YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रकटी 4

4
स्वर्गातील उपासना
1ह्यानंतर मी पाहिले तो काय आश्चर्य! स्वर्गात एक दार उघडलेले मला दिसले आणि जी वाणी मी प्रथम ऐकली होती व जी कर्ण्याच्या ध्वनीसारखी होती, ती म्हणाली, “इकडे वर ये, म्हणजे ज्या गोष्टी ह्यानंतर घडून आल्या पाहिजेत त्या मी तुला दाखवीन.” 2लगेच पवित्र आत्म्याने माझा ताबा घेतला. तो पाहा, स्वर्गात राजासन मांडलेले होते आणि त्या राजासनावर कोणी एक बसलेला होता. 3त्याचे मुख सूर्यकांत व सादा रत्नांसारखे चमकत होते. राजासनाभोवती सर्वत्र पाचूच्या रंगासारखे मेघधनुष्य होते. 4राजासनाभोवती आणखी चोवीस आसने होती आणि त्या आसनांवर शुभ्र वस्त्रे परिधान केलेले व डोक्यावर सोन्याचे मुकुट घातलेले चोवीस वडीलजन बसलेले होते. 5राजासनाकडून विजा, गडगडाट व मेघगर्जना निघत होत्या. पेटलेल्या सात मशाली राजासनापुढे जळत होत्या, त्या मशाली म्हणजे देवाचे सात आत्मे आहेत. 6तसेच राजासनापुढे स्फटिकासारखा जणू काय काचेचा समुद्र होता. राजासनाभोवती चार बाजूंस चार प्राणी होते. त्यांना पुढे व मागे अंगभर डोळे होते. 7पहिला प्राणी सिंहासारखा, दुसरा बैलासारखा, तिसरा माणसाच्या तोंडासारखा व चौथा प्राणी उडत्या गरुडासारखा होता. 8त्या चारही प्राण्यांना प्रत्येकी सहा पंख होते व ते प्राणी आतून बाहेरून सर्वांगी डोळ्यांनी भरलेले होते.
“सर्वसमर्थ प्रभू देव
पवित्र, पवित्र, पवित्र आहे.
तो होता, तो आहे व तो येणार आहे”,
असे ते रात्रंदिवस गातात; ते कधीच थांबत नाहीत.
9राजासनावर बसलेला जो युगानुयुगे जिवंत आहे, त्याला जेव्हा जेव्हा ते प्राणी गौरव, सन्मान व आभार व्यक्त करणारी गाणी गातात, 10तेव्हा तेव्हा ते चोवीस वडीलजन राजासनावर जो बसलेला आहे, त्याच्या पाया पडतात. जो युगानुयुगे जिवंत आहे, त्याची आराधना करतात, आणि आपले मुकुट राजासनापुढे ठेवून म्हणतात,
11“प्रभो, आमच्या देवा !
गौरव, सन्मान व सामर्थ्य
ह्यांचा स्वीकार करावयास तू पात्र आहेस
कारण तू सर्वांना निर्माण केले
व तुझ्या इच्छेने त्यांना अस्तित्व आणि जीवन मिळाले.”

सध्या निवडलेले:

प्रकटी 4: MACLBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन