त्या वेळी येशूभोवती हजारो लोकांची इतकी गर्दी जमली होती की, तेथे चेंगराचेंगरी होऊ लागली. येशू प्रथम आपल्या शिष्यांना सांगू लागला, “परुश्यांचे खमीर म्हणजेच त्यांचा दांभिकपणा ह्याविषयी तुम्ही स्वतःला सांभाळा. जे उघड होणार नाही, असे काही झाकलेले नाही व जे कळणार नाही, असे काही गुप्त नाही. जे काही तुम्ही अंधारात बोललात ते उजेडात ऐकण्यात येईल आणि जे तुम्ही आतल्या बंद खोलीत कुजबुज करून सांगितले, ते छपरावरून घोषित केले जाईल. माझ्या मित्रांनो, मी तुम्हांला सांगतो, जे शरीराचा वध करतात पण त्यानंतर ज्यांना आणखी काही करता येत नाही, त्यांची भीती बाळगू नका. तुम्ही कोणाची भीती बाळगावी, हे मी तुम्हांला सुचवून ठेवतो:वध केल्यावर नरकात टाकायचा ज्याला अधिकार आहे, त्याची भीती बाळगा. होय, मी तुम्हांला सांगतो, त्याची भीती बाळगा. पाच चिमण्या दोन दमड्यांना विकतात की नाही? तरी त्यांच्यापैकी एकीचाही देवाला विसर पडत नाही. फार काय, तुमच्या डोक्याचे सर्व केसही मोजलेले आहेत. भिऊ नका, तुम्ही अनेक चिमण्यांपेक्षा अधिक मौल्यवान आहात! मी तुम्हांला सांगतो, जो कोणी मला मनुष्यांसमोर पत्करतो, त्याला मनुष्याचा पुत्रही देवाच्या दूतांसमोर पत्करील. परंतु जो मला मनुष्यांसमोर नाकारतो, तो देवाच्या दूतांसमोर नाकारला जाईल. जो कोणी मनुष्याच्या पुत्राविरुद्ध काही बोलेल, त्याला क्षमा मिळेल, परंतु जो पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण करतो, त्याला क्षमा मिळणार नाही. जेव्हा तुम्हांला सभास्थाने, सत्ताधीश व अधिकारी ह्यांच्यासमोर नेतील, तेव्हा कसे व काय उत्तर द्यावे किंवा काय बोलावे, ह्याविषयी काळजी करू नका. तुम्ही काय बोलावे ते पवित्र आत्मा त्याच घटकेस तुम्हांला शिकवील.”
लूक 12 वाचा
ऐका लूक 12
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: लूक 12:1-12
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