1 करिंथकरांस 16
16
परमेश्वराच्या लोकांसाठी वर्गणी
1आता प्रभुच्या लोकांना आर्थिक मदत करण्याबद्दल: गलातीया येथील मंडळ्यांना मी जे करावयास सांगितले ते तुम्हीही करा. 2प्रत्येक आठवड्याच्या पहिल्या दिवशी, तुम्हातील प्रत्येकाने मिळालेल्या उत्पनातून काही रक्कम बाजूला काढून, साठवून ठेवावी, म्हणजे मी तेथे आल्यानंतर वर्गण्या गोळा कराव्या लागणार नाहीत. 3मग, मी तिकडे आल्यावर, तुम्ही स्वतः निवडलेले लोक व ओळख करून देणारी माझी पत्रे आणि तुमची प्रेमाची देणगी घेऊन मी त्यांना यरुशलेमला पाठवीन. 4मीही जाणे उचित होईल असे वाटले, तर आम्ही सोबतीने प्रवास करू.
वैयक्तिक विनंती
5मासेदोनियामधून गेल्यानंतर, मी तुम्हाकडे येईन कारण मीही मासेदोनियामधून जाण्याचा विचार करत आहे. 6तेव्हा मी तुमच्याबरोबर बहुतेककरून अधिक काळ, कदाचित हिवाळादेखील घालवेन. मग मी जेथे कोठे जाईन, तेथे माझी रवानगी करण्यात मला तुम्ही मदत करू शकता. 7यावेळी तुम्हाला धावती भेट द्यावी आणि पुढे जावे अशी माझी इच्छा नाही; तर प्रभुची इच्छा असेल तर तुमच्याकडे येऊन काही काळ तुमच्याबरोबर राहावे अशी माझी इच्छा आहे. 8पण पन्नासाव्या दिवसाच्या सणापर्यंत मी येथेच म्हणजे इफिसमध्ये राहणार आहे. 9कारण माझ्यासाठी चांगले व प्रभावी सेवेचे द्वार उघडले गेले आहे. परंतु तेथे मला विरोध करणारे देखील पुष्कळच आहेत.
10तीमथ्य तुमच्याकडे आला, तर तुमच्याबरोबर असताना त्याला भिण्याची गरज नाही असे त्याला कळू द्या, माझ्यासारखाच तोही प्रभुचे सेवाकार्य करीत आहे. 11कोणीही त्याला कमी लेखू नये, शांती प्राप्त झालेला असा त्याला माझ्याकडे परत पाठवा. जे आणखी बंधू इकडे येणार आहेत, त्यांच्याबरोबरच त्यालाही भेटण्यास मी उत्सुक आहे.
12आता बंधू अपुल्लोसासंबंधी: त्याने बंधुजनांबरोबर तुमच्याकडे येण्याची मी त्याला खूप विनंती केली. परंतु आताच तुम्हाकडे यावे अशी त्याची मुळीच इच्छा नव्हती, परंतु संधी मिळेल तेव्हा तो येईल.
13जागृत राहा; विश्वासात स्थिर राहा; धैर्याने वागा व खंबीर असा. 14तुम्ही जे काही करता ते प्रीतिने करा.
15तुम्हाला माहीत आहे की स्तेफन आणि त्याचे कुटुंब हे अखया प्रातांमधील पहिले विश्वासू आहेत आणि प्रभुच्या लोकांसाठी सेवाकार्य करण्यासाठी त्यांनी स्वतःला समर्पित केले आहे. बंधू व भगिनींनो मी तुम्हालाही विनंती करतो, 16की जे कोणी साहाय्य आणि श्रम करतात अशा लोकांच्या स्वाधीन राहा. 17स्तेफन, फर्तूनात व अखायिक यांच्या येण्याने मला फार आनंद झाला. त्यांच्यामुळे तुमच्यावतीने जे काही कमी होते त्यांची त्यांनी भरपाई केली. 18त्यांनी मला व तुमच्या आत्म्याला खूपच उल्लासीत केले आहे. अशा लोकांना मान्यतेची आवश्यकता आहे.
शेवटच्या शुभेच्छा
19आशिया प्रांतातील मंडळ्या तुम्हाला शुभेच्छा पाठवितात.
अक्विला व प्रिस्किल्ला, व त्यांच्या घरात जमणारी मंडळी तुम्हाला प्रभुमध्ये शुभेच्छा सांगतात.
20तसेच सर्व बंधू व भगिनी तुम्हाला शुभेच्छा देतात.
एकमेकांचे पवित्र चुंबनाने अभिवादन करा.
21आता या पत्रातील शुभेच्छा मी पौल, स्वतःच्या हातांनी लिहित आहे.
22जो कोणी प्रभुवर प्रीती करीत नाही, तो शापित असो. हे प्रभू या!#16:22 ग्रीक प्रभू या अरेमिक वाक्यप्रचार (मारानाथा) प्रारंभीचे ख्रिस्ती लोक वापरत असत
23प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हावर असो.
24तुम्हा सर्वांना ख्रिस्त येशूंमध्ये माझी प्रीती असो. आमेन.#16:24 काही प्रतीमध्ये आढळत नाही आमेन
सध्या निवडलेले:
1 करिंथकरांस 16: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
मराठी समकालीन आवृत्ती™, नवीन करार
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे. सर्व अधिकार जगभरात राखीव.
Marathi Contemporary Version™, New Testament
Copyright © 1978, 1982, 2008, 2022 by Biblica, Inc.
Used with permission. All rights reserved worldwide.