YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 15:1-11

मत्तय 15:1-11 MACLBSI

यरुशलेमहून काही परुशी व शास्त्री येशूकडे येऊन म्हणाले, “तुमचे शिष्य वाडवडिलांच्या रूढीप्रमाणे का चालत नाहीत? ते हात न धुता जेवतात.” त्याने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही स्वतःची परंपरा पाळण्याकरता देवाची आज्ञा का मोडता? देवाने असे म्हटले आहे, “तू तुझे वडील व तुझी आई ह्यांचा मान राख आणि जो कोणी वडिलांची किंवा आईची निंदा करतो, त्याला देहान्त शिक्षा व्हावी.’ परंतु तुम्ही म्हणता, जो कोणी बापाला अथवा आईला म्हणेल, “मी तुम्हांला जे काही द्यायला हवे होते, ते मी देवाला अर्पण केले आहे’, अशा माणसाने आपल्या वडिलांचा अथवा आईचा सन्मान केला नाही तरी चालेल. अशा प्रकारे, तुम्ही आपली परंपरा चालू ठेवून देवाचे वचन रद्द करता. अहो ढोंग्यांनो, तुमच्याविषयी यशयाने यथायोग्य संदेश दिला, हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात, परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. धर्मशास्त्र म्हणून ते माझी व्यर्थ उपासना करतात कारण ते मनुष्यांचे नियम शिकवतात.” नंतर येशूने लोकसमुदायाला आपल्याकडे बोलावून म्हटले, “ऐका व समजून घ्या. जे तोंडातून आत जाते ते माणसाला अशुद्ध करत नाही, तर जे तोंडातून बाहेर निघते ते माणसाला अशुद्ध करते.”