YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 इतिहास 19

19
दावीद अम्मोन्यांचा पराभव करतो
1कालांतराने, अम्मोन्यांचा राजा नाहाश मरण पावल्यानंतर त्याचा पुत्र राजा झाला. 2दावीदाने विचार केला, “हानूनचा पिता नाहाशने माझ्यावर दया दाखविली होती, तशी दया मी हानूनवर दाखवेन.” म्हणून दावीदाने हानूनच्या पित्याविषयी आपली सहानुभूती व्यक्त करण्यासाठी राजदूत पाठवले.
जेव्हा दावीदाचे राजदूत अम्मोनी लोकांच्या प्रदेशात आले, 3तेव्हा अम्मोनी अधिकार्‍यांनी हानूनला विचारले, “दावीदाने सहानुभूती व्यक्त करण्यासाठी तुमच्याकडे राजदूत पाठवून तुमच्या पित्याचा आदर केला आहे असे आपणास वाटते काय? दावीदाने त्यांना आपणाकडे केवळ देशाची पहाणी करण्यास, ते हेरण्यास व ते उद्ध्वस्त करण्यास पाठवले नाही काय?” 4तेव्हा हानूनने दावीदाच्या राजदूतांना ताब्यात घेऊन, प्रत्येकाचे मुंडण केले व त्यांची वस्त्रे मधोमध नितंबापर्यंत फाडून त्यांना परत पाठवून दिले.
5जेव्हा कोणी येऊन दावीदाला त्या माणसांबद्दल सांगितले, तेव्हा दावीदाने त्यांची भेट घेण्यासाठी माणसे पाठवली, कारण त्यांचा मोठा अपमान झाला होता. राजाने म्हटले, “तुमची दाढी वाढेपर्यंत यरीहोतच राहा, मग परत या.”
6जेव्हा अम्मोनी लोकांना समजून आले की, दावीदाला आपण घृणास्पद झालो आहोत, तेव्हा हानून व अम्मोन्यांनी अराम-नहराईम,#19:6 म्हणजेच मेसोपोटेमियाचा उत्तरपश्चिम भाग अराम-माकाह व सोबाह येथून एक हजार तालांत#19:6 अंदाजे 34 मेट्रिक टन चांदी देऊन सैन्य, रथ व घोडदळ ही भाड्याने आणली. 7त्याने भाड्याने बत्तीस हजार रथ व सारथी आणले. तसेच माकाहचा राजा व त्याचे संपूर्ण सैन्य बोलाविले. त्या सैन्याने मेदबा येथे तळ दिला. अम्मोन्यांनी आपल्या नगरातून भरती केलेल्या सैन्यासह तिथे येऊन युद्धासाठी मोर्चा बांधला.
8हे ऐकून, दावीदाने संपूर्ण लढाऊ सैन्यासह योआबाला पाठवले. 9तेव्हा अम्मोन्यांचे सैन्य बाहेर आले आणि युद्धाच्या तयारीने त्यांच्या नगराच्या दरवाजाजवळ येऊन थांबले, युद्ध करण्यासाठी आलेले राजे एकीकडे मोकळ्या प्रदेशात एकटेच होते.
10शत्रूचे सैन्य आपल्यापुढे व मागे आहे हे योआबाला समजले; तेव्हा त्याने इस्राएली सैन्यातून उत्तम योद्धे निवडले व त्यांना अरामी सैन्याशी लढण्यास पाठविले. 11बाकीचे सैन्य त्याने आपला भाऊ अबीशाई याच्या हाती दिले आणि त्यांना अम्मोनी लोकांविरुद्ध लढण्यास पाठविले गेले. 12योआब म्हणाला, “जर अरामी सैन्य माझ्यावर भारी झाले तर तुम्ही माझी सुटका करावी; परंतु जर अम्मोनी सैन्य तुझ्यावर भारी झाले तर मी तुला सोडविण्यास येईन. 13खंबीर व्हा, आपल्या लोकांसाठी आणि आपल्या परमेश्वराच्या शहरांसाठी आपण धैर्याने लढू. याहवेहच्या दृष्टीने जे बरे ते याहवेह करतील.”
14तेव्हा योआब आणि त्याच्या बरोबरचे सैन्य अराम्यांशी लढण्यास पुढे गेले आणि ते अरामी त्याच्यापुढून पळून गेले. 15जेव्हा अम्मोनी सैन्याला समजले की, अरामी सैन्याने पळ काढला आहे, तेव्हा त्यांनी सुद्धा त्याचा भाऊ अबीशाई याच्यापुढून पळ काढून ते शहरात गेले. तेव्हा योआब यरुशलेमास परत गेला.
16नंतर अरामी लोकांनी पाहिले इस्राएलकडून त्यांचा पराभव झाला आहे, तेव्हा त्यांनी दूत पाठवून फरात नदीच्या पूर्वेकडून अधिक अरामी सैन्य बोलाविले. हादादेजर राजाचा सेनापती शोफख या सेनेचे नेतृत्व करीत होता.
17याविषयी जेव्हा दावीदाला सांगण्यात आले, तेव्हा त्याने सर्व इस्राएली सैन्य एकत्र केले आणि यार्देन नदी पार करून शत्रुसैन्याशी युद्ध सुरू केले. दावीदाने पुन्हा युद्धसीमेची खूण तयार केली व अराम्यांविरुद्ध युद्ध केले. 18परंतु अरामी सैन्यांनी इस्राएल समोरून पळ काढला आणि दावीदाने त्यांच्यातील सात हजार रथस्वारांना व चाळीस हजार पायदळांना ठार मारले. त्याने त्यांचा सेनापती शोफख यालाही ठार केले.
19जेव्हा हादादेजरच्या जहागीरदारांनी पाहिले की इस्राएलपुढे त्यांचा पराभव झाला, त्यांनी दावीदाशी समेट केला व ते त्याच्या अधीन झाले.
यानंतर अरामी लोक पुन्हा कधीही अम्मोन्यांना त्याच्या युद्धामध्ये मदत करण्यास तयार झाले नाही.

सध्या निवडलेले:

1 इतिहास 19: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन