित केले, 10परंतु त्याने नाथान संदेष्टा, बेनाइयाह, खास रक्षक व त्याचा भाऊ शलोमोन यांना आमंत्रित केले नाही.
11तेव्हा शलोमोनची आई बथशेबा हिला नाथानाने विचारले, “हग्गीथेचा पुत्र अदोनियाह हा आता राजा झाला आहे, हे तू ऐकले नाही काय? आणि दावीद आमचे धनी यांना याविषयी काहीच माहिती नाही? 12तर आता, तू आपला स्वतःचा आणि तुझा पुत्र शलोमोन याचा जीव कसा वाचवावा असा बोध मी तुला देतो. 13दावीद राजाकडे जा आणि त्यांना सांग, ‘माझ्या स्वामी, आपण आपल्या दासीशी शपथ घेतली नव्हती काय, “खचितच माझ्यानंतर तुझा पुत्र शलोमोन राजा होईल आणि तो माझ्या राजासनावर बसेल” तर मग अदोनियाह कसा राजा झाला?’ 14तू राजाबरोबर अजूनही बोलत असतानाच मी आत येईन आणि तू जे सांगितले त्यामध्ये माझे शब्द घालेन.”
15तेव्हा बथशेबा वृद्ध राजाला भेटण्यास त्यांच्या खोलीत गेली, तिथे शूनेमकरीण अबीशग त्यांची सेवा करीत होती. 16बथशेबाने राजासमोर लवून दंडवत घातले.
राजाने विचारले, “तुला काय पाहिजे?”
17ती त्यांना म्हणाली, “माझे स्वामी, मी तुमची दासी, मला तुम्ही तुमच्या याहवेह परमेश्वराची शपथ दिली होती की: ‘माझ्यानंतर तुझा पुत्र शलोमोन हाच राजा होईल, आणि तो माझ्या राजासनावर बसेल.’ 18परंतु आता अदोनियाह राजा झाला आहे, आणि माझ्या स्वामींना यातील काहीही माहीत नाही. 19त्याने मोठ्या संख्येने पशू, पुष्ट वासरे आणि मेंढरे यांचा यज्ञ केला आणि त्याने राजाच्या सर्व पुत्रांना, अबीयाथार याजक आणि सैन्याचा सेनापती योआब यांना आमंत्रित केले, पण आपला सेवक शलोमोन याला त्याने बोलाविले नाही. 20माझे स्वामी, सर्व इस्राएली लोकांचे डोळे आपणाकडे लागले आहेत, की आपण हे घोषित कराल की माझ्या स्वामीनंतर तुमच्या सिंहासनावर कोण बसणार. 21नाहीतर, माझे स्वामी त्यांच्या पूर्वजांबरोबर विसावा पावतील आणि मला आणि माझा पुत्र शलोमोनला दोषी असल्याची वागणूक दिली जाईल.”
22ती राजाबरोबर बोलत असतानाच, नाथान संदेष्टा आला. 23आणि राजाला सांगण्यात आले, “नाथान संदेष्टा आले आहेत.” म्हणून तो राजासमोर गेला आणि जमिनीपर्यंत लवून दंडवत केले.
24नाथान संदेष्टा म्हणाला, “माझ्या स्वामी, अदोनियाह तुमच्यानंतर राजा होणार आणि तो तुमच्या राजासनावर बसणार अशी घोषणा तुम्ही केली आहे काय? 25आज त्याने खाली जाऊन पुष्कळ संख्येने गुरे, पुष्ट वासरे आणि मेंढरांचा यज्ञ केला आहे. त्याने सर्व राजपुत्र, सैन्यांचे सेनापती आणि अबीयाथार याजक यांना आमंत्रित केले आहे. सध्या यावेळी ते त्याच्यासोबत खात व पीत आहेत आणि म्हणत आहेत, ‘राजा अदोनियाह चिरायू होवो!’ 26परंतु मी आपला सेवक आणि सादोक याजक, आणि यहोयादाचा पुत्र बेनाइयाह, आणि आपला पुत्र शलोमोन यांना त्याने आमंत्रित केले नाही. 27हे सर्व माझ्या स्वामीने त्यांच्यानंतर राजासनावर कोणी बसावे हे आपल्या सेवकाला न कळवताच केले आहे काय?”
दावीद शलोमोनला राजा करतो
28मग दावीद राजा म्हणाला, “बथशेबाला आत बोलवा,” तेव्हा ती राजाच्या उपस्थितीत येऊन उभी राहिली.
29तेव्हा राजाने शपथ वाहून म्हटले, “ज्यांनी मला प्रत्येक संकटातून सोडविले, त्या जिवंत याहवेहची शपथ, 30याहवेह इस्राएलच्या परमेश्वराच्या नावाने जे मी तुला शपथ घेऊन म्हटले होते की: तुझा पुत्र शलोमोन माझ्यानंतर राजा होईल आणि तोच माझ्या जागेवर माझ्या राजासनावर बसेल, ते मी आज खचितच पूर्ण करेन.”
31तेव्हा बथशेबाने भूमीकडे आपले मुख लवून राजासमोर दंडवत घातले आणि म्हटले, “दावीद, माझे स्वामी सदा चिरायू होवोत!”
