YouVersion लोगो
सर्च आयकॉन

योहान 8:31-51

योहान 8:31-51 MACLBSI

नंतर ज्या यहुदी लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, त्यांना येशू म्हणाला, “तुम्ही माझ्या वचनात टिकून राहिलात तर खरोखर माझे शिष्य आहात. तुम्हांला सत्य समजेल व सत्य तुम्हांला बंधमुक्त करील.” त्यांनी येशूला उत्तर दिले, “आम्ही अब्राहामचे वंशज आहोत व कधीही कोणाच्या गुलामगिरीत नव्हतो, तर ‘तुम्ही बंधमुक्त व्हाल’, असे कसे म्हणता?” येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, जो कोणी पाप करतो, तो पापाचा गुलाम असतो. गुलाम घरात सदासर्वदा राहत नाही परंतु पुत्र सदासर्वदा राहतो. म्हणून जर पुत्राने तुम्हांला बंधमुक्त केले, तर तुम्ही खरेखुरे बंधमुक्त व्हाल. तुम्ही अब्राहामचे वंशज आहात, हे मला ठाऊक आहे. तरीही तुमच्यात माझ्या वचनाला स्थान नाही म्हणून तुम्ही मला ठार मारायला पाहता. माझ्या पित्याजवळ मी जे पाहिले आहे, त्याविषयी मी बोलतो, परंतु तुमच्या पित्याजवळ तुम्ही जे पाहिले आहे, त्याप्रमाणे तुम्ही करता.” त्यांनी त्याला उत्तर दिले, “आमचा पिता अब्राहाम आहे.” येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही खरोखर अब्राहामची मुले असता, तर तुम्ही अब्राहामने केली तशी कृत्ये केली असती. मी देवाकडून ऐकलेले सत्य तुम्हांला सांगितले तरीही मला तुम्ही आता ठार मारायला पाहता, अब्राहामने असे केले नाही! तुम्ही तुमच्या बापाची कृत्ये करता.” ते त्याला म्हणाले, “परमेश्वर स्वतः आमचा पिता आहे. आम्ही त्याची खरी मुले आहोत.” येशूने त्यांना म्हटले, “परमेश्वर जर तुमचा पिता असता, तर तुम्ही माझ्यावर प्रीती केली असती कारण मी देवाकडून आलो आहे. मी आपण होऊन आलो नाही, तर त्याने मला पाठवले आहे. तुम्ही माझे बोलणे का समजून घेत नाही? ह्याचे कारण हेच की, तुम्हांला माझे वचन ऐकवत नाही. तुम्ही तुमचा बाप सैतान ह्याच्यापासून जन्मला आहात आणि तुम्ही तुमच्या बापाच्या वासनांप्रमाणे करू इच्छिता. तो प्रारंभापासून मनुष्यघातक होता आणि तो सत्यापुढे टिकला नाही. त्याच्यामध्ये सत्य नाही. तो खोटे बोलतो, तेव्हा तो त्याच्या स्वभावाप्रमाणे बोलतो; कारण तो लबाड असून सर्व असत्याचा बाप आहे. पण मी तुम्हांला खरे ते सांगतो तरी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत नाही. तुमच्यापैकी कोण मला पापांबद्दल दोषी ठरवू शकतो? मी खरे सांगत असता तुम्ही माझ्यावर विश्वास का ठेवत नाही? जो देवाकडचा आहे तो देवाची वचने ऐकतो, परंतु तुम्ही देवाकडचे नाही म्हणून तुम्ही ऐकत नाही?” यहुदी लोकांनी येशूला विचारले, “तुम्ही शोमरोनी आहात व तुम्हांला भूत लागले आहे, हे जे आम्ही म्हणतो, ते बरोबर आहे की नाही?” येशूने उत्तर दिले, “मला भूत लागले नाही, तर मी माझ्या पित्याचा सन्मान करतो आणि तुम्ही मात्र माझा अपमान करता. मी स्वतःचा गौरव करू पाहत नाही. माझा गौरव करू पाहणारा व माझ्या बाजूने न्यायनिवाडा करणारा असा तो आहे. मी तुम्हांला खातरी पूर्वक सांगतो, जो माझे वचन पाळील तो कधीही मरण पाहणार नाही.”