पूर्वी मी नियमशास्त्राविरहित जगत होतो, पण आज्ञा आल्यावर पाप संजीवित झाले आणि मी मरण पावलो. ह्याप्रमाणे ज्या आज्ञेचा परिणाम जीवन व्हावयाचा तिचाच परिणाम माझ्या बाबतीत मरण झाला, असे माझ्या अनुभवास आले. कारण पापाने आज्ञेच्या योगे संधी साधून मला फसवले व तिच्या योगे मला ठार केले.
तर मग नियमशास्त्र पवित्र आहे आणि आज्ञा पवित्र, न्याय्य व चांगली आहे. म्हणजे जे चांगले आहे, त्याने मला मरण आणले काय? कदापि नाही! हे पापाने केले. पाप ते पापच दिसावे, म्हणून जे चांगले आहे, त्याच्या योगे पाप माझ्या मध्ये मरण घडवणारे असे झाले. आज्ञेच्या योगे पापाचे खरे स्वरूप प्रकट व्हावे म्हणून असे झाले.
आपणाला ठाऊक आहे की, नियमशास्त्र आध्यात्मिक स्वरूपाचे आहे. मी मात्र मर्त्य मानव असून पापाला गुलाम म्हणून विकलेला आहे, मी काय करतो, ते माझे मलाच कळत नाही, म्हणजे जे मी इच्छितो ते करतो असे नाही, तर ज्याचा मला द्वेष वाटतो ते करतो. जे मी इच्छीत नाही, ते जर मी करतो तर नियमशास्त्र चांगले आहे, हे मी मान्य करतो. तर आता ह्यापुढे ते कृत्य मी स्वतः करतो असे नव्हे, तर माझ्यामध्ये वसणारे पाप ते करते. मला ठाऊक आहे की, माझ्यामध्ये म्हणजे माझ्या देहस्वभावात काही चांगले वसत नाही. इच्छा करणे हे मला साधते, पण चांगले ते कृतीत आणणे मला साधत नाही. कारण जे चांगले करावेसे मला वाटते, ते मी करत नाही, तर करावेसे वाटत नाही, असे जे वाईट, ते मी करतो. आता जे करावेसे वाटत नाही ते जर मी करतो, तर ते कृत्य मी स्वतः करतो असे नव्हे, तर माझ्यामध्ये वसणारे पाप ते करते.
सत्कृत्य करण्याची इच्छा असतानाही मी मात्र दुष्कृत्याची निवड करतो, हा नियम मला माझ्यामध्ये आढळतो. माझा अंतरात्मा देवाच्या नियमशास्त्रामुळे हर्ष करतो. परंतु माझ्या अवयवांत मला निराळाच नियम दिसतो, तो माझ्या मनातल्या नियमाबरोबर लढतो आणि मला कैद करून माझ्या अवयवांतील पापाच्या नियमाच्या स्वाधीन करतो. किती मी कष्टी माणूस! मला ह्या मरणाधीन असलेल्या देहापासून कोण सोडवील? आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे देव हे करतो म्हणून मी देवाचे आभार मानतो. तर मग माझी अवस्था ही अशी आहे: मी स्वतः मनाने देवाच्या नियमाचे दास्य करतो, पण देहाने पापाच्या नियमाचे दास्य करतो.