YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांना 8:18-28

रोमकरांना 8:18-28 MACLBSI

आपल्यासाठी जे वैभव प्रकट होणार आहे त्याच्यापुढे वर्तमानकाळाची दुःखे काहीच नाहीत, असे मी मानतो. सृष्टी देवाच्या पुत्राच्या प्रकट होण्याची प्रतीक्षा अत्यंत उत्कंठेने करत आहे. सृष्टी व्यर्थतेच्या स्वाधीन करण्यात आली, ती आपखुशीने नव्हे, तर ती स्वाधीन करणाऱ्यामुळे. सृष्टी स्वतः नश्वरतेच्या दास्यातून मुक्त होऊन तिला देवाच्या मुलांची गौरवशाली मुक्तता मिळावी ह्या आशेने वाट पाहते. आपल्याला ठाऊक आहे की, सबंध सृष्टी आजपर्यंत कण्हत आहे व वेदना भोगत आहे. इतकेच केवळ नव्हे, तर ज्या आपणाला आत्मा हे प्रथम फळ मिळाले आहे, ते आपणही स्वतः दत्तक होण्याची म्हणजे आपल्या शरीराच्या मुक्तीची वाट पाहत असता, आपल्यामध्ये कण्हत आहोत. आशेने आपले तारण झाले आहे. जी आशा दृश्य झाली आहे ती आशाच नव्हे. जे दृश्य झाले आहे त्याची आशा कोण धरील? पण जे अदृश्य आहे, त्याची जर आपण आशा धरली, तर धीराने आपण त्याची प्रतीक्षा करत असतो. तसेच आत्माही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो; कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे, हे आपल्याला ठाऊक नसते. पण आत्मा स्वतः अनिर्वाच्य कण्हण्याने मध्यस्थी करतो. अंतर्याम पारखणाऱ्या देवाला त्या आत्म्याचा हेतू काय, हे ठाऊक आहे. पवित्र आत्मा पवित्र जनांसाठी देवाच्या इच्छेप्रमाणे मध्यस्थी करतो. आपल्याला ठाऊक आहे की, देवावर प्रीती करणाऱ्यांना म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलाविलेल्यांना देवाच्या कृतीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात