YouVersion लोगो
सर्च आयकॉन

इब्री 3:7-19

इब्री 3:7-19 MACLBSI

ह्यावरून पवित्र आत्मा म्हणतो त्याप्रमाणे, आज जर तुम्ही देवाची वाणी ऐकाल, तर रानांतील परीक्षेच्या दिवशी इस्राएल लोकांनी बंड पुकारले त्याप्रमाणे तुम्ही आपली मने कठीण करू नका. परमेश्वर म्हणतो, तुमच्या वाडवडिलांनी चाळीस वर्षे माझी कृत्यें बघितली होती, तरी मला कसोटीला लावून माझी परीक्षा पाहिली. त्यामुळे त्या पिढीवर संतापून मी म्हणालो, हे सतत बहकलेल्या अंतःकरणाचे लोक आहेत, त्यांनी माझे मार्ग ओळखले नाहीत; म्हणून मी आपल्या रागाने शपथ वाहून म्हणालो, जेथे मी त्यांना विसावा दिला असता, तेथे ते निश्चित पोहोचणार नाहीत. बंधुजनहो, जिवंत देवाला सोडून देण्याइतके विश्वासहीन दुष्ट मन तुमच्यांत कोणाचेही असू नये म्हणून जपा. उलट, जोपर्यंत आज म्हटलेली वेळ आहे, तोपर्यंत तुम्ही एकमेकांना रोज बोध करा, हेतू हा की, पापाच्या फसवणुकीने तुमच्यातील कोणी कठीण अंत:करणाचे होऊ नये; कारण जर आपण आपला आरंभीचा भरवसा शेवटपर्यंत दृढ धरला तरच आपण ख्रिस्ताचे भागीदार झालो आहोत. धमर्र्शास्त्रात असे म्हटले आहे, आज जर तुम्ही देवाची वाणी ऐकाल, तर इस्राएल लोकांनी देवाविरुद्ध बंड केले, त्याप्रमाणे तुम्ही आपली मने कठीण करू नका. देवाची वाणी ऐकून त्याच्याविरुद्ध बंड पुकारणारे लोक कोण होते? ज्यांना मोशेने मिसरमधून बाहेर काढले होते, तेच सर्व नव्हते काय? चाळीस वर्षे देव कोणावर संतापला? ज्यांनी पाप केले, ज्यांची प्रेते रानात पडली, त्यांच्यावर नव्हे काय? आणि शपथ वाहून तो कोणाला म्हणाला की, “तुम्ही माझ्या विसाव्यात येणार नाही’? ज्यांनी अवज्ञा केली त्यांनाच की नाही? ह्यावरून आपल्याला दिसून येते की, अविश्वासामुळे त्यांना तेथे प्रवेश करता आला नाही.