YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 योहान 2:15-29

1 योहान 2:15-29 MRCV

जगावर किंवा जगातील गोष्टींवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करतात तर त्यांच्यामध्ये पित्यासाठी प्रीती वसत नाही. कारण जगात जे सर्व आहे ते म्हणजे, देहाची वासना, डोळ्याची वासना व जीवनाचा गर्व या सर्वगोष्टी पित्यापासून नाहीत तर जगापासून आहेत. जग आणि त्याच्या सर्व वासना नाहीशा होतील, परंतु जी व्यक्ती परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे करते, ती सदासर्वकाळ जगते. प्रिय मुलांनो, ही शेवटची घटका आहे; आणि तुम्ही ऐकल्याप्रमाणे ख्रिस्तविरोधक येत आहे आणि आतासुद्धा अनेक ख्रिस्तविरोधक आलेले आहेत. यावरूनच आपणास समजते की ही शेवटची घटका आहे. ते आपल्यामधूनच बाहेर पडले आहेत, परंतु ते खरोखर आपले नव्हतेच. कारण ते जर आपल्यातील असते तर ते आपल्याबरोबर राहिले असते; परंतु ते गेल्याने हे सिद्ध झाले की त्यांच्यापैकी कोणीही आपल्यातील नव्हता. परंतु जे पवित्र ख्रिस्त येशू आहेत, त्यांच्याकडून तुमचा अभिषेक झाला आहे आणि तुम्हा सर्वांना सत्य माहीत आहे. तुम्हाला सत्य माहीत नाही म्हणून मी तुम्हास लिहितो असे नाही, परंतु ते तुम्हाला माहीत आहे आणि सत्याचा उगम असत्यापासून होत नाही. लबाड कोण आहे? जो कोणी येशू हे ख्रिस्त आहे हे नाकारतो तो. असा मनुष्य ख्रिस्तविरोधक आहे, पिता आणि पुत्र यांना तो नाकारतो. जो पुत्राला स्वीकारीत नाही त्याच्याजवळ पिता नाही; जो कोणी पुत्राला स्वीकारतो त्याच्याजवळ पितासुद्धा आहे. तुम्ही तर हे लक्षात ठेवा की, तुम्ही जे काही सुरुवातीपासून ऐकले आहे ते तुम्हामध्ये राहते. ते जर तुम्हामध्ये राहते, तर तुम्ही सुद्धा पुत्र आणि पित्यामध्ये स्थिर राहाल. त्यांनी आपल्याला सार्वकालिक जीवन देण्याचे अभिवचन दिले आहे. तुम्हाला भ्रमात पाडून बहकविण्याचा जे प्रयत्न करीत आहेत त्यांच्याबद्दल मी तुम्हास लिहित आहे. प्रभूपासून जो अभिषेक तुम्हाला मिळाला आहे तो तुम्हावर राहतो; आणि तुम्हाला कोणी शिकविण्याची गरज नाही. त्यांचा अभिषेक तुम्हाला सर्व गोष्टींविषयी शिकवेल. त्यांचा अभिषेक खोटा नाही तर सत्य आहे, जसे त्यांनी तुम्हाला शिकविले आहे तसे त्यांच्यामध्ये राहा. आता प्रिय मुलांनो, सतत त्यांच्यामध्ये राहा, म्हणजे ते प्रकट होतील त्यावेळी आपण आत्मविश्वासपूर्वक असावे आणि त्यांच्या येण्याच्या दिवशी त्यांच्यासमोर आपणास लज्जित व्हावे लागणार नाही. जर तुम्हाला माहीत आहे की ते नीतिमान आहेत, तर तुम्हाला हे माहीत आहे की, प्रत्येकजण जे काही चांगले करतात तो त्यांच्यापासून जन्मला आहे.