YouVersion लोगो
सर्च आयकॉन

इब्री 8

8
प्रभू येशूचे याजकपण श्रेष्ठ
1सांगण्याचा मुख्य मुद्दा हा आहे की, स्वर्गामध्ये राजवैभवशाली सिंहासनाच्या उजवीकडे बसलेला असा प्रमुख याजक आपल्याला मिळाला आहे. 2तो पवित्र स्थानाचा म्हणजे माणसाने नव्हे तर प्रभूने उभारलेल्या खऱ्या मंडपाचा सेवक आहे.
3प्रत्येक प्रमुख याजक दाने व यज्ञ अर्पण करण्याकरिता नेमलेला असतो, म्हणून आपल्या याजकाजवळही अर्पण करण्याकरिता काहीतरी असणे अगत्याचे आहे. 4तो पृथ्वीवर असता, तर तो याजकच नसता; कारण नियमशास्त्राप्रमाणे दाने अर्पण करणारे याजक आहेत; 5‘पर्वतावर तुला दाखविलेल्या नमुन्याप्रमाणे सर्व वस्तू बनविण्याची सावधगिरी बाळग’, ही आज्ञा, मोशे मंडप करणार होता, तेव्हा त्याला जशी मिळाली, तसे यहुदी लोकांचे याजकही जे स्वर्गीय वस्तूंचे प्रतिरूप व छाया आहे त्याची सेवा करितात. 6परंतु आता ज्या कराराचा मध्यस्थ येशू आहे, तो अधिक चांगल्या अभिवचनाने स्थापन झालेला असल्यामुळे जेवढ्या प्रमाणात अधिक चांगला आहे, तेवढ्या प्रमाणात अधिक श्रेष्ठ याजकीय सेवाकार्य येशूला मिळाले आहे.
7तो पहिला करार निर्दोष असता, तर दुसरा आवश्यक नसता. 8परंतु लोकांना दोष लावून परमेश्वर म्हणतो,
पाहा, असे दिवस येत आहेत की,
त्यात इस्राएलचे घराणे व यहुदाचे घराणे
ह्यांच्याबरोबर मी नवा करार करीन;
9मी त्यांच्या पूर्वजांचा हात धरून
त्यांना मिसर देशातून बाहेर आणले,
त्या दिवशी मी त्यांच्याशी केलेल्या
करारासारखा हा करार असणार नाही;
कारण माझ्या कराराप्रमाणे ते वागले
नाहीत आणि मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले,
असे प्रभू म्हणतो.
10परमेश्वर म्हणतो,
त्या दिवसानंतर इस्राएलच्या घराण्याशी
जो करार मी करीन तो हा:
मी माझे नियम त्यांच्या मनावर ठसवीन
आणि ते त्यांच्या हृदयपटावर लिहीन
आणि मी त्यांचा देव होईन
आणि ते माझी प्रजा होतील;
11तेव्हा ‘परमेश्वराला ओळखा’, असे
कोणीही आपल्या सहनागरिकाला
सांगणार नाही
आणि कुणालाही आपल्या बंधूला
शिकवावे लागणार नाही;
कारण त्यांतील लहानापासून थोरापर्यंत,
सर्व मला ओळखतील;
12मी त्यांच्या अनीतीच्या कृत्यांविषयी
क्षमाशील होईन
आणि त्यांची पापे मी ह्यापुढे मुळीच
आठवणार नाही.
13त्याने नवा असे म्हटल्याने पहिल्या कराराला जुना असे ठरविले आहे; आणि जे जुने व जीर्ण होत आहे, ते लवकरच नाहीसे होईल.

सध्या निवडलेले:

इब्री 8: MACLBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन