YouVersion लोगो
सर्च आयकॉन

इफिसकरांना प्रस्तावना

प्रस्तावना
स्वर्गात आणि पृथ्वीवर जे जे काही अस्तित्वात आहे, ते सर्व म्हणजेच सारी सृष्टी ख्रिस्ताच्या सत्तेखाली एकत्रित करणे, ही परमेश्वराची योजना आहे, हे विशद करण्यासाठी प्रस्तुत बोधपत्र लिहिण्यात आलेले आहे. हाच ऐक्याचा धागा पकडून पौलाने इफिस येथील ख्रिस्ती जनतेला त्यांची ख्रिस्ताबरोबरची एकात्मता सर्वांबरोबर एकीने जीवन जगून अभिव्यक्त करण्याचे आवाहन केले.
सदर पत्राच्या पहिल्या भागात परमेश्वराने त्याच्या लोकांची निवड कशी केली व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्या बलिदानाद्वारे त्यांना त्यांच्या पापाची क्षमा कशी केली, तसेच पवित्र आत्म्याच्या वरदानाद्वारे त्यांच्यात ऐक्य कसे निर्माण केले आहे, हे दाखवून दिले आहे. ख्रिस्ताबरोबरची एकात्मता श्रद्धावंतांनी एकीने सहजीवन जगून प्रकट करावयास हवी, हे प्रस्तुत बोधपत्राच्या दुसऱ्या विभागात स्पष्ट केले आहे.
ख्रिस्तमंडळी म्हणजेच ख्रिस्ती समाज म्हणजेच चर्च हे ख्रिस्ताचे शरीर असून स्वतः ख्रिस्त त्याचे मस्तक आहे किंवा ख्रिस्ती समाज या आशयाने चर्च ही जणू एक इमारत असून ख्रिस्त त्याची कोनशिला आहे किंवा ख्रिस्तसभा वधूसारखी असून ख्रिस्त तिचा वर आहे, अशा उपमा-प्रतिमा वापरून ख्रिस्ती ऐक्यावर प्रकाशझोत टाकलेला दिसतो. ख्रिस्त प्रभूद्वारे परमेश्वराची अगाध कृपा लेखकाला इतकी प्रभावित करून सोडते की, अगदी उत्स्फूर्तपणे त्याची ही रचना स्वर्गीय सत्याला स्पर्श करणाऱ्या उत्तुंग उंचीवर जाऊन पोहोचते. ख्रिस्ताची सत्प्रीती, मुक्तिदायक बलिदान, बिनशर्त क्षमा, विपुल कृपा व पावित्र्य यांच्या उज्ज्वलतेत येथे सर्व काही उजळून गेलेले दृष्टीस पडते.
रूपरेषा
विषयप्रवेश 1:1-2
ख्रिस्त आणि ख्रिस्ती समाज 1:3-3:21
ख्रिस्तामध्ये नवजीवन 4:1-6:20
समारोप 6:21-24

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन