गलतीकरांना 5
5
1स्वातंत्र्याकरता ख्रिस्ताने आपल्याला मुक्त केले आहे म्हणून त्यात टिकून राहा, गुलामगिरीच्या जुवाखाली पुन्हा सापडू नका.
शुभवर्तमान व नियमशास्त्र ह्यांतून निवड
2पाहा, मी पौल तुम्हांला सांगतो की, जर तुम्ही सुंता करून घेतली, तर त्याचा अर्थ असा होतो की, ख्रिस्ताची तुम्हांला काही गरज नाही. 3सुंता करून घेणाऱ्या प्रत्येक माणसाला मी पुन्हा बजावून सांगतो की, तो संपूर्ण नियमशास्त्र आचरण्यास बांधलेला आहे. 4जे तुम्ही नियमशास्त्राने नीतिमान ठरू पाहता, त्या तुमचा ख्रिस्ताबरोबरचा संबंध नाहीसा झाला आहे; तुम्ही देवाच्या कृपेला अंतरला आहात. 5आम्ही मात्र विश्वासाद्वारे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने नीतिमान ठरण्याची आशा बाळगून वाट पाहत आहोत. 6कारण जेव्हा आम्ही ख्रिस्तामध्ये असतो तेव्हा सुंता करून घेणे वा न करणे यामुळे काही फरक पडत नाही; प्रीतीद्वारे कार्य करणारा विश्वास अत्यंत महत्त्वाचा आहे.
7तुम्ही चांगले धावत होता, मग सत्याचे पालन करण्यापासून तुम्हांला कुणी अडथळा निर्माण केला? त्याने कसे काय तुमचे मन वळविले? 8तुम्हांला पाचारण करणाऱ्याची ही बुद्धी नव्हे. 9थोडेसे खमीर सगळा कणकेचा गोळा फुगवून टाकते, असे म्हटले जाते. 10मला प्रभूमध्ये तुमच्याविषयी खातरी आहे की, तुम्ही दुसरा विचार करणार नाही, तुमचे मन अस्थिर करणारा कोणी का असेना, त्याला देव शिक्षा करील.
11बंधुजनहो, मी अजून सुंतेविषयी प्रबोधन करत असलो, तर अद्याप माझा छळ का होत आहे? तसे असते तर क्रुसाविषयीच्या शिकवणीचा कुणाला अडथळा वाटला नसता. 12तुमच्यामध्ये अस्थिरता उत्पन्न करणारे स्वतःचे खच्चीकरण करून घेतील तर बरे होईल.
स्वातंत्र्याचे नियमन प्रेमाद्वारे होणे आवश्यक
13बंधुजनहो, तुम्हांला स्वातंत्र्यासाठी पाचारण केले आहे. परंतु त्या स्वातंत्र्याने देहवासनांना वाव मिळू देऊ नका, तर एकमेकांची सेवा प्रीताने करा; 14‘कारण जशी आपणावर, तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर,’ या एका आज्ञेत सर्व नियम सामावलेले आहेत. 15परंतु तुम्ही जर एकमेकांना चावता व गिळून टाकता तर सांभाळा, अन्यथा तुमच्या हातून एकमेकांचा संहार होईल.
पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन
16मी तर म्हणतो, आत्म्याच्या प्रेरणेने चाला आणि देहवासना पूर्ण करू नका. 17देहवासना आत्म्याविरुद्ध आहे व आत्मा देहवासनेविरूद्ध आहे, दोन्ही परस्परविरुध्द आहे आणि ह्यामुळे जे काही तुम्ही करू इच्छिता ते तुमच्या हातून घडू शकत नाही. 18तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालविलेले आहात तर तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही.
19देहाची कर्मे तर उघड आहेत, ती ही: जारकर्म, अशुद्धता, कामातुरपणा, 20मूर्तिपूजा, जादूटोणा, वैर, कलह, मत्सर, राग, भांडणतंटे, फुटिरता, पक्षभेद, 21हेवा, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी. ह्यांविषयी मी तुम्हांला पूर्वी जे सांगून ठेवले होते, तेच आता सांगतो की, अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही.
22परंतु आत्म्याद्वारे निष्पन्न होणारे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, चांगुलपणा, औदार्य, विश्वासूपणा, 23सौम्यता व आत्मनियंत्रण हे आहे, अशांविरुद्ध नियमशास्त्र नाही. 24जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी विकार व वासना ह्यांच्यासह देहस्वभावाला वधस्तंभावर खिळले आहे. 25आपण जर आत्म्याच्या सामर्थ्याने जगतो, तर आपण आत्म्याच्या प्रेरणेने चालावे. 26आपण पोकळ अभिमान बाळगणारे, एकमेकांविरुद्ध स्पर्धा करणारे व एकमेकांचा हेवा करणारे असू नये.
सध्या निवडलेले:
गलतीकरांना 5: MACLBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.