कलस्सैकरांना प्रस्तावना
प्रस्तावना
इफिसच्या पूर्वेकडील कलस्सै नावाच्या उपनगरात जी ख्रिस्तमंडळी राहत होती तिची स्थापना जरी स्वतः पौलाने केलेली नव्हती, तरी पौल तिला मार्गदर्शन करणे आपली जबाबदारी समजत असे. या ठिकाणी प्रबोधन करण्यासाठी पौल त्याच्या सहकाऱ्यांना पाठवत असे. पौलाच्या कानी आले होते की, काही तथाकथित धर्मशिक्षक कलस्सै येथील ख्रिस्ती लोकांच्या मनात चुकीच्या धर्मशिक्षणामुळे संभ्रम निर्माण करीत होते. उदाहरणार्थ, परमेश्वराचे ज्ञान मिळवण्यासाठी व तारण प्राप्त करून घेण्यासाठी काही ‘आध्यात्मिक अधिपतींची व अधिकाऱ्यांची’ आराधना करणे आवश्यक आहे, सुंता करणे बंधनकारक आहे व खाण्यापिण्याविषयी ठराविक निर्बंध पाळावयास हवेत, ह्या शिकवणीला विरोध करण्यासाठी व ह्याविषयी अस्सल ख्रिस्ती संदेश देण्यासाठी पौलाने प्रस्तुत बोधपत्राचा प्रपंच केला आहे.
त्याच्या प्रत्युत्तराचा गाभा हा आहे की, प्रभू येशू माणसाला परिपूर्ण तारण देण्यास समर्थ आहे व उपरनिर्दिष्ट शिकवणूक दिशाभूल करून श्रद्धावंतांना खऱ्या श्रद्धेपासून दूर नेणारी आहे. परमेश्वराने ख्रिस्ताद्वारे सर्व काही निर्माण केले असून तो ख्रिस्ताद्वारे सर्व काही पुन्हा एकत्रित करीत आहे. ख्रिस्तावरील श्रद्धेच्या सहभागाद्वारेच जगाला तारणाची आशा मिळू शकते. पुढे ख्रिस्ती श्रद्धेची व्यावहारिक बाजू पौल स्पष्ट करून सांगतो. पौलाच्या वतीने तुखिक हा सहकारी हे पत्र कलस्सै येथे घेऊन जातो, तेव्हा ज्या अनेसिम गुलामाच्या वतीने पौलाने फिलेमोनकडे मध्यस्थी केली होती, तोही तुखिकच्या बरोबर गेला होता, ही गोष्ट लक्षवेधक आहे.
रूपरेषा
विषयप्रवेश 1:1-8
ख्रिस्ताच्या कार्याचे स्वरूप 1:9-2:19
ख्रिस्तामध्ये नवजीवन 2:20-4:6
समारोप 4:7-18
सध्या निवडलेले:
कलस्सैकरांना प्रस्तावना: MACLBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.