YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांना 9:16-33

रोमकरांना 9:16-33 MACLBSI

ह्यावरून इच्छा बाळगणाऱ्या किंवा कृती करणाऱ्यावर काही अवलंबून नाही; तर दया करणाऱ्या देवावर सर्वकाही अवलंबून आहे. धर्मशास्त्रलेख इजिप्तच्या राजाला असे सांगतो, ‘मी तुला राजा केले आहे ते ह्यासाठी की, तुझ्याद्वारे मी आपला पराक्रम दाखवावा आणि माझे नाव सर्व पृथ्वीवर प्रख्यात व्हावे.’ ह्यावरून त्याच्या इच्छेस येईल, त्याच्यावर तो दया करतो आणि त्याच्या इच्छेस येईल, त्याला तो कठीण हृदयाचे करतो. ह्यावर तू मला म्हणशील, “तर मग तो कुणालाही दोष कसा लावू शकतो? कारण त्याच्या संकल्पाच्या आड कोण येऊ शकतो?” हे मानवा, देवाला उलट बोलणारा तू कोण? घडलेली वस्तू आपल्या घडविणाऱ्याला, “तू मला असे का केलेस?”, असे म्हणेल काय? किंवा एकाच गोळ्याचे एक पात्र उत्तम कामासाठी व एक हलक्या कामासाठी करावे, असा कुंभाराचा अधिकार मातीच्या गोळ्यावर नाही काय? आपला क्रोध दर्शवावा व आपले सामर्थ्य व्यक्त करावे असे देवाच्या मनात असताना नाशासाठी सिद्ध झालेल्या क्रोधाच्या पात्रांना मोठ्या सहनशीलतेने त्याने जर वागवून घेतले आणि ज्या आपल्याला केवळ यहुदी लोकांतून नव्हे तर यहुदीतरांतूनही पाचारण झाले, त्या आपल्याविषयी म्हणजे त्याने पूर्वी गौरवासाठी सिद्ध केलेल्या दयेच्या पात्रांविषयी आपल्या गौरवाची विपुलता व्यक्त करावी, असे त्याला वाटत असले, तर काय? होशेयच्या पुस्तकात परमेश्वर हेही म्हणतो: जे माझे लोक नव्हते, त्यांना मी माझे लोक म्हणेन आणि जे राष्ट्र प्रिय नाही त्याला प्रिय म्हणेन आणि असे होईल की, तुम्ही माझे लोक नाही, असे जेथे म्हटले होते, तेथे त्यांना जिवंत देवाचे पुत्र असे म्हणण्यात येईल. यशयासुद्धा इस्राएलविषयी असे म्हणतो: जरी इस्राएली लोकांची संख्या समुद्राच्या वाळूसारखी असली, तरी थोड्याच लोकांचा बचाव केला जाईल; कारण प्रभू पृथ्वीविषयीचा त्याचा न्याय त्वरित आणि निर्णायकरीत्या पूर्ण करील. हे यशयाने पूर्वीच म्हटल्याप्रमाणे आहे: जर सेनाधीश प्रभूने आमच्यांसाठी बीज राहू दिले नसते, तर आम्ही सदोम नगरासारखे झालो असतो व आमची अवस्था गमोर नगराप्रमाणे झाली असती. तर मग आपण असे म्हणावे की, जे यहुदीतर नीतिमत्त्वाच्या मागे लागले नव्हते, त्यांना विश्वासाद्वारे मिळणारे नीतिमत्त्व प्राप्त झाले. परंतु इस्राएली लोक नीतिमत्त्वाच्या नियमशास्त्रामागे लागले होते तरी ते त्या नियमशास्त्रापर्यंत जाऊन पोहोचले नाहीत. का? कारण विश्वासाने नव्हे तर कृत्यांनी कार्य होईल, असे समजून ते त्याच्या मागे लागले. अशा प्रकारे अडथळ्याच्या धोंड्यावर ते ठेचाळले. त्याप्रमाणे धर्मशास्त्रात लिहिले आहे: पाहा, सीयोनमध्ये मी अडथळ्याचा धोंडा, अडखळण्याचा खडक ठेवतो, लोक त्यावर पडतील. परंतु त्याच्यावर जो विश्वास ठेवील, तो फजित होणार नाही.