त्या वेळी जब्दीची पत्नी तिच्या मुलांसह येशूकडे येऊन त्याला नमन करून त्याच्याकडून काही मागू लागली.
त्याने तिला म्हटले, “तुला काय पाहिजे?” ती त्याला म्हणाली, तुमच्या राज्यात ह्या माझ्या दोघा मुलांतील एकाला तुमच्या उजवीकडे व दुसऱ्याला डावीकडे स्थान मिळेल, असे जाहीर करा.”
येशू म्हणाला, “तुम्ही काय मागत आहात, हे तुम्हांला समजत नाही. जो प्याला मला प्राशन केला पाहिजे, तो तुम्ही पिऊ शकाल का? जो बाप्तिस्मा मला घेतला पाहिजे, तो तुम्ही घेऊ शकाल का?” ते त्याला म्हणाले, “आम्ही तसे करू शकू.”
त्याने त्यांना म्हटले, “माझा प्याला तुम्ही प्याल व जो बाप्तिस्मा मला घेतला पाहिजे तो तुम्ही घ्याल, हे खरे, पण माझ्या उजवीकडे व माझ्या डावीकडे बसू देणे माझ्या हाती नाही. तर त्या जागा ज्यांच्यासाठी माझ्या पित्याने सिद्ध केल्या आहेत, त्यांना मिळतील.”
हे ऐकून इतर दहा शिष्य त्या दोघा भावांवर संतापले.
परंतु येशूने त्यांना एकत्र बोलावून म्हटले, “परराष्ट्रीयांत सत्ताधारी म्हणून जे मानलेले आहेत, ते लोकांवर सत्ता चालवतात व त्यांचे वरिष्ठ लोक त्यांच्यावर अधिकार गाजवतात, हे तुम्हांला ठाऊक आहे. पण तुमचे तसे नसावे. जो तुमच्यामध्ये थोर होऊ पाहतो त्याने तुमचा सेवक व्हावे आणि जो कोणी तुमच्यामध्ये पहिला होऊ पाहतो, त्याने तुमचा दास व्हावे. जसे मनुष्याचा पुत्रही सेवा करून घ्यायला नव्हे, तर सेवा करायला व पुष्कळांसाठी आपला प्राण खंडणी म्हणून अर्पण करायला आला आहे.”
येशू आणि त्याचे शिष्य यरीहो सोडून जात असताना मोठा लोकसमुदाय त्याच्यामागून जाऊ लागला. तेव्हा येशू जवळून जात आहे, हे ऐकून रस्त्याच्या कडेला बसलेले दोन आंधळे ओरडून म्हणाले, “प्रभो, दावीदपुत्रा, आमच्यावर दया करा.”
त्यांनी गप्प राहावे म्हणून लोकांनी त्यांना धमकावले, परंतु ते अधिकच ओरडून म्हणाले, “प्रभो, दावीदपुत्रा, आमच्यावर दया करा.”
येशूने थांबून त्यांना बोलावून म्हटले, “मी तुमच्यासाठी काय करावे, अशी तुमची इच्छा आहे?”
ते त्याला म्हणाले, “प्रभो, आम्हांला दृष्टी प्राप्त व्हावी.”
येशूला कळवळा येऊन त्याने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला. त्यांना तत्काळ दिसू लागले आणि ते त्याच्या मागे गेले.