YouVersion लोगो
सर्च आयकॉन

योहान 13:21-32

योहान 13:21-32 MACLBSI

असे बोलल्यावर येशू आत्म्यात विव्हळला व उघडपणे म्हणाला, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, तुमच्यापैकी एक जण माझा विश्वासघात करील.” तो कोणाविषयी बोलत असावा, ह्या संभ्रमात शिष्य एकमेकांकडे पाहू लागले. ज्याच्यावर येशूची प्रीती होती असा त्याच्या शिष्यांतील एक जण येशूच्या उराशी टेकलेला होता. तो कोणाविषयी बोलतो, हे विचार, असे पेत्राने त्या शिष्याला खुणावून सांगितले. तेव्हा तो येशूच्या उराशी टेकलेला होता तसाच येशूला म्हणाला, “प्रभो, तो कोण आहे?” येशूने उत्तर दिले, “मी ज्याला भाकरीचा तुकडा बुडवून देईन, तोच तो आहे.” त्याने भाकरीचा तुकडा बुडवून शिमोनचा मुलगा यहुदा इस्कर्योत ह्याला दिला. भाकरीचा तुकडा दिल्याबरोबर सैतान त्याच्यात शिरला. येशूने त्याला म्हटले, “तुला जे करायचे आहे, ते लवकर करून टाक.” मात्र त्याने त्याला असे कशासाठी सांगितले, हे भोजनास बसलेल्यांतील इतर कोणाला समजले नाही. यहुदाजवळ पैशाची थैली होती म्हणून सणासाठी जे आवश्यक आहे ते विकत घ्यावे, किंवा गरिबांना काहीतरी द्यावे, असे येशू सांगत आहे, असे काही शिष्यांना वाटले. भाकरीचा तुकडा घेतल्यावर यहुदा लगेच बाहेर गेला. ती रात्रीची वेऴ होती. यहुदा बाहेर गेल्यावर येशूने म्हटले, “आता मनुष्याच्या पुत्राचे वैभव प्रकट झाले आहे आणि त्याच्या ठायी देवाचा गौरव झाला आहे आणि जर त्याच्याद्वारे देवाचे वैभव प्रकट झाले आहे, तर देव आपल्या ठायी त्याचा गौरव करील. तो त्याचा लवकरच गौरव करील.

योहान 13:21-32 साठी चलचित्र