32दावीद राजाने म्हटले, “सादोक याजक, नाथान संदेष्टा आणि यहोयादाचा पुत्र बेनाइयाह यांना आत बोलवा.” जेव्हा ते राजापुढे आले, 33राजाने त्यांना म्हटले: “आपल्या धन्याचे सेवक तुमच्यासोबत घ्या आणि माझा पुत्र शलोमोन याला माझ्या खेचरावर बसवून त्याला गीहोन येथे घेऊन जा. 34तिथे सादोक याजक आणि नाथान संदेष्टा यांनी त्याचा इस्राएलचा राजा म्हणून अभिषेक करावा. कर्णे वाजवून घोषणा करावी, ‘शलोमोन राजा चिरायू होवोत!’ 35नंतर तुम्ही त्याच्यासोबत वर जावे आणि त्याने येऊन माझ्या राजासनावर बसून माझ्या जागेवर राज्य करावे. मी त्याला इस्राएलचा आणि यहूदीयाचा राज्यकर्ता नेमले आहे.”
36यहोयादाचा पुत्र बेनाइयाह याने राजाला उत्तर दिले, “आमेन! याहवेह, माझ्या स्वामींचे परमेश्वर असेच घोषित करोत. 37याहवेह जसे दावीद, माझ्या स्वामींसोबत होते, तसेच याहवेह शलोमोनसोबतही असो, म्हणजे त्याचे राजासन माझ्या स्वामींच्या राजासनापेक्षा अधिक महान करो.”
38तेव्हा सादोक याजक, नाथान संदेष्टा, यहोयादाचा पुत्र बेनाइयाह, करेथी व पलेथी हे खाली गेले आणि शलोमोनला दावीद राजाच्या खेचरावर बसविले आणि त्याला गीहोन येथे नेले. 39सादोक याजकाने पवित्र मंडपातून तेलाचे शिंग घेतले आणि शलोमोनचा अभिषेक केला. नंतर त्यांनी कर्णे वाजविले आणि “शलोमोन राजा चिरायू असो! असा सर्व लोकांनी जयघोष केला.” 40आणि सर्व लोक पावा वाजवित आणि मोठा आनंदोत्सव करीत त्याच्यामागे गेले, त्यांच्या घोषणांनी जमीन हादरली.
41अदोनियाह आणि त्याच्याबरोबर असलेल्या सर्व पाहुण्यांनी मेजवानी संपत असता हा आवाज ऐकला. कर्ण्यांचा आवाज ऐकताच योआबाने विचारले, “शहरात हा सर्व आवाज का येत आहे?”
42तो हे बोलत असताच, अबीयाथार याजकाचा पुत्र योनाथान आला. अदोनियाह त्याला म्हणाला, “आत ये. तुझ्यासारख्या योग्य मनुष्याने चांगलीच बातमी आणली असणार.”
43योनाथानने अदोनियाहास उत्तर दिले, “अजिबात नाही! दावीद आमच्या स्वामींनी शलोमोनास राजा केले आहे. 44राजाने त्याच्यासोबत सादोक याजक, नाथान संदेष्टा, यहोयादाचा पुत्र बेनाइयाह, करेथी आणि पलेथी यांना पाठविले आहे आणि त्यांनी त्याला राजाच्या खेचरावर बसविले आहे, 45आणि सादोक याजक आणि नाथान संदेष्टा यांनी त्याचा राजा म्हणून गीहोन येथे अभिषेक केला आहे. तिथून ते मोठ्या आनंदाने वर गेले आणि शहरात त्या आवाजाचा नाद होत आहे. तोच आवाज आपण ऐकत आहात. 46शिवाय, शलोमोनने राजासनावरील आपले स्थान घेतले आहे. 47तसेच, राजकीय अधिकारी येऊन दावीद आपल्या स्वामींना असे म्हणत आशीर्वाद देत आहेत, ‘आपला परमेश्वर तुमच्या नावांपेक्षा शलोमोनचे नाव अधिक प्रसिद्ध करो आणि त्याचे राजासन तुमच्या राजासनापेक्षा मोठे करो!’ आणि राजाने आपल्या पलंगावरून नमन केले 48आणि म्हटले, ‘याहवेह, इस्राएलचे परमेश्वर ज्यांनी मला आज माझ्या राजासनावरचा माझा वारस मला पाहू दिला, त्यांचे नाव धन्यवादित असो.’ ”
49त्यावेळी, अदोनियाहचे सर्व पाहुणे घाबरून उठले आणि पांगून गेले. 50परंतु अदोनियाहने शलोमोनच्या भीतीने जाऊन वेदीवरील शिंगे धरून ठेवली. 51तेव्हा शलोमोनला सांगण्यात आले, “अदोनियाह शलोमोन राजाला घाबरत आहे आणि वेदीच्या शिंगांना धरून ठेवले आहे. तो म्हणतो की, ‘शलोमोन राजाने आज माझ्याशी शपथ घ्यावी की तो त्याच्या सेवकाला तलवारीने मारणार नाही.’ ”
52शलोमोनने उत्तर दिले, “जर तो स्वतःस योग्य असा सिद्ध करेल, तर त्याच्या डोक्यावरील एक केससुद्धा जमिनीवर पडणार नाही; पण त्याच्या ठायी दुष्टाई आढळली, तर तो मरण पावेल.” 53तेव्हा शलोमोन राजाने माणसे पाठवून त्याला वेदीवरून खाली आणले. आणि अदोनियाहने राजाकडे येऊन शलोमोन राजासमोर नमला आणि शलोमोन त्याला म्हणाला, “आपल्या घरी जा.”
सध्या निवडलेले:
1 राजे 1: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
![None](/_next/image?url=https%3A%2F%2Fimageproxy.youversionapi.com%2F58%2Fhttps%3A%2F%2Fweb-assets.youversion.com%2Fapp-icons%2Fmr.png&w=128&q=75)
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.