इब्री 6
6
1आपण ख्रिस्ती संदेशाच्या प्राथमिक गोष्टींसंबंधी बोलत राहण्याचे सोडून प्रौढतेप्रत प्रगती करण्याचा नेटाने प्रयत्न करू या. निरुपयोगी कृत्यांपासून परावृत्त होणे व देवावर श्रद्धा ठेवणे, 2बाप्तिस्मे, डोक्यावर हात ठेवणे, मृतांचे पुनरुत्थान व शाश्वत न्यायनिवाडा ह्या गोष्टींविषयीच्या शिक्षणाचा पाया आपण पुन्हा घालू नये. 3आपण पुढे जाऊ या. परमेश्वर होऊ देईल तर हे आपण करू या.
4कारण ज्यांना एकदा प्रकाश मिळाला, ज्यांनी स्वर्गीय दानाची रुची घेतली, जे पवित्र आत्म्याचे वाटेकरी झाले 5आणि ज्यांनी देवाच्या सुवचनाची व येणाऱ्या युगाच्या सामर्थ्याची रुची घेतली, 6त्यांचे जर पतन झाले, तर त्यांना पश्चात्ताप होईल असे त्यांचे पुन्हा नवीकरण करणे अशक्य आहे; कारण ते देवाच्या पुत्राला स्वतःपुरते नव्याने क्रुसावर खिळतात व त्याचा उघड-उघड अपमान करतात.
7जी जमीन आपल्यावर वारंवार पडलेला पाऊस शोषून घेते व लागवड करणाऱ्याला उपयोगी असे पीक देते, तिला देवाचा आशीर्वाद मिळतो; 8पण जी जमीन काटेकुसळे उपजविते ती नापसंत व शापित होण्याच्या बेतात आलेली आहे; तिचा शेवट अग्नीने होईल.
9जरी आम्ही असे बोललो तरी, प्रियजनहो, तुमच्याविषयी आम्हांला ह्यापेक्षा अधिक चांगल्या म्हणजे तारणाशी निगडित गोष्टींची खातरी आहे. 10तुम्ही पवित्र जनांची केलेली व करीत असलेली सेवा आणि तुम्ही देवावर दाखविलेली प्रीती, हे विसरून जाण्यास तो अन्यायी नाही. 11आमची अशी इच्छा आहे की, तुमच्यापैकी प्रत्येकाने आशेविषयीची पूर्ण खातरी करून घेण्याच्या हेतूने आपली आस्था शेवटपर्यंत टिकवून ठेवावी. 12म्हणजे तुम्ही आळशी होऊ नये, तर विश्वासाच्या व धीराच्यायोगे जे अभिवचनांचा वारसा उपभोगणारे ठरतात त्यांचे तुम्ही अनुकरण करणारे व्हावे.
देवाच्या वचनांची अविचल आशा
13देवाने अब्राहामला वचन दिले, तेव्हा त्याला शपथ वाहण्यास स्वतःपेक्षा कोणी थोर नसल्यामुळे त्याने आपलीच शपथ वाहून म्हटले,
14मी तुला निश्चित आशीर्वाद देईन
व तुला निश्चित बहुगुणित करीन.
15त्याने धीर धरला म्हणून त्याला अभिवचनानुसार लाभ झाला. 16माणसे आपणापेक्षा मोठ्याची शपथ वाहतात आणि आपल्या म्हणण्याचे समर्थन करण्यासाठी त्यांच्यामध्ये शपथ सर्व वादाचा शेवट आहे. 17म्हणून आपल्या संकल्पाची अचलता अभिवचनाच्या वतनदारांना विशेष दाखवावी ह्या इच्छेने देवाने शपथेद्वारे हमी दिली, 18ह्यासाठी की, आपणापुढे ठेवण्यात आलेली आशा प्राप्त करून घेण्याकरिता आपण देवाचा आश्रय घेतला असल्यामुळे आपल्याला ह्या दोन गोष्टींमुळे उत्तेजन मिळावे:अभिवचन आणि शपथ ह्या दोन गोष्टी न बदलणाऱ्या असून त्यांच्याविषयी खोटे बोलणे देवाला अशक्य आहे. 19आपल्याला मिळालेली आशा आपल्या जीवनाला स्थैर्य देणाऱ्या नांगरासारखी आहे. ही आशा सुरक्षित व निश्चित असून स्वर्गीय मंदिराच्या पडद्यामागील आतील पवित्र स्थानात पोहोचणारी आहे. 20तेथे मलकीसदेकच्या संप्रदायाप्रमाणे युगानुयुगांचा प्रमुख याजक झालेला येशू आपल्या अगोदर आपल्याकरिता आत गेला आहे.
सध्या निवडलेले:
इब्री 6: MACLBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.